
Girish Chodankar On Suleman Khan Land Grab Case
पणजी: पंतप्रधानांनी गोव्यातील सुलेमान खान जमीन बळकावणी प्रकरणाची केंद्राच्या आधिपत्याखालील अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा अखिल भारतीय काँग्रेसचे आमंत्रित सदस्य गिरीश चोडणकर यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ हे घोषवाक्य फक्त राजकीय लाभासाठी वापरले, पण आज त्यांच्या पक्षाचेच नेते भ्रष्टाचारात पूर्णतः बुडाले आहेत. जर पंतप्रधान त्यांच्या शब्दांबद्दल गंभीर असतील, तर त्यांनी तातडीने केंद्रीय अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी चोडणकर यांनी केली आहे.
चोडणकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सुलेमान खान व गोव्यातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा सहभाग असलेल्या जमीन बळकावणी प्रकरणाची तातडीने केंद्रीय अंमलबजावणी संचालनालय (ईडी) चौकशी करावी. या गैरव्यवहारात भाजपच्या अनेक प्रभावशाली नेत्यांचा सहभाग असून एकूण १७ बेकायदेशीर जमीन बळकावण्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे राज्य सरकारमधील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि संगनमत उघड झाले आहे. सुलेमानने काही जणांची नावे घेतली असून आणखी मोठी नावे बाहेर येण्याची शक्यता आहे.
चोडणकर यांनी पुढे म्हटले आहे, की राज्य सरकारच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) केलेली चौकशी म्हणजे फक्त एक दिखावा आणि खऱ्या दोषींना वाचवण्याचा प्रयत्न आहे. सुलेमान खान हा या गैरव्यवहारातील मुख्य आरोपी असून त्याच्याकडे भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांची नावे आहेत. तरीसुद्धा राज्य सरकार पूर्णपणे अपारदर्शक पद्धतीने हा विषय हाताळत आहे. त्यांनी भाजपच्या या १७ बेकायदेशीर जमीन बळकावणी प्रकरणावरील मौनाविषयीदेखील सवाल उपस्थित केला आणि पंतप्रधानांनी या प्रकरणावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी केली.
जमीन बळकावणीची डोळेझाक करण्यासारखी बाब नाही, तर गोमंतकीय जनतेशी केलेला विश्वासघात आहे. आम्ही भाजप नेत्यांना गोव्यातील जमीन लुटू देणार नाही, तर सरकार डोळे झाकून बसले असल्याचेही त्यांनी यात नमूद केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.