

फोंडा: ज्या पक्षाशी कार्यकर्ते एकनिष्ठ राहिले, त्यांनाच पुढे नेण्याची गरज आहे. पक्षबदलूंना उमेदवारी देणे म्हणजे पक्षाने स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेण्यासारखे आहे, असे मत मगो पक्षाचे नेते तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केले.
ढवळी-फोंडा येथे एका कार्यक्रमासाठी आले असता ढवळीकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राजकीय फायदा मिळविण्यासाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारण्याचे प्रकार वाढत आहेत. पक्ष टिकवायचा असेल, तर प्रत्येक राजकीय पक्षाने आपल्या ध्येयधोरणांशी आणि तत्त्वांशी एकनिष्ठ राहणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी, असे ते म्हणाले.
दरम्यान, राजकारणात युवकांना पुढे आणण्याची गरज आहे. पक्षबदलूंना नव्हे, तर त्यांच्या मुलांना प्राधान्य द्यावे, असा सल्ला ढवळीकर यांनी दिला. पक्ष बदलणारे आमदार भविष्यात कोणत्या पक्षात जातील, हे सांगता येत नाही. आपण गेली तीन दशके मगो पक्षाशी एकनिष्ठ राहिलो असल्याने याविषयी बोलण्याचा आपल्याला अधिकार आहे, असेही त्यांनी ठासून सांगितले.
सिद्धेश नाईकला संधी द्या
भाजपशी एकनिष्ठ राहिलेले केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे पुत्र सिद्धेश नाईक यांना उमेदवारी द्यावी, असे मतही ढवळीकर यांनी व्यक्त केले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांना काँग्रेस आणि इतर पक्षांकडून ऑफर आल्या होत्या; तरीही त्यांनी भाजप सोडला नाही. त्यामुळे त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, असे ते म्हणाले.
पक्ष बदलणाऱ्यांनी आधी पाच वर्षे पक्षासाठी काम करावे आणि त्यानंतरच त्यांच्या उमेदवारीचा विचार व्हावा. ‘आयाराम-गयाराम’ प्रवृत्तीच्या नेत्यांना घरी पाठविण्याची गरज आहे. राजकारण स्वच्छ करण्यासाठी दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दोन पक्षांतरितांना भाजपची उमेदवारी नाकारली होती. त्याच प्रकारची विजिगीषू वृत्ती दाखविण्याची गरज असल्याचे ढवळीकर म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.