
पणजी: जमीन हडपप्रकरणी अटकेत असताना पोलिस कोठडीतून पलायन केलेल्या सुलेमान सिद्दीकी ऊर्फ सुलेमान खान याने पोलिसांनी विजेचे झटके देत दुसरा व्हिडिओ चित्रित केला, असा खळबळजनक आरोप करत पोलिसांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.
बंदुकीच्या धाकावर आपल्याला त्या व्हिडिओत बोलण्यास भाग पाडले, असा आरोप त्याने पोलिसांच्या समक्षच खुलेआमपणे केल्याने आणि पोलिसांनी त्यावर चुप्पी साधल्याने त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. जमीन हडपप्रकरणी पोलिस कोठडीतून पलायन केल्यानंतर क्राईम ब्रँचच्या एसआयटीने मला अटक केली. नंतर ‘गन पाॅईंट’वर पोलिसांनी मला दुसरा व्हिडिओ काढण्यास भाग पाडले. हा व्हिडिओ बनावट होता. त्यासाठी त्यांनी मला इलेक्ट्रिक शॉक दिले तसेच छळवणूकही केली, असे सुलेमान म्हणाला.
क्राईम ब्रँचच्या पोलिस कोठडीतून पलायनप्रकरणी जुने गोवे पोलिसांनी अटक केलेला संशयित सुलेमान खान हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याची पोलिस कोठडी संपल्याने ती वाढवून घेण्यासाठी तसेच पलायनप्रकरणी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले, त्यासाठी आज त्याला आल्तिनो येथील प्रथमवर्ग न्यायालयात उभे केले होते. पोलिस संरक्षणात न्यायालयात जाताना तसेच बाहेर येताना त्याने पत्रकारांना जाहीरपणे माहिती देताना पोलिस आणि आमदारावर आरोप केले. सुलेमानने कारागृहातून फोन करून उघड केलेली
सुलेमानने व्हायरल केलेला दुसरा व्हिडिओ माझ्यावर आरोप करणारा होता. हा व्हिडिओ पोलिसांनी त्याला काढण्यास भाग पाडले होते. त्यामुळे तो बनावट होता, हे मी पहिल्यांदाच म्हटले होते. पोलिस राजकीय दबावाला बळी पडत असून हे दुर्दैवी आहे. पोलिसांना तपासकामात स्वातंत्र्य नाही. ते सरकारच्या निर्देशानुसार वागत आहेत. सुलेमानचा पहिला व्हिडिओ व्हायरल झाला, त्यात आमदार व पोलिसांवर आरोप होते. त्यामुळे पोलिसांनी त्याला दुसरा बनावट व्हिडिओ काढण्यास भाग पाडून राजकीय नेत्याविरुद्ध विधान करण्यास भाग पाडले, असा आरोप ‘आप’चे गोवा राज्य संयोजक ॲड. अमित पालेकर (Amit Palekar) यांनी केला.
सुलेमान खानने न्यायालयातून (Court) परतताना पत्रकारांना सांगितले की, पहिला व्हिडिओ मी ॲड. अमित पालेकर यांना पाठविला होता. तो व्हिडिओ मी त्यांना व्हायरल करण्यास सांगितला नव्हता, तर त्या व्हिडिओच्या आधारे न्यायालयात अर्ज सादर करण्यास सांगितले होते.
संशयित सुलेमान खान याच्याविरुद्ध जुने गोवे पोलिसांनी पणजी प्रथमवर्ग न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात त्याच्यासह बडतर्फ पोलिस कॉन्स्टेबल अमित नाईक तसेच हुबळी येथून संशयितास गाडीमधून पलायन करण्यास मदत करणारा संशयित हजरत अली या तिघांचा आरोपपत्रात समावेश केला आहे. या आरोपपत्रावरील सुनावणी २५ फेब्रुवारीला ठेवली आहे. या आरोपपत्रात सुलेमानने पलायन केलेल्या रात्री क्राईम ब्रँचमध्ये उपस्थित असलेल्या पोलिसांची तसेच काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजची माहिती पुरावे म्हणून सादर केली आहे. पलायनास वापरलेली अमित नाईकची दुचाकी तसेच हुबळी येथील हजरत अली याची कार जप्त केल्याचाही उल्लेख आहे.
जुने गोवे पोलिसांनी सुलेमानला अटक करून चौकशी पूर्ण झाल्याने प्रथमवर्ग न्यायालयाने त्याची रवानगी पोलिस कोठडीत केली. त्यावेळी क्राईम ब्रँचच्या एसआयटीने त्याची चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यासाठी अर्ज केला होता, तो फेटाळला होता. त्यामुळे एसआयटीने सत्र न्यायालयात प्रथमवर्ग न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले होते. त्या अर्जावरील सुनावणी आज पूर्ण होऊन त्यावरील निर्णय येत्या २४ फेब्रुवारीला ठेवली आहे.
सुलेमानने काल कोलवाळ कारागृहातून एका वृत्तवाहिनीला फोन केला होता. त्याचा दुसरा व्हायरल झालेला व्हिडिओ बनावट असून पोलिसांनी गनपॉईंटवर माझ्याकडून वदवून घेतला होता, असे त्याने सांगितले होते.
कारागृहातील कैद्यांना लँडलाईनवरील फोनवरूनच कुटुंबीयांना किंवा वकिलाला अपवाद वगळता एखाद्या मित्राला फोन लावण्याची सुविधा आहे. त्यासाठी त्याला फोन क्रमांक कोणता लावणार, त्याची माहिती आगाऊ द्यावी लागते.
त्यामुळे सुलेमानने एका वृत्तवाहिनीला हा फोन केला तो तुरुंग अधिकाऱ्यांना माहीत नव्हता की, त्यांच्याच आशीर्वादाने त्याने तो एखाद्या मोबाईलवरून लावला, असा प्रश्न उपस्थित होतो.
तुरुंगात मोबाईल संचाची तस्करी होते, या विषयाला या प्रकरणाने दुजोरा मिळाला आहे.
सुलेमान म्हणाला की, क्राईम ब्रँचच्या एसआयटीच्या पथकाने केरळ येथे मला अटक करून माझी छळवणूक केली. डोक्याला पिस्तुल लावून पोलिसांनी मला पहिल्या व्हिडिओमध्ये जे आरोप केले होते, ॲड. अमित पालेकर यांनीच करायला लावले, असे म्हणण्यास लावले होते. हा व्हिडिओ काढण्यासाठी पोलिस दबाव आणत होते आणि पोलिस निरीक्षक नितीन हळर्णकर यांनी मला इलेक्ट्रिक शॉक दिले. शॉक दिलेली हातावरील खूण दाखवत सुलेमान म्हणाला की, दुसरा व्हिडिओ नाईलाजाने काढला होता.
सुलेमानने कारागृहातून संपर्क साधल्याने तुरुंग सुरक्षा यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. या प्रकरणाची सुरू असतानाच आज संध्याकाळी सुलेमान वास्तव्यास असलेल्या खोलीची कसून झडती घेण्यात आली. या झडती या खोलीमध्ये एक मोबाईल संच सापडला आहे. तुरुंग अधिकाऱ्यांनी तो ताब्यात घेतला असून चौकशी सुरू केली आहे. या मोबाईलमध्ये सीमकार्ड सापडलेले नाही. त्यामुळे हा मोबाईल कोणाच्या नावावर आहे याचा तसेच त्याच्या ईएमआय क्रमांकावरून पुढील तपास सुरू केला आहे.
पहिल्या व्हिडिओत या प्रकरणाशी संबंधित असलेल्या आमदाराने आणि पोलिसांनीच पलायन करण्यास मदत केल्याचे आरोप खरे आहेत, असा पर्दाफाश संशयित सिद्दीकी ऊर्फ सुलेमान खान याने आज पुन्हा केल्याने या प्रकरणाला कलाटणी मिळाली असून पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.
कॅश फॉर जॉब घोटाळा प्रकरणाकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून पोलिस कोठडीतून पलायन करण्यास पोलिसांनी भाग पाडले. पोलिसांनीच रचला हा पलायनाचा प्लॅन.
दुसरा व्हिडिओ पोलिस कोठडीत असताना ‘गनपॉईंट’वर काढला. अशा प्रकारचे काही राजकीय नेत्यांविरोधातील सुमारे १५ व्हिडिओ पोलिसांनी माझ्यावर दबाव आणून काढले.
पोलिसांनी हुबळी येथे भेटण्यास बोलावले. मला अटक झाली नाही. मी स्वतःच पहिल्या व्हिडिओचा पेनड्राईव्ह ॲड. अमित पालेकर यांच्या कार्यालयात आणून दिला होता.
पोलिसांनी माझ्या पत्नीला अटक केली, तर मुलांना रिमांड रूममध्ये ठेवले. त्यामुळे मंगळुरू येथे मी पोलिसांना शरण आलो. पोलिसांना मला अटक केली नाही. बोगस गुन्हा दाखल करून राजकारणात पिळले जात आहे.
माझ्या जीवाला धोका होता. त्यामुळेच जामिनासाठी अद्याप अर्ज केलेला नाही. मी न्यायालयीन कोठडीत सुरक्षित आहे. मला जामीन नको. मी फरारी होण्याचा प्रश्नच नाही. या प्रकरणात जामीन मिळणे कठीण नाही. हे प्रकरण सीबीआयकडे चौकशीसाठी द्यावे.
जमीन हडपप्रकरणी अटक होण्यापूर्वी माझा पहिला व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे पोलिसांचा पूर्वनियोजित प्लॅन फसला. जमिनी माझ्या आहेत. त्या कोणा माजी किंवा आजी आमदाराच्या नाहीत.
माझ्या नावावर असलेल्या जमिनी स्वस्तात विकत घेतल्या आहेत. ती माझी स्वतःची मालमत्ता आहे. मी निष्पाप आहे. या जमिनींचे दर भरमसाट वाढल्याने राजकारणी पोलिसांना हाताशी धरून मला बदनाम करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.