पणजी: ताज्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या 40 आमदारांपैकी 16 जाणांवर राज्यांत विविध कायद्यांखाली गुन्हे दाखल झालेले आहेत. यात 13 जणांचे गुन्हे गंभीर स्वरुपाचे आहेत. उमेदवारांनी निवडणूक अर्ज भरताना दिलेल्या माहितीचे पृथक्करण करून असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स या संस्थेने ही माहिती प्रसारित केली आहे.आठव्या विधानसभेचे सांसदीय कर्तृत्व काय असेल असा प्रश्न पडलेल्याना आमदारांची शैक्षणिक पार्श्वभूमी उद्बोधक वाटेल.
40 पैकी एक आमदार केवळ 8 वी पास असून प्रत्येकी सहा आमदारांनी दहावी वबारावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. 13 जण पदवीधर असून अन्य 6 जणांकडे व्यावसायिक शाखेतली पदवी आहे. 6 जणांकडे पदविका तर चौघे पदव्युत्तर पदवीधारक आहेत.
40 आमदारांत केवळ एक तिशीच्या आतला आहे. 31 ते 40 या वयोगटातील तिघे आमदार नव्या विधानसभेत असतील. एकूण 16 जणांचा वयोगट 41 ते 50 असून 12 जण 51 ते 60 वयोगटांतले आहेत. साठी ओलांडलेले 8 आमदार असून त्यातील एक तर सत्तरी पार केलेला आहे. गोव्याने निवडून दिलेले 30 आमदार कोट्यधीश आहेत, या 30 पैकी 22 जणांची मालमत्ता 10 कोटी रुपयांहून अधिक आहे.
आठव्या विधानसभेत तीन आमदार महिला असतील. विशेष म्हणजे तिघींचे पतीराजही त्यांच्या समवेत आमदार म्हणून विधानसभेत बसणार आहेत. एकविसाव्या शतकात राज्य विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीत पहिल्यांदाच तीन महिला विजयी झाल्या आहेत. सर्वात जास्त, चार महिलांना विधानसभेत पोहोचवायचा मान मात्र 1994 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीला जातो.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.