
Suleman Khan Land Grab Case Updates
पणजी: जमीन हडप प्रकरणातील मुख्य सूत्रधार सिद्दीकी ऊर्फ सुलेमान खान याला आज पोलिस संरक्षणात न्यायालयीन कोठडी वाढवून घेण्यासाठी न्यायालयात आणले असता जीवे मारण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मोठमोठ्याने ओरडून सांगत त्याने गोंधळ घातला.
तसेच त्याने लिखित सात पानांचा दस्तावेज माध्यम प्रतिनिधींकडे फेकला. यामध्ये त्याने १९९९ पासून आतापर्यंत भू-बळकाव प्रकरणातील राजकारणी, पोलिस तसेच सरकारी अधिकाऱ्यांशी झालेले संवाद तसेच सेटलमेंटसाठी देण्यात आलेल्या जीवे मारण्याच्या धमक्यांचा उल्लेख केला आहे.
मालमत्ता नावावर करण्यासाठी ज्योशुआ डिसोझा यांच्याकडून ५ कोटींची ऑफर होती, असे त्याने म्हटले आहे. सिद्दीकी हा भयंकर कावेबाज आहे; परंतु सातत्याने तो आरोप करत आहे. त्यावर किती विश्वास ठेवावा, असा प्रश्न निर्माण होत आहे.
सुलेमानने प्रसार माध्यमांकडे फेकलेली कथित कागदपत्रे २० फेब्रुवारी २०२५ रोजीची असून ती मीडिया संघटनेला उद्देशून आहेत. त्यातील आशय असा- त्याने म्हापसा येथे अनेक मालमत्ता खरेदी करून त्या विकसित करून त्याची विक्री केली. १९९६ साली २०,८१९ चौ. मी. जमीन या परिसरातून खरेदी केली.
त्यावर माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा आणि मूळ जमीनमालकांच्या सह्या आहेत. १९९९ साली काही १२ लोक आपल्याकडे आले आणि त्यांनी ही जमीन विकत घेतली असल्याचे सांगितले. ही माहिती म्हापशाच्या तत्कालीन आमदारांना दिली असता, त्यांनी या लोकांना आपल्या घरी बोलावून घेतले व समझोता करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आक्रमक बनलेल्या या नागरिकांनी त्यांना शिवीगाळ केल्याने ते निघून गेले.
सुलेमान खानने प्रसिद्धी माध्यमांना पुरविलेल्या कागदपत्रांमध्ये म्हटले आहे, की म्हापशाचे तत्कालीन उपनिबंधक अर्जुन शेट्ये हा माझा चांगला मित्र होता.
त्याने २०२० मध्ये बोलावून त्याच्यावर जोशुआ आणि नीलेश काब्राल यांच्याकडून दबाव येत असल्याचे सांगितले. माझ्याविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल करण्यास सांगितले होते. त्यांच्या दडपणामुळे त्या उपनिबंधकाने २०२० मध्ये म्हापसा पोलिसांत तक्रार दाखल केली.
माझी सतावणूक केली जात असल्याचा अर्ज म्हापसा न्यायालयात करून त्यामध्ये जोशुआ, म्हापसा पोलिस व माजी मूळ जमीनमालकाचा उल्लेख केला होता. पोलिसांनी माझ्याविरुद्ध लुकआऊट नोटीस माझे नाव व छायाचित्र घालून जारी केली. मी खरेदी केलेल्या म्हापसा येथील हाऊसिंग बोर्ड कॉलनीमधील माझे गॅरेज, स्टील गेट्स व केलेले कुंपण म्हापसा पालिकेवर दबाव आणून पाडले.
त्यावेळी मी माझे मित्र पोलिस निरीक्षक नितीन हळर्णकर यांच्याकडे गेलो. त्यांच्याकडे माझ्याविरुद्धच्या तक्रारी तपासासाठी होत्या. मात्र, नवीन पोलिस अधीक्षकांना जोशुआ भेटल्याने या नव्या अधीक्षकांकडून दडपण आणण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. जोशुआ यांच्याबरोबर समझोता करण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जात होता.
म्हापसा व जुने गोवे येथील माझी मालमत्ता सुमारे २०० कोटींची असून त्यापैकी ६० टक्के रक्कम अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिल्लीतील एका पार्टीला विकण्यासाठी व इतर समझोता करण्यासाठी मागितली. मी या वाटाघाटीला तयार झालो तर सर्व तक्रारी बंद करण्यात येतील व १० टक्के रक्कम त्याला दिली जाईल, असे ठरले.
त्यानंतर पोलिसांनी अनेकदा माझ्यावर तसेच माझ्या पत्नी व मुलांना घाबरवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मला बेळगाव व कारवार या ठिकाणी वारंवार नेऊन मालमत्तेवरून धमकावत होते. मी त्यांच्या या समझोत्याला दाद देत नाही, हे कळल्यावर मला अटक करून पोलिस कोठडीत घालण्यात आले.
कोठडीत असताना क्राईम ब्रँचच्या पोलिसांनी इलेक्ट्रीक शॉक देत सतावणूक केली. जेव्हा जोशुआ असायचा, तेव्हा पोलिस त्याला दाखवण्यासाठी माझी सतावणूक करत होते व मारहाण करायचे. मात्र, तो गेल्यावर पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता हे चांगली वागणूक द्यायचे. त्याच काळात राज्यात ‘कॅश फॉर जॉब’ हे प्रकरण गाजत होते. त्यामुळे त्याकडे गोव्याचे लक्ष विचलित करण्यासाठी मला अटक केली जात असल्याचे गुप्ता यांनीच सांगितले होते.
अधूनमधून जोशुआ क्राईम ब्रँचमध्ये येऊन पोलिस अधीक्षक गुप्ता यांच्यामार्फत मालमत्ता आपल्या नावावर करण्यासाठी दबाव आणत होते. कोठडीतून पलायन करण्याचा प्लॅन हासुद्धा एसआयटीच्या पोलिस अधीक्षक गुप्ता यांचाच होता. पूर्व नियोजनानुसार कारवार येथे पंचनामा करायचे आहे, असे सांगून मला कोठडीतून बाहेर काढले व हुबळीला जाईपर्यंत पोलिस फौजफाटा माझ्यासोबत वेगवेगळ्या गाड्यांमधून होता. त्यानंतर मी पोलिस कोठडीतून पलायन केल्याचा आव पोलिसांनी आणला.
२१ डिसेंबर २०२४ रोजी मला केरळ पोलिसांनी ताब्यात घेऊन गोव्यातून आलेल्या एसआयटीच्या ताब्यात दिले. गोव्यात आणताना पोलिस पथकाने अनेकदा पंचनाम्याच्या नावाखाली मला गाडीतून बाहेर काढले. मी काढलेल्या पहिल्या व्हिडिओच्या विरोधात नवे व्हिडिओ बंदुकीचा धाक दाखवून माझ्याकडून काढून घेतले. ६ व्हिडिओ वेगवेगळ्या ठिकाणी काढले गेले आहेत. तसेच ॲड. अमित पालेकर यांच्याविरोधात आरोप करण्यास सांगण्यात आले होते.
माझ्या मोबाईलवर एकूण १६ व्हिडिओ तयार करून ते पोलिस निरीक्षक नितीन हळर्णकर यांना शेअर करण्यात आले होते. हे व्हिडिओ बनवून देण्यासाठी पोलिसांनी इलेक्ट्रिक शॉक देण्याबरोबरच माझ्या हाताची नस कापून मला भयभीत करण्याचा प्रयत्न केला. माझे ३५ महिलांशी संबंध असल्याची माहिती देत मला पोलिसांनी बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मी व्यावसायिक असून पोलिस व राजकारण्यांच्या या प्रकरणात पोलिस, राजकारणी तसेच सरकारी अधिकारी असल्याने व या प्रकरणाचा तपासकाम निःपक्षपाती होण्यासाठी ते सीबीआयकडे देण्याची गरज आहे, असे या कागदपत्रांत नमूद केले आहे.
सुलेमान खानला त्याच्या सुरक्षेसाठी न्यायालयातून बाहेर आणले, तेव्हा न्यायालय संकुलाच्या प्रवेशद्वारावर बॅरिकेडिंग केले होते, असा दावा उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी केला. त्याच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर दीर्घ खटला सुरू आहे आणि त्याची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहे. सुलेमानने माध्यमांना दिलेली कागदपत्रे पोलिसांनी हिसकावून घेऊन पळ काढला, असे विचारले असता ते म्हणाले, आरोपीवर कायद्याच्या कक्षेत खटला चालवला जात आहे. जर त्याला कोणतेही कागदपत्र द्यायचे असेल तर ते कागदपत्र न्यायालयात द्यावे.
मी या प्रकरणातून जामिनावर सुटल्यानंतर २०२० मध्ये जोशुआ डिसोझा यांनी मला घरी बोलावले. ही मालमत्ता आपल्या नावावर करण्यासाठी जोशुआने मला ५
कोटींची ऑफर दिली. त्या मालमत्तेची किंमत सुमारे ५० कोटी असल्याने त्यांची ऑफर मी झिडकारली. त्यानंतर काही दिवसांनी तत्कालीन कायदामंत्री नीलेश
काब्राल यांनी मला त्यांच्या घरी बोलावले. मात्र फोनवरून त्याने शिवीगाळ केल्याने मी गेलो नाही, असे सुलेमानने लिहिले आहे.
१. मागीलवेळी सुलेमानने न्यायालयात नेताना व आणताना प्रसार माध्यमांशी थेट बोलून त्याला बंदुकीचा धाक देऊन दुसरा व्हिडिओ व्हायरल करण्यास लावल्याचा आरोप केला होता.
२. त्यामुळे आज सुलेमान प्रसार माध्यमांपर्यंत पोहोचू नये, म्हणून सर्वतोपरी सावधगिरी बाळगली होती.
३. प्रत्यक्ष पोलिस अधीक्षक यावेळी उपस्थित राहून न्यायालयाच्या दरवाजाबाहेर दोन्ही बाजूंनी पोलिसांचे कडे उभारले होते.
४. आणताना त्याच्या चेहरा खुला होता. त्यावेळी त्याने सात पानी लिखित कागदपत्रे फेकली.
५. प्रसारमाध्यमांनी त्याची फोटो कॉपी घेत असताना एका पोलिस कॉन्स्टेबल्सने तो ओढून पळ काढला.
६. पोलिस गाडीतून संरक्षणात जाताना त्याच्या चेहऱ्यावर काळा बुरखा घातला होता.
७. त्यावेळी त्याने ‘मला जीवे मारण्याचा प्रयत्न सुरू आहे’, असे ओरडून सांगण्याचा प्रयत्न केला.
सुलेमानने नमूद केले की, २०१३ साली फ्रान्सिस डिसोझा यांनी मला घरी बोलावून ही मालमत्ता आपल्या मुलाच्या नावावर करण्यासाठी विक्री खतासाठी लागणारा खर्च ५० लाख देण्यास तयार झाले. मी १० कोटी मागितले. त्यांना राग आला. मी उपमुख्यमंत्री असल्याने तुला काय ते दाखवतो, असा दम दिला. २०१४ मध्ये मला खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात अडकवले.
जमीन हडप प्रकरणातील संशयित सुलेमान खान याने न्यायालयात नेताना माध्यम प्रतिनिधींकडे हस्तलिखित फोटो कॉपी फेकल्या. त्यामध्ये त्याने पोलिसांवर आरोप केले आहेत. यासंदर्भात पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी, आपली काहीच प्रतिक्रिया नाही, असे सांगितले, तर आमदार जोशुआ यांच्याशीही संपर्काचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.