South Goa : दक्षिणेतील ‘इंडिया’चा विजय कोणामुळे? चर्चेला उधाण

South Goa : बहुतेक जणांकडून हा कुणा वैयक्‍तिक व्‍यक्‍तींचा विजय नसून लोकांच्‍या सामूहिक शक्‍तीचा विजय, अशा प्रतिक्रिया व्‍यक्‍त केल्‍या जात आहेत.
South Goa
South Goa Dainik Gomantak
Published on
Updated on

South Goa :

मडगाव, भाजपच्‍या १५ आमदारांच्‍या विरोधात ‘इंडिया’ आघाडीच्‍या ‘पाच पांडवांनी’ तोडीस तोड युद्ध केल्‍याने दक्षिण गोव्‍यात काँग्रेसची सरशी झाली की कोणतेही प्रयत्‍न न करता मतदार स्‍वत:हून घराबाहेर येऊन मतदान केल्‍यामुळे कारगील हिरो असलेले काँग्रेसचे उमेदवार कॅ. विरियातो फर्नांडिस यांचे ‘मिशन विजय’ यशस्‍वी ठरले? लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्‍यानंतर या प्रश्‍नाने आणि चर्चेने आता जोर धरला आहे.

बहुतेक जणांकडून हा कुणा वैयक्‍तिक व्‍यक्‍तींचा विजय नसून लोकांच्‍या सामूहिक शक्‍तीचा विजय, अशा प्रतिक्रिया व्‍यक्‍त केल्‍या जात आहेत.

कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी काल प्रसारमाध्‍यमांना प्रतिक्रिया देताना, इंडिया आघाडीच्‍या पाच पांडवांनी आपल्‍याला खंबीर पाठिंबा दिल्‍याने हा विजय सूकर झाला असे वक्‍तव्‍य केले होते. हे पाच पांडव म्‍हणजे, काँग्रेसचे आमदार युरी आलेमाव व एल्‍टन डिकॉस्‍टा, ‘आप’चे दोन आमदार व्‍हेंझी व्‍हिएगस व क्रुझ सिवा आणि फातोर्ड्याचे गोवा फॉरवर्डजं आमदार विजय सरदेसाई हे होत.

युरी आलेमाव यांच्‍या कुंकळ्‍ळी मतदारसंघात काँग्रेसने यावेळी ६५७२ मतांची आघाडी घेतली. हल्‍लीच्‍या काळातील काँग्रेसला या मतदारसंघात मिळालेली ही सर्वांत मोठी आघाडी ठरली. विजय सरदेसाई यांच्‍या फातोर्डा मतदारसंघात काँग्रेसला २४३७ मतांची आघाडी प्राप्‍त झाली आहे. परंपरेने काँग्रेसधार्जिणे असलेले पण सध्‍या आम आदमी पक्षाचे आमदार असलेल्‍या बाणावली आणि वेळ्‍ळी या दोन मतदारसंघांत काँग्रेसने अतिप्रचंड म्‍हणावी अशी आघाडी घेतली आहे.

South Goa
Goa Accident: कदंब बस आणि मालवाहू जीप यांच्यात समोरासमोर धडक; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही!

त्‍यात व्‍हेंझी व्‍हिएगस प्रतिनिधीत्‍व करत असलेल्‍या बाणावली मतदारसंघातील आघाडी १४,१८१ एवढी असून क्रूझ सिल्‍वा प्रतिनिधीत्‍व करत असलेल्‍या वेळ्‍ळी मतदारसंघात मिळालेली आघाडी १३,३५० एवढी आहे.

याच पाच मतदारसंघांनी काँग्रेसला दिलेली आघाडी ही आश्‍‍वस्‍त करणारी असली, त्‍यात आमदारांचा वाटा असला तरी लोकांनी उत्‍स्‍फूर्तपणे येऊन केलेले मतदान अधिक कारणीभूत आहे अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते विवेक नाईक यांनी व्‍यक्‍त केली.

ते म्‍हणाले, हे मतदान काँग्रेससाठी जरी असले तरी लोकांनी प्रत्‍यक्षात भाजपच्‍या विरोधात केलेले हे मतदान आहे. या मतदारांना बाहेर आणण्‍यासाठी आमदारांनी स्‍वत:हून फारसे प्रयत्‍न केलेले आहेत असे वाटत नाही. दक्षिण गोव्‍यातील हा विजय मतदारांचा असून काँग्रेसने हा स्‍वत:चा विजय असे मानून घेण्‍याची चूक करू नये.

भाजपच्‍या राजवटीला लोक कंटाळले होते

काँग्रेसचे सदस्‍य असलेले योगेश नागवेकर यांनीही या विजयाचे श्रेय मतदारांना देताना, लोक भाजपच्‍या राजवटीला कंटाळले होते. त्‍यांनी भाजपच्‍या विरोधात मतदान करुन आपल्‍या रोषाला एकप्रकारे वाट करुन दिली असे सांगितले.

गोव्‍यात भाजपची दादागिरी वाढली होती. त्‍यामुळेच लोकांनी असे उत्‍स्‍फूर्तपणे मतदान केले, अशी प्रतिक्रिया त्‍यांनी व्‍यक्‍त केली. तर, फातोर्ड्यातील आणखी एक सामाजिक व राजकीय कार्यकर्ते असलेले मेल्‍विन फर्नांडिस यांनी, लोकशाहीत मतदार हाच राजा असतो हेच या निकालाने दाखवून दिले आहे. राजकीय नेत्‍यांनी ठरविले म्‍हणून कुणी ‘पार’ होऊ शकत नाहीत अशी प्रतिक्रिया त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

पर्यावरण, सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांचा हा ठरला मोठा विजय

कॅ. विरियातो फर्नांडिस हे विजयी होण्‍यामागे अनेक कारणे आहेत. गोव्‍यातील सामाजिक आणि पर्यावरण चळवळही यासाठी कारणीभूत आहे असे मत राजकीय विश्‍‍लेषक ॲड. क्‍लिओफात आल्‍मेदा कुतिन्‍हो यांनी व्‍यक्‍त केले.

ते म्‍हणाले, सुरूवातीला हे चळवळीतील कार्यकर्तेच कॅ. फर्नांडिस यांच्‍याबरोबर होते. त्‍यांनीच त्‍यांच्‍या प्रचारात हिरीरिने सहभाग घेतला. तम्‍नार प्रक़ल्‍पाला असलेला विरोध, कोळसा विरोधी आंदोलन, रेल्‍वे दुपदरीकरणाला विरोध अशी अनेक कारणे आहेत, जी फर्नांडिस यांच्‍या विजयासाठी कारणीभूत ठरली असे ते म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com