

पणजी: आमदारकीचा राजीनामा न देता कॉंग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या तत्कालीन १० आमदारांवरील अपात्रतेची टांगती तलवार दूर झाली आहे. कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांची यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली याचिका कालबाह्य ठरवून निकाली काढण्यात आली आहे.
या आमदारांमध्ये बाबूश मोन्सेरात, नीळकंठ हळर्णकर, जेनिफर मोन्सेरात, विल्फ्रेड डिसा, आंतोनिओ फर्नांडिस, क्लाफास डायस, फ्रान्सिस सिल्वेरा, इजिदोर फर्नांडिस, बाबू कवळेकर आणि फिलीप नेरी रॉड्रिग्स यांचा समावेश होता. सभापतींनी त्यांच्याविरोधातील याचिका फेटाळली होती. त्यानंतर हा लढा उच्च न्यायालयात पोचला होता. तेथेही न्याय न मिळाल्याने चोडणकर सर्वोच्च न्यायालयात गेले होते.
हे आमदार २०१७ मध्ये निवडून आल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता २०२२ मध्ये निवडून आल्यानंतर मायकल लोबो, दिलायला लोबो, केदार नाईक, राजेश फळदेसाई, रुडॉल्फ फर्नांडिस, संकल्प आमोणकर, दिगंबर कामत आणि आलेक्स सिक्वेरा यांनीही याच पद्धतीने भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या विरोधातील चोडणकर यांची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. दोन्ही याचिकांवर एकत्रित सुनावणी होणार, असे मानले जात होते.
मात्र, सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या खंडपीठासमोर या याचिका सुनावणीस आल्या असता, पूर्वीची याचिका कालबाह्य ठरल्याकडे लक्ष वेधले. ती कामकाजातून काढणे योग्य ठरेल, असे मतही यावेळी व्यक्त झाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.