Goa Police: बिग बॉस फेम आणि पूर्व भाजप नेत्या सोनाली फोगट यांच्या मृत्यूप्रकरणी गोवा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पोलिसांनी सुधीर सागवान आणि सुखविंदर वासी यांना अटक केली आहे. सुधीर सागवान हा सोनाली फोगट यांचा पीए आहे. त्यानेच फोगट यांना रुग्णालयात दाखल केले होते.
दरम्यान, सोनाली फोगट (Sonali Phogat) यांचा भाऊ रिंकू ढाका याने सुधीर आणि सुखविंद यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. गुरुवारी सोनाली यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. पोस्टमॉर्टम रिपोर्ट थक्क करणारा होता. त्यांच्या शरीरावर जखमा आढळून आल्या. सोनाली यांच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, पोस्टमॉर्टमनंतर सुधीर सागवान आणि सुखविंदर वासी यांच्या विरोधात कलम 302 (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
कुटुंबीयांना सुधीरवर संशय का होता?
सोनाली यांचा मृत्यू झाल्यापासून त्यांचे कुटुंबीय सुधीर सागवानवरच संशय घेत आहेत. सुधीरनेच सोनाली यांना रुग्णालयात (Hospital) दाखल केले होते. सुधीर सोनालीला अंमली पदार्थ देत असे आणि तिचे शारीरिक शोषण करत असे, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तो सोनालीला धमक्याही देत होता. मालमत्ता हडपण्यासाठी तिच्या सुधीरनेच सोनालीची हत्या केल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
दुसरीकडे, सोनाली यांच्या भावाने सांगितले की, 'एकदा सोनाली म्हणाली होती की, सुधीरने मला जेवणात खीर दिली होती. आणि त्यानंतरच माझी तब्येत बिघडली होती. या प्रकरणात सुधीर प्रश्नांची योग्य उत्तरे देऊ शकला नाही. त्याचबरोबर सोनालीच्या घरातही अनेक वेळा चोरी झाली होती. त्यात तिची महत्त्वाची कागदपत्रे गायब झाली होती.' कुटुंबीयांचा आरोप आहे की, 'ती स्वत:च्या इच्छेनुसार कुटुंबाशी बोलूही शकत नाही.'
तसेच, गुरुवारी सोनाली फोगट यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. त्यासंबंधी संपूर्ण व्हिडिओग्राफीही करण्यात आली आहे. यावेळी सोनाली यांचा भाऊ आणि मेहुणा अमन पुनिया रुग्णालयात होते. एफआयआर नोंदवल्यानंतर चौकशी आणि तपास केला जाईल, असे डीजीपींनी म्हटले आहे.
पतीचाही मृत्यू झाला होता
Tiktok द्वारे आपला ठसा उमटवणारी सोनाली फोगट भूथन कलां ची रहिवासी होत्या. त्यांचे लग्न संजय फोगट यांच्याशी झाले होते. त्यांना एक मुलगीही आहे. 2016 मध्ये संजय यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह फार्म हाऊसमध्ये आढळून आला होता. बिग बॉसमध्ये सोनाली यांनी पतीच्या निधनानंतर आपण तुटल्याचे सांगितले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.