काणकोण गट समितीचे माजी सचिव तथा माजी महापौर महादेव देसाई यांच्यासह काणकोण काँग्रेसच्या सुमारे 50 कार्यकर्त्यांनी शुक्रवारी तृणमूल (TMC) काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे तृणमूल काँग्रेसला आणखी बळकटी मिळाली आहे.
पक्षाच्या पणजी कार्यालयात शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पवन वर्मा, महिला प्रदेशाध्यक्ष अविता बांदोडकर आणि युवा अध्यक्ष जयेश शेटगावकर यांनी महादेव देसाई यांच्यासह काँग्रेस गट समितीचे उपाध्यक्ष राजेंद्र वेळीप व इतर कार्यकर्त्यांना पक्षात रितसर प्रवेश दिला.
सद्यस्थितीत गोव्यात केवळ तृणमूल काँग्रेसच भाजपचा (BJP) पराभव करू शकतो. तळागाळातील गोमंतकीयांसाठी काम करू शकतो याची खात्री पटल्यामुळेच आपण तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) तृणमूल निश्चित भाजपचा पराभव करून गोव्यात नवी सकाळ उगवेल, असा ठाम विश्वास देसाई यांनी व्यक्त केला.
काँग्रेस हा विश्वासघातकी पक्ष आहे. सुमारे 20 वर्षे आपण काँग्रेससाठी काम केले. परंतु, 2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने काणकोणात आपल्याऐवजी दुसऱ्याच व्यक्तीला उमेदवारी दिली. पुढे तीच व्यक्ती जिंकून आल्यानंतर भाजपात गेली, असेही त्यांनी नमूद केले.
काणकोणातील (Canacona) काँग्रेस नेत्यांनी प्रवेश केल्यामुळे तृणमूल पक्ष आणखी बळकट झाला आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला फायदा होईल असेच निर्णय काँग्रेस घेत आहे. जनार्दन भंडारी यांना उमेदवारी देऊन काँग्रेसने ते सिद्धही करून दाखवले आहे. काँग्रेसकडे कोणतीही ध्येयधोरणे नाहीत. हे लक्षात येत असल्यामुळेच काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहेत, असेही बांदोडकर म्हणाल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.