मिलिंद म्हाडगुत
गोवा: मगो पक्षाला या निवडणुकीत फक्त दोनच जागा मिळाल्यामुळे, किंगमेकर, या भूमिकेतून पक्षाचे सर्वेसर्वा सुदिन ढवळीकर यांचे बहिगर्मन झाल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे.मगो पक्षाने तृणमूलशी युती करून 13 जागा लढविल्या होत्या त्या 13 पैकी किमान 6 जागांवर विजयी होण्याची त्यांची अपेक्षा होती. निकाल जाहीर होण्याआधी मगोपक्ष हवेतच होता. कॉंग्रेसशी युती करण्याचे त्यांचे मनसुबे होते आणि मायकल लोबोंनी तसेच गोवा कॉंग्रेसचे निरीक्षक पी. चिदंबरम यांनी हिरवा कंदील दाखवल्यामुळे निकालानंतर मगोप कॉंग्रेसलाच पाठिंबा देणार, असे दिसत होते.
त्याचबरोबर मगो पक्षाचे 5 व 6 आमदार निवडून आल्यास सुदिन ढवळीकर हे मुख्यमंत्री होतील, अशी संभावना दिसत होती. ढवळीकरांनी आपली ही महत्त्वाकांक्षा लपवून ठेवली नव्हती. मगो पक्षाचे 5 ते 6 तसे तृणमूलचे 6 ते 7 आमदार निवडून येऊन आपण मुख्यमंत्री बनू, अशीही आकांक्षा त्यांच्यात वास करीत असल्याचे त्यांच्या बोलण्यावरून सूचित होत होते.
यावेळी मगोपचे 5 आमदार निवडून आले असते तर सुदिन खऱ्याअर्थाने किंगमेकर बनू शकले असते. निकालादिवशी तसे चित्रही दिसत होते. मतमोजणी सुरू झाली तेव्हा मगो पक्ष फोंडा, मडकई, डिचोली, प्रियोळ, व मांद्रे या मतदारसंघात आघाडीवर होता.
फोंडा व प्रियोळात तर सहाव्या फेरीपर्यंत मगो पक्ष पुढे होता, पण नंतर चित्र बदलले. व फोंडा प्रियोळबरोबर डिचोलीत पक्षाला हार पत्करावी लागली. फोंड्यात 77, प्रियोळात 213 तर डिचोलीत 310 मतांनी मगोची हार झाली. आणि पाच मतदारसंघ मिळणार, असे वाटत असताना मगोप पक्षाला शेवटी दोन जागांवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे फोंड्यात तर मगोपचे डॉ. केतन भाटीकर एका मताने जिंकले,असे जाहीरही झाले होते. पण फेरमतमोजणीनंतर भाजपचे रवी नाईक यांना विजयी म्हणून घोषित करण्यात आले. पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी तर पराभवाची हॅटट्रिक च नोंदविली आहे. 2017 साली ते अपक्ष गोविंद गावडेकडून 4800 मतांनी पराभूत झाले होते.
2019 मध्ये झालेल्या शिरोडा येथील पोटनिवडणुकीत भाजपच्या सुभाष शिरोडकर यांनी दीपक यांचा 70 मतांनी पराभव केला होता. आणि आता पुन्हा एकदा प्रियोळातून दीपक यांचा गोविंद गावडेंकडूनच पराभव झाला आहे. यामुळे मगोपच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आता फक्त दोनच आमदार निवडून आल्यामुळे मगोप बॅकफुटवर गेल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे आता मगोला भाजपच्या आगामी सरकारला विना अट पाठिंबा देण्याची वेळ आली. पण हा पाठिंबा घेऊ नये, असे भाजपच्या अनेक आमदारांना वाटते. फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनी तर स्पष्टपणे तसे सांगूनच टाकले आहे.
भाजप जवळ अपक्ष धरून 23 आमदार असल्यामुळे भाजपला मगोपच्या पाठिंब्याची गरजच नाही, असा दावा रवींनी तसेच फोंडा तालुक्यातील भाजप मंडळाने केला आहे. आणि आता भाजपमध्ये रवी नाईक व गोविंद गावडे ही गुरुशिष्याची जोडी असल्यामुळे मगोला खासकरून सुदिन यांना डोके वर काढणे कठीणच आहे, हे पाहता सध्या मगो पक्ष याचकाच्या भूमिकेत गेल्यासारखा दिसतो आहे. निवडणूक निकालाच्या आधी किंगमेकरच्या भूमिकेत वाटणारा पक्ष आता मागच्या बाकावर पोहचल्यासारखा वाटू लागला आहे. कालाय तस्मै नमः असेच हे सर्व पाहून म्हणावेसे वाटते.
मुख्यमंत्रिपदाची सतत हुलकावणी!
सुदिन हे मडकईतून सहा वेळा निवडून आले असले तरी मुख्यमंत्रिपद नेहमीच त्यांना हुलकावणी देत राहिले. मनोहर पर्रीकर उपचारांकरिता दिल्लीला जाण्याच्या वेळी सुदिन यांना मुख्यमंत्रिपदाची संधी चालून आली होती. पण काही मंत्र्यांनी त्यांना विरोध दर्शविल्यामुळे त्यांची ही संधी हुकली होती. नंतर मगोप भाजपमध्ये विलिन केल्यास त्यांना मुख्यमंत्री करू अशीही भाजपश्रेष्ठींकडून ऑफर आली होती. पण या प्रस्तावाला सुदिन यांनी नकार दिल्याने ही संधीही हुकली होती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.