

पणजी: राज्यातील महत्त्वाच्या रस्त्यांची दुरुस्ती आणि खड्डे भरण्याचे काम १५ दिवसांत पूर्ण होईल म्हणून सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी आठवड्यापूर्वी सांगितले आहे. त्याचबरोबर गुरुवारीही त्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांची दुरुस्ती कामे हाती घेतल्याचा पुनरुच्चार केला. मात्र, ताळगावातील रस्त्यांची दुरुस्ती कधी होणार? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या सिसील रॉड्रिग्स यांनी विचारला आहे.
सिसील यांनी समाजमाध्यमात ताळगावातील खड्ड्यांची छायाचित्रे अपलोड केली आहेत आणि त्या खराब रस्त्यामुळे अपघाताला सामोरे गेलेल्या दे अब्रेयू या ७१ वर्षीय महिलेचे मतही त्यांनी यात व्हायरल केले आहे. त्या म्हणतात, ‘मी माझ्या बँकिंग गरजांसाठी दररोज या रस्त्याचा वापर करत आहे; परंतु या दुर्लक्षामुळे माझे जीवन धोक्यात आले आहे; कारण मला या रस्त्यांवरून प्रवास करण्याची भीती वाटते.
मला आशा आहे की अधिकारी रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी आणि पुढील अपघात रोखण्यासाठी त्वरित कारवाई करतील. अशी त्यांची अपेक्षाही आहे. सिसील यांच्या माहितीसार, २६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी, ७१ वर्षीय ज्येष्ठ महिलेला ताळगावातील वेस्पा शोरूमजवळ अपघाताला सामोरे जावे लागले.
खडीमुळे एक स्कूटर त्यांच्यावर कोसळल्याने त्यांच्या हाताला व पायाला दुखापत झाली. ताळगावातील खराब रस्त्यांविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (पीडब्ल्यूडी) वारंवार अनौपचारिक तक्रारी करूनही, रस्ते गेल्या वर्षांपासून दुरवस्थेत आहेत. त्यामुळे आता पणजी पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल दाखल केली आहे.
वयोवृद्ध नागरिक, गर्भवती महिला, प्रौढ आणि तरुणांना खराब रस्त्यांमुळे किंवा खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांमुळे गंभीर दुखापती झाल्या आहेत. आता ‘झेडपी’ निवडणुका आल्याने आचारसंहितेमुळे रस्ते दुरुस्त होण्याची शक्यता कमी आहे; परंतु साबांखा कधी या रस्त्यांकडे लक्ष देईल हे सांगता येत नाही, अशी खंतही सिसील यांनी व्यक्त केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.