

विधानसभा निवडणूक जवळ आली आणि मगोच्या नेत्यांना युतीची स्वप्ने पडू लागली आहेत. मागील विधानसभा निवडणुकीवेळी त्यांना स्वबळाची उबळ आली होती. आता भाजपसोबत युती झाली तर २५ जागा मिळतील असे मगोचे नेते मंत्री सुदिन ढवळीकर म्हणतात. पण भाजपला मात्र आपल्याला ३० जागा मिळतील असे वाटते. आता २५ जागा मिळाल्या तर त्यात मगोचे आमदार किती हा प्रश्न आहे. त्यातही मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर विधानसभेत जाण्यासाठी केव्हाचेच तयार होऊन बसले आहेत. त्यांच्या उमेदवारीची सोय प्रियोळ की शिरोड्यात लावली जाणार याचे उत्तर मगो देत नाही तोवर युतीची चर्चा वरवरचीच असेल काय, अशी राजकीय वर्तुळातील चर्चा आहे. ∙∙∙
रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे पूर्ण झाल्यानंतर अंतर्गत वाहिन्यांसाठी किंवा इतर कोणत्याही कामांसाठी रस्त्यांची खोदाई करू दिली जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत वारंवार देतात. परंतु वाहिन्यांची कामे करणारे कंत्राटदार त्यांना किती मनावर घेतात, हे सध्या पणजीतील अनेक भागांमध्ये दिसून येते. ताळगाव-पणजीला जोडणाऱ्या रस्त्याचे काम काही दिवसांपूर्वी पूर्ण करण्यात आले होते. पण, गेल्या काही दिवसांपासून विविध कामांसाठी या रस्त्याची जागोजागी खोदाई होताना दिसत आहे. पावसाळा तोंडावर येऊनही रस्ते खोदण्याचे काम सुरूच असल्याने यंदाच्या पावसाळ्यातही या मार्गावर सतत प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. कोणी घसरून नाही पडले म्हणजे झाले. ∙∙∙
तमिळनाडूतील सत्तास्थापनेच्या पेचातून आता गोव्याच्या दोन राजकीय चेहऱ्यांमधील अप्रत्यक्ष संघर्ष राष्ट्रीय चर्चेचा विषय ठरू लागला आहे. अभिनेता विजय यांच्या ‘टीव्हीके’ला जनादेशाचा कौल मिळूनही, पूर्ण बहुमताच्या अभावी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी अद्याप सत्तास्थापनेचा दरवाजा खुला न केल्याने काँग्रेसचे तमिळनाडू प्रभारी गिरीश चोडणकर यांनी थेट राजभवनालाच घटनात्मक आरसा दाखवला आहे. ‘बहुमताचा फैसला राजभवनाच्या दालनात नव्हे, विधानसभेच्या पवित्र सभागृहातच होतो’, अशा तडाखेबंद शब्दांत त्यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. इतकेच नव्हे तर ‘गोव्याचे नाव खराब करू नका’, या एका बोचऱ्या वाक्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. परिणामी, चेन्नईच्या सत्तेच्या पटावर दोन गोमंतकीय चेहरे परस्परांविरुद्ध उभे ठाकल्याचे चित्र निर्माण झाले असून, तमिळनाडूच्या राजकारणात ‘गोवा विरुद्ध गोवा’ असा नवा राजकीय मसाला तयार झाल्याची मिश्कील चर्चा रंगू लागली आहे. ∙∙∙
मडगावच्या लोकनियुक्त नगरमंडळाचा कार्यकाळ संपण्यास आता अवघे काही दिवस बाकी असताना मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी आपल्या चार वर्षांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत तिसऱ्यांदा कर्मचारी बढती प्रक्रिया पार पाडून एक नवीन विक्रम प्रस्थापित केला. मागची कित्येक वर्षे अशा प्रकारची प्रक्रिया कुठल्याही नगराध्यक्षांनी केली नव्हती. पण शिरोडकर यांनी ती एकदा नव्हे तर चक्क तीनदा केली. त्यामुळे सुमारे ६० कर्मचाऱ्यांचे कल्याण झाले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्याचा फायदा त्यांना येणाऱ्या पालिका निवडणुकीत मिळणार का, हे आता पाहावे लागणार आहे. ∙∙∙
देवावर श्रद्धा असावी. मात्र जर इन्फ्ल्युन्सर असलेल्या लोकांनी अंधश्रद्धा पसरविली तर ते धोकादायकच. आम जनता आपल्या स्टार फिल्मी कलाकारांप्रमाणे राजकीय नेत्यांनाही मानते. जे फिल्मी स्टार व नेते सांगतात ते त्यांच्या अनुयायाना, समर्थकांना व फॉलोअर्सना खरे वाटते. अशा वेळी या इकॉनिक लोकांनी जबाबदारीने वागले पाहिजे. आता हेच बघा ना, एका आमदाराने आपली देवावर अफाट श्रद्धा असल्याचे सांगताना आपला एक हात दुखत होता, अनेक डॉक्टर करून हात बरा झाला नाही.जेव्हा देवाची प्रार्थना केली तेव्हा हाताला आराम मिळाला अशी टेस्टीमोनी दिली. आता त्यांच्या समर्थकांचा त्यांच्यावरील विश्वास उडाला नाही म्हणजे मिळवले. ∙∙∙
दोन वर्षांपूर्वी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम हे बांबोळी पंचायत क्षेत्रात नसून सांताक्रुझमध्ये असल्याचे स्पष्ट झाल्याने या स्टेडियमचा पत्ता आता बदलला गेला. यासाठी माजी उपसरपंच तथा पंचसदस्य डॉम्निक परेरा यांना सरकार दरबारी कागदपत्रे घेऊन फिरावे लागले होते. अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले. गोमेकॉसमोरील बांबोळी वीज विभाग-३ उभारला आहे, ते ठिकाण सांताक्रुझ पंचायत क्षेत्रात असल्याचे उघड झाले. त्यामुळे परेरा यांनी या वीज खात्याच्या कार्यालयाचा पत्ताही बदलण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि कुजिरा-सांताक्रुझ झाले. परेरा हे सध्या सांताक्रुझ पंचायतीत विरोधी सदस्याची भूमिका बजावत आहेत आणि कचरा, तलावाचा प्रश्न त्यांनी हाती घेतला आहे. आता परेरा यांनी पंचायत क्षेत्रातील अतिक्रमणाकडेही लक्ष द्यावे, एवढेच. ∙∙∙
सध्या कुडचडे मतदारसंघात काय गाजत असेल तर तो कचऱ्याचा प्रश्न. काही वर्षांपूर्वी काकोडा येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारताना कुडचडेवासीयांना एक सुबक असे चित्र रंगवून दाखवताना या प्रकल्पात फक्त केपे, सांगे आणि धारबांदोडा या तीन तालुक्यांतील कचराच प्रक्रियेसाठी आणला जाईल असे सांगितले होते. मात्र आता या प्रकल्पात मडगाव येथील कचरा तर येतोच आणि नावेलीचा कचरा आणायची तयारीही सुरू आहे. त्यामुळे स्थानिक संतापले असतानाच कुडचडेतून कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत मागची कित्येक वर्षे साठून असलेला घातक कचराही वाहून नेण्याची घटना घडली आहे. परिणामी स्थानिकांनी रस्त्यावर येऊन हा कचरा वाहून नेणारे ट्रक अडविले. सध्या कुडचडेतील लोकांमध्ये ‘आम्ही उरलो फक्त कचऱ्या पुरतो’ अशी भावना बळावू लागली आहे. कुडचडे ‘कचरा कॉरिडोर’ तर झाले नाही ना, असे त्यांना वाटू लागले आहे. ∙∙∙
सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा कुतिन्हो या हल्ली बऱ्याच फॉर्मात आहेत. अनेक विषयांवर त्या पोटतिडकीने बोलतात, आवाज उठवतात. त्याबद्दल त्यांना दाद द्यायलाच पाहिजे. मात्र त्यांचा पिंड मुळात राजकारणी. सध्या त्या कुठल्याही पक्षात नसल्या तरी पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नावेली मतदारसंघातून पुन्हा एकदा निवडणूक लढविण्याची या मॅडमची इच्छा काही लपून राहिलेले नाही. म्हणूनच ‘पॉलिटिकल मायलेज’ मिळविण्यासाठी त्या धडपडत असतात, असे त्यांचे विरोधक बोलतात. मात्र त्या कुठल्या पक्षात प्रवेश करणार हे काही कळायला मार्ग नाही. काँग्रेस ते ‘आप’ असा त्यांचा आत्तापर्यंतचा राजकीय प्रवास आहे. मॅडमचा स्वभाव बघता त्यांना पक्षात घेणे म्हणजे जोखमीचे, हे सर्व राजकारणी जाणून आहेत. त्यामुळे त्यांच्यापुढे अडचणी खूप आहेत हेच खरे. ∙∙∙
भाजपने प्रवक्यांची नवी यादी गुरुवारी जाहीर केली. समाजमाध्यमे आणि प्रसारमाध्यमांवर भाजपची जोरकसपणे बाजू मांडणारे गिरीराज पै वेर्णेकर यांचे नाव त्यात नाही. त्यामुळे साहजिकपणे गिरीराज गेले कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रवक्ते म्हणून भाजप विचारसरणीची नेहमीच पाठराखण करण्यास ते कधी कमी पडत नव्हते. दूरचित्रवाणीवरील चर्चेत आपल्या पक्षाची बाजू उठावदार पद्धतीने ते मांडतात. मध्यंतरी समाजमाध्यम विभागाचे काम पाहण्यासाठी ते देशभर दौरे करतानाही दिसून आले. सध्या ते काय करतात? या प्रश्नाचे उत्तर मात्र मिळत नाही. ∙∙∙
‘तोंड असल्यार भांडवल फाल्त’ अशी कोकणीत एक म्हण आहे. भाजप हा तसा डिजिटल फ्रेंडली व जाहिरात करण्यात अग्रेसर असा पक्ष. कार्यकर्त्यांना पक्षाचे प्रमोशन कसे करावे, निवडणुकीत जनतेपर्यंत कसे पोहचावे याचे प्रशिक्षण दिले जाते. मात्र कुंकळ्ळीतील भाजप कार्यकर्त्यांना असे प्रशिक्षण मिळाले नाही का? असा प्रश्न आता भाजपमधीलच लोक विचारायला लागते आहेत. कुंकळ्ळीत भाजपने अनेक विकासकाने केली, पण श्रेय घ्यायचे धाडस मात्र कार्यकर्ते करत नाहीत. गळ्यात मफलर घालून फिरणारे आता कोठे गेले? असा प्रश्न कार्यकर्ते विचारायला लागले आहेत ∙∙∙
आराजकतेने प्रश्न सुटत नाहीत तर गुंतागुत वाढते. काही अतिशहाणे जनतेचे सेवक म्हणवून घेणारे आता स्वतःच कायद्याचे रक्षक व राज्यकर्ते असल्यासारखे वागायला लागले आहेत. आपल्या देशात व राज्यात एक व्यवस्था आहे. त्या व्यवस्थेला न मानता आम जनताच जर पोलिसांचे काम करायला लागली, आम जनताच स्वत:ला न्यायाधीश समजून न्याय द्यायला लागली तर त्या प्रांतात अराजकता माजणार हे निश्चित. दक्षिण गोव्यातील पालिका क्षेत्रात रस्त्यावर उभारण्यात येत आलेल्या साकवाचे काम योग्य दर्जाचे होत नसल्याचे सांगून एकाने कोणताही नियम न मानता रस्ता अडवून पोलिसांना व प्रशासनालाच आव्हान दिले. याच पालिका क्षेत्रात काल-परवा आणखी एकाने घातक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सुरू असलेली वाहतूक बेकायदेशीररीत्या अडवून सरकारी कामात अडथळा आणला. अशा अनेक घटना आता गोव्यात वाढायला लागल्या आहेत. काही लोक स्वतःलाच व्यवस्था समजायला लागले आहेत. बेकायदेशीररीत्या सरकारी कामात अडथळा आणणाऱ्याला कृत्यांना दादागिरी समजली जाते. अशा कृत्यांवर आळा कोण घालणार?∙∙∙
गोव्यातील सिग्नलवर आता लाल, पिवळा, हिरवा या रंगांपेक्षा भिकाऱ्यांचेच जास्त दर्शन घडू लागले आहे. सिग्नल लाल झाला की काही सेकंदांत हातात लेकरू, चेहऱ्यावर करुण भाव आणि गाड्यांच्या काचा ठोठावण्याची ‘फास्ट सर्व्हिस’ सुरू! कोलवा सर्कल जंक्शनवर तर हा प्रकार एवढा नियमित झाला आहे की काही वाहनचालक आता सिग्नलपेक्षा ‘आज कोणता भिकारी ड्युटीवर?‘ हेच पाहतात म्हणे. पोलिसांनी पूर्वी अनेकदा कारवाई करून भिकाऱ्यांना हटवले होते. पण पावसासारखेच हे लोकही... थोडे थांबतात आणि पुन्हा परततात! गोवा हे सुंदर राज्य म्हणून प्रसिद्ध आहे; पण पुढे जाऊन ‘सिग्नलवर स्वागत करणारे भिकारी’ ही नवीन पर्यटन ओळख बनू नये म्हणजे मिळवली! ∙∙∙
‘चार दिवस सासूचे...चार दिवस सुनेचे’ ही म्हण राजकारणाला तंतोतंत लागू होते. कारण राजकारणात फासे कधी बदलतील, हे सांगणे कठीण. आता माजी खासदार तथा माजी मंत्री विनय तेंडुलकर यांचेच उदाहरण घ्या ना. काही महिन्यांपूर्वी तेंडुलकरांना गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे अध्यक्षपद मिळाल्यामुळे ते ‘फोकस’मध्ये आले. आता पुन्हा त्यांची नजर लागली आहे ती सावर्डे मतदारसंघावर. त्या अनुषंगाने त्यांनी धारबांदोडा मैदानावर तीन दिवसीय ‘तेंडुलकर चषक’ क्रिकेट स्पर्धा सुरू केली. विशेष म्हणजे धारबांदोडासारख्या ग्रामीण भागात अशा प्रकारची भव्य स्पर्धा आजपर्यंत झालेली नाही असे तेथील लोक बोलतात. या स्पर्धेद्वारे तेंडुलकर कोणता ‘तीर’ मारू पाहत आहे हे सर्वज्ञात आहे. पण दोनवेळा सावर्डेचे आमदार झालेल्या तेंडुलकरांना 2027 साली परत एकदा भाजपची उमेदवारी मिळते की काय, हे बघावे लागेल. ∙∙∙
म्हापशात सध्या सुटलेले विकासाचे वारे पाहिले तर वाटते की निवडणुका म्हणजे म्हापसावासीयांसाठी साक्षात वरदानच! गेल्या तीन-चार वर्षांपासून ज्या रस्त्यांवरून चालताना अंगातील हाडे आणि गाडीचे सस्पेन्शन दोन्ही खिळखिळे झाले, तेच रस्ते आता सात-आठ महिन्यांत आरशासारखे चकाकणार आहेत. धन्य ती प्रशासकीय कार्यक्षमता. गेल्या अनेक वर्षांपासून जे गटार तुंबलेले होते, ते फक्त आठ दिवसांत साफ झाले. याला चमत्कार म्हणावा की निवडणूक स्टंट, हे म्हापशातल्या सुज्ञ जनतेला चांगलेच माहीत आहे. आधी वीजवाहिन्यांसाठी रस्ता उकरा, मग पाणी पट्टीसाठी खोदा आणि आता निवडणुका आल्या की त्यावर डांबराचा मुलामा द्या, काय तो समन्वय! स्थानिक आमदारांनी आता कामाचा धडाका लावलाय खरा, पण सामान्य माणसाला प्रश्न पडलाय की हा वेग कायमस्वरूपी आहे की केवळ मतदानयंत्राचे बटण दाबेपर्यंतच? मात्र किमान पुढचे काही महिने तरी धुळीपासून सुटका होईल, तोपर्यंत म्हापसावासीयांनी निवडणूक विकासाचा आनंद घ्यावा. कारण पुढची पाच वर्षे पुन्हा खड्डे आपली वाट बघतच असतील, असे म्हापसेकर दबक्या आवजात बोलताहेत. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.