पणजी: राज्य मंत्रिमंडळातील फेरबदल महिनाभर लांबणीवर पडला आहे. आता २७ नोव्हेंबरनंतरच राज्य मंत्रिमंडळाच्या विषयाकडे भाजपचे दिल्लीतील श्रेष्ठी लक्ष देणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
राज्यात भाजपचे संघटनात्मक काम बळकट करण्यासाठी संघटन सचिव म्हणून पुन्हा सतीश धोंड यांना पाठविण्यावरही दिल्लीतील बैठकीत विचार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतरच गोव्याकडे लक्ष देऊ, असे दिल्लीत ठरविण्यात आले आहे. २७ नोव्हेंबरनंतर गोव्यात ‘मोठा फेरबदल़़’ करण्यावर लक्ष देऊ, असे भाजपच्या बैठकीत ठरले आहे. या बैठकीची कल्पना प्रदेश पातळीवर कोणत्याही नेत्याला दिली नव्हती. स्वतंत्रपणे मागविलेल्या विविध राज्यांच्या संदर्भातील अहवालांवर चर्चा झाली. त्यात गोव्याचाही समावेश होता.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘विकसित गोवा’ हे लक्ष्य गाठण्यासाठी मंत्रिमंडळ फेरबदलाची गरज असल्याचे वक्तव्य केल्याची दखलही या बैठकीत घेण्यात आली. संघटनात्मक व सरकारी पातळीवर भाजप मजबूत करण्यासाठी मोठा फेरबदल करण्याची गरज या बैठकीत व्यक्त करण्यात आली. त्यानुसार २७ नोव्हेंबरनंतर हा फेरबदल विचारात घेऊ, असे ठरविले आहे. सध्या पक्ष सदस्यत्व मोहीम सुरू आहे. त्याच्या प्रगतीबाबत राज्यात संघटनात्मक पातळीवर सुरू असलेल्या प्रयत्नांचा आढावाही या बैठकीत घेण्यात आला.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी आज एका पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी मतदान तर २३ रोजी मतमोजणी होईल. झारखंड हे नक्षलप्रभावित राज्य असल्याने दोन टप्प्यांत मतदान होणार असून महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेची कोणतीही अडचण नसल्याने एकाच टप्प्यात मतदान घेण्यात येईल, असेही राजीवकुमार यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील २८८ तर झारखंडमधील ८१ मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रात अनुसूचित जातीसाठी २९ मतदारसंघ तर अनुसूचित जमातीसाठी २५ मतदारसंघ राखीव आहेत. झारखंडमध्ये अनुसूचित जातीसाठी ९ तर अनुसूचित जमातीसाठी २८ मतदारसंघ राखीव आहेत. नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी २० नोव्हेंबरला मतदान होईल.
राज्यात जिल्हा पंचायत निवडणूक, पालिका निवडणूक आणि त्यानंतर येणारी विधानसभा निवडणूक पाहता संघटनात्मक पातळीवर बरेच काम करावे लागणार असल्याचे मत या बैठकीत व्यक्त करण्यात आले. यासाठी सध्या कोकणातील संघटनात्मक कामाची जबाबदारी दिलेले सतीश धोंड यांना पुन्हा गोव्यात पाठविण्याविषयी चर्चा करण्यात आली. भाजपच्या काही नेत्यांनी सद्यस्थितीत धोंड हेच भाजपला विजयापर्यंत नेऊ शकतात, अशी माहिती दिल्लीपर्यंत पोचविली आहे. त्याची दखलही घेण्यात आली आहे.
राज्यातील विविध मंत्री, मुख्यमंत्री, संघटनेचे पदाधिकारी यांच्याबाबत पक्षश्रेष्ठींनी अहवाल तयार करवून घेतले आहेत. राज्यात अलीकडच्या काही महिन्यांत निर्माण झालेले प्रश्न, सामाजिक संघटनांचे त्याबाबतचे म्हणणे, त्याचा भाजप सरकारच्या प्रतिमेवर झालेला परिणाम या साऱ्यांचा आढावा या बैठकीत इतर राज्यांविषयी चर्चा करतानाच घेण्यात आला. त्यातून गोव्यात मोठा फेरबदल करावा लागणार आहे, यावर एकमत झाले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.