सासष्टी : गोव्यातही असंख्य कारागीर आहेत जे स्वतःच्या हातांनी विविध वस्तु, कपडे तयार करतात. पण त्यांना उत्पादनाच्या विक्रीसाठी योग्य व्यासपीठ मिळत नाही. गोव्याचे ग्रामीण विकास मंडळ अशा कारागीरांना बाजारपेठ तसेच कलाकारांनाही योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘गोवा सरस’ प्रदर्शनाचे आयोजन करते. लोकांनी अशा कारागीरांना प्रोत्साहन देण्यासाठी या प्रदर्शनाला भेट देऊन त्यांच्या वस्तू विकत घ्याव्यात, असे आवाहन ग्रामीण विकास मंत्री गोविंद गावडे यांनी केले.
मडगावात एसजीपी़डीए मैदानावरील गोवा सरस २०२३ प्रदर्शनाचे उदघाटन केल्यावर ते बोलत होते. या प्रदर्शनाबरोबरच मनोरंजनाचीही व्यवस्था करण्यात आली असून अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे विविध क्षेत्रांतील कलाकारांनाही आपले अंगभूत गुण लोकांसमोर आणण्याची संधी मिळणार आहे, असे ते म्हणाले.
स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ग्रामीण विकास यंत्रणे मार्फत वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना विक्री केंद्र स्थापन करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही गावडे यांनी सांगितले.
वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी सांगितले, की स्थानिक उत्पादनाला वाव देणे अत्यंत महत्वाचे आहे. ग्राहकांनी त्यांच्या वस्तू खरेदी करून कारागीरांच्या आत्मविश्र्वासात आणखी भर टाकावी.
नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर यांनी सांगितले,की कारागीरांना आपली उत्पादने विकण्यासाठी सरकारने एक कायम स्वरुपी केंद्र उपलब्ध करून द्यावे. मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनीही विचार मांडले.रुपा च्यारी यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
२२० स्टॉल्स पैकी ७० गोमंतकीयांना
या प्रदर्शनात २२० स्टॉल्स असून त्यातील ७० गोमंतकीयांना दिलेले आहेत. तर बाकीचे स्टॉल्स देशभरातून विविध भागातून आलेल्या कारागीरांना दिल्याचे ग्रामीण विकास मंडळाचे संचालक प्रवीण बरड यांनी माहिती दिली. हे प्रदर्शन ३ एप्रिलपर्यंत दररोज सकाळी १० ते रात्री १० पर्यंत खुले असेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.