

पणजी: गोव्यात लवकरच इलॉन मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचे हायस्पीड इंटरनेट पोहोचणार आहे. याबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नुकतेच स्टारलिंकच्या लॉरेन ड्रेयर यांच्याशी चर्चा याबाबत चर्चा केली. स्टारलिंक गोव्यात दाखल झाल्यास राज्यातील खेड्यापाड्यात आणि दुर्गम भागात हायस्पीड इंटरनेट सेवा मिळण्यास मदत होणार आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि स्टारलिंक (स्पेसएक्स) कंपनीच्या मुख्य कामकाज अधिकारी लॉरेन ड्रेयर यांच्यात नुकतीच एक बैठक पार पडली. यावेळी माहिती आणि तंत्रज्ञान व पर्यटन मंत्री रोहन खंवटे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
राज्यात स्टारलिंकचे हायस्पीड इंटरनेट कार्यान्वित करण्याबाबत यावेळी त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. स्टारलिंकच्या उपग्रह आधारीत इंटरनेट प्रणालीमुळे राज्यातील खेड्यापाड्यात आणि दुर्गम भागात हायस्पीड इंटरनेट सेवा मिळण्यास मदत होणार आहे.
राज्यात शाळा, आरोग्य केंद्र, किनारी आणि मत्स्य व्यावसायातील समुदाय, दुर्गम क्षेत्रात इंटरनेट सेवा मिळाल्यास डिजिटल गोवा व्हिजनला बळकटी मिळणार आहे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
यामुळे राज्यातील ग्रामीण कनेक्टिव्हिटी, डिजिटल नोमॅड, आरोग्य, शिक्षण, पर्यटन, सागरी कामकाज आणि दुर्घटना व्यवस्थापन यासंबधित सुधारणा आणि शक्यता अधिक वाढणार आहेत.
स्टारलिंक भारतात उपग्रह आधारीत इंटरनेट सेवा देण्यासाठी शक्यतांची चाचपणी करत आहेत. विविध राज्यात कंपनीच्या वतीने चर्चा करुन संभाव्य शक्यता तपासून पाहिल्या जात आहे. याचाच भाग म्हणून लॉरेन यांनी गोवा तसेच गुजरातमध्ये देखील मुख्यमंत्र्याशी याबाबत चर्चा केली.
यापूर्वी लॉरेन यांनी केंद्रीय दळणवळण आणि ईशान्य प्रदेश विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची देखील भेट घेऊन स्टारलिंक इंटरनेट सेवा सुरु करण्याबाबत चर्चा केली. इलॉन मस्क यांनी देखील या भेटीवर भाष्य करत लवकरच भारतात सेवा सुरु करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले.
दरम्यान, भारतात अद्याप स्टारलिंकची हायस्पीड इंटरनेट सेवा सुरु झालेली नाही. याबाबत माहिती देताना लॉरेन ड्रेयर म्हणाल्या की, स्टारलिंक इंडियाची वेबसाइट लाइव्ह झालेली नाही, भारतातील ग्राहकांसाठी सेवा किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, त्यामुळे भारतातील ग्राहकांकडून आम्ही ऑर्डर घेत नाहीयेत.
पण, आम्ही भारतातील लोकांना स्टारलिंकच्या हाय-स्पीड इंटरनेटशी जोडण्यास उत्सुक आहोत असे लॉरेन म्हणाल्या. आमची टीम सेवा सुरू करण्यासाठी अंतिम सरकारी मान्यता मिळविण्यावर लक्ष केंद्रित करत असल्याचेही लॉरेन म्हणाल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.