
Joshua De Souza About Suleman Khan Case
पणजी: जमीन हडप प्रकरणातील मास्टरमाईंड सिद्दीकी उर्फ सुलेमान खानने प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या धक्कादायक विधानानंतर निर्माण झालेल्या वादापासून उपसभापती तथा म्हापशाचे आमदार ज्योशुआ डिसोझा यांनी स्वतःला अलिप्त ठेवले आहे. गुरुवारी (ता. १३) पणजी येथे पोलिस मुख्यालयात आलेल्या ज्योशुआ यांना माध्यमांनी सुलेमान खानने केलेल्या आरोपांविषयी विचारले असता उपसभापती म्हणाले की, तुम्ही सुलेमानलाच विचारा. मला काहीही सांगायचे नाही. माझा त्या व्यक्तीशी अजिबात संबंध नाही.
दुसरीकडे सुलेमानने पोलिस यंत्रणा तसेच एका आमदारावर धक्कादायक आरोप करून २४ तास उलटले, तरी याची सरकार किंवा पोलिसांनी अजिबात दखल घेतलेली नाही किंवा त्यासंदर्भात स्पष्टीकरणही दिलेले नाही. सुलेमानने क्राईम ब्रँचच्या पोलिस कोठडीतून पलायन केल्यानंतर तसेच पोलिसांकडून अटक होण्यापूर्वी स्वतःहून व्हिडिओ काढून तो व्हायरल केला होता.
त्यात आमदार ज्योशुआ डिसोझा यांनी क्राईम ब्रँचमध्ये उपस्थिती लावली होती आणि आपल्या ताब्यात असलेल्या जमिनी परत करण्यासाठी पोलिसांकडून दबाव आणला होता. माझ्या पलायनासाठी पोलिसांनीच कट रचला होता. गोव्याबाहेर पळून जाण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनीच नियोजन केले होते, असे आरोप केले होते.
त्याला केरळमध्ये अटक केल्यावर त्याने पहिल्या व्हिडिओत केलेले आरोप खोटे आहेत, असा व्हिडिओ त्याला बंदुकीच्या धाकावर काढण्यास भाग पाडले होते. तसे न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे नाईलाजाने तो काढला होता. त्यामुळे हा दुसरा व्हिडिओ व्हायरल झाला होता तो माझ्या संमतीने नव्हता. त्यामुळे तो बनावट असल्याचा दावा सुलेमानने बुधवारी केला होता.
त्याच्या या आरोपामुळे पोलिस यंत्रणा गोंधळली आहे. सरकार आणि पोलिसांनी त्यावर स्पष्टीकरण देण्याऐवजी गप्प राहण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यांच्या मौनाचा वेगळात अर्थ काढून विरोधकांनी चौफेर टीका व आरोप सुरू केले आहेत. पोलिस महानिरीक्षक ओमवीर सिंग बिष्णोई यांच्याकडे कारागृह महानिरीक्षक पदाचा ताबा आहे. त्यामुळे सुलेमानने मोबाईलवरून वृत्तवाहिनीशी साधलेल्या संपर्कासंदर्भातही चौकशी सुरू झाली आहे.
दरम्यान, सुलेमानने बुधवारी आमदार आणि पोलिसांवर आरोप केल्यानंतर आज आमदार ज्योशुआ डिसोझा यांनी पोलिस मुख्यालयात महासंचालकांची भेट घेतली. त्यांची ही भेट खासगी की, सुलेमानने केलेल्या आरोपांसंदर्भात होती, याबाबत तर्क-वितर्क वर्तविले जात होते.
आमदार ज्योशुआ यांना पोलिस महासंचालकांच्या भेटीबद्दल तसेच सुलेमानने केलेल्या आरोपांबाबत मुख्यालयात पत्रकारांनी विचारले असता त्यांनी, ‘तुम्ही त्यालाच विचारा. मला या प्रकरणाबद्दल काहीच बोलायचे नाही. मी या व्यक्तीशी संबंधित नाही, अशी प्रतिक्रिया देत तेथून ते निघून गेले.
म्हापशाचे आमदार ज्योशुआ डिसोझा यांनी आज पोलिस महासंचालक आलोक कुमार यांची भेट घेतली. या आरोपांबाबत स्पष्टीकरण दिले नसले तरी पोलिसांवर सुलेमानने केलेले आरोप पडताळण्यासाठी वरिष्ठ अधिकारी सक्रिय झाल्याची उलटसुलट चर्चा आहे. पोलिस यंत्रणा गप्प असल्याने सुलेमानने केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्याच्या संशयाचे वलय निर्माण झाले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.