
Tourist Spa Experience In Goa: गोव्यात पर्यटनासाठी येणाऱ्यांना 'स्पा'च्या नावाखाली (Spa Services) मोठ्या फसवणुकीचा (Fraud) सामना करावा लागत असल्याची एक गंभीर आणि धक्कादायक बाब समोर आली आहे.
एका पर्यटकाने आपल्या चुलत भावासोबत गोव्यात स्पा शोधताना आलेला अत्यंत वाईट आणि भीतीदायक अनुभव सोशल मीडिया रेडीट या प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे, ज्यामुळे गोव्यातील काही 'स्पा' केंद्रांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या घटनेवर अनेक युझर्संनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या असून त्यात अशा 'स्पा' केंद्रांमागे वेश्याव्यवसाय (Prostitution) आणि अंमली पदार्थांचा (Drugs) गोरखधंदा सुरु असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
दरम्यान, बंगळूरुहून (Bengaluru) गोव्यात विकेंडसाठी (Weekend) आलेल्या एका पर्यटकाने आपल्याला आलेल्या अनुभवाविषयी सांगितले. गोव्यातून निघण्यापूर्वी त्यांनी स्पामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. गुगलवर (Google) चांगल्या रेटिंग्स (Ratings) आणि फोटोंसह दिसणाऱ्या एका स्पा सेंटरची निवड त्यांनी केली.
मात्र, जेव्हा त्यांनी दिलेल्या क्रमांकावर फोन केला, तेव्हा त्यांना सांगण्यात आले की, स्पाचे ठिकाण (Location) बदलले असून, नवीन ठिकाण त्यांच्या सध्याच्या ठिकाणापासून फार दूर नाही.
पर्यटक आणि त्याचे चुलत भाऊ नवीन पत्त्यावर पोहोचले. तिथे त्यांना 'लोटस थाई स्पा' (Lotus Thai Spa) नावाचे ठिकाण दिसले, (जे गुगलवर दिसणाऱ्या नावापेक्षा वेगळे होते).
आत पाऊल टाकताच, त्यांना आपल्या निर्णयाचा पश्चात्ताप झाला. कारण, "ते ठिकाण शंकास्पद आणि असुरक्षित होते. तिथे अत्यंत 'चीप क्राउड' होता," असे पर्यटकाने म्हटले. त्यांनी केवळ 5 मिनिटांत ते ठिकाण सोडले.
दरम्यान, या घटनेने धक्का बसूनही त्यांनी इतर स्पा शोधायला सुरुवात केली आणि काही ठिकाणी फोन केले. तेव्हा त्यांना जो अनुभव आला, तो अधिक धक्कादायक होता. त्यांनी शोधलेल्या गुगलच्या टॉप रिझल्ट्समधील (Top Results) सर्व स्पा (ALL THE SPAS) एकच असल्याचे त्यांना आढळले! "होय, सर्व स्पा तेच होते," असे पर्यटकाने सांगितले.
हे स्पा वेगवेगळी नावे, ठिकाणे आणि विविध फोटोंसह सूचीबद्ध (Listed) असले तरी, जेव्हा त्यांना फोन केला, तेव्हा प्रत्येक वेळी तेच संभाषण ऐकायला मिळाले, 'ठिकाण बदलले आहे, नवीन पत्ता पाठवतो.' याचा अर्थ असा की, वेगवेगळ्या नावांनी आणि फोटोंनी सूचीबद्ध केलेली ही सर्व स्पा केंद्रे प्रत्यक्षात एकच होती आणि ती लोकांना चुकीच्या ठिकाणी बोलावून फसवण्याचा प्रयत्न करत होती.
यावर त्या दोघांनी फोनवर स्पष्टपणे विचारण्यास सुरुवात केली की, 'तुम्ही 'लोटस थाई स्पा'चे आहात का?' यावर ती व्यक्ती धाडसाने नकार देत होती, पण नंतर पुन्हा तेच बदललेल्या ठिकाणाचे कारण सांगत होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, नवीन ठिकाण नेहमी त्याच 'शॅडी' स्पाचे असायचे.
पुढे त्यांनी काही जणांना स्पाचे फोटो पाठवण्यास सांगितले, तेव्हा त्यांना चक्क मुलींचे फोटो (Pictures of Girls) पाठवण्यात आले. त्यापैकी एकाने तर असेही म्हटले की, जर 'लोटस थाई स्पा' त्यांना 'शॅडी' वाटत असेल, तर त्यांच्याकडे एक खासगी व्हिला (Private Villa) देखील आहे, जिथे ते 'हवी ती कोणतीही सेवा' पुरवू शकतात.
दरम्यान, हा अनुभव "अत्यंत निराशाजनक, गोंधळात टाकणारा आणि प्रामाणिकपणे सांगायचे तर भीतीदायक होता," असे पर्यटकाने म्हटले. त्यांनी लोकांना गोव्याला भेट देताना या घोटाळ्याबाबत सावध राहण्याचे आवाहन केले. त्यांनी नमूद केले की, 'लोटस थाई स्पा' हे नाव गुगलवर सूचीबद्ध नसले तरी इतर 50 नावांनी ते तिथे दिसू शकतात.
या घटनेवर एका युझरने सांगितले की, "जगभरातील पर्यटन स्थळांवर, विशेषतः ज्या स्पाच्या नावांमध्ये 'थाई' किंवा 'मोरोक्कन' असे शब्द असतात, ती अनेकदा वेश्याव्यवसाय आणि अंमली पदार्थांसाठीचा एक मुखवटा असतात. दुबई, कानकुन, ऑस्ट्रेलिया किंवा जपानमध्येही हेच आहे."
यावर इतर युझर्संनी, "हा गोव्यात अनेक वर्षांपासून स्पाच्या नावाखाली चालणारा एक मोठा घोटाळा आहे," असे म्हटले. तसेच, त्यांनी 'तत्त्व स्पा' (Tattva Spa) किंवा कोणत्याही 5-स्टार हॉटेलमधील स्पा वापरण्याचा सल्ला दिला, कारण ते विश्वसनीय मानले जातात. 'तत्त्व स्पा' ही मेट्रो शहरांमध्ये असलेली एक चेन असून, ती सहसा 5-स्टार हॉटेलमध्ये किंवा चांगल्या वैयक्तिक प्रॉपर्टीमध्ये असतात, असेही नमूद करण्यात आले.
दुसरीकडे, या गंभीर प्रकारामुळे गोव्यातील पर्यटन क्षेत्राला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. प्रशासनाने (Administration) अशा बेकायदेशीर आणि फसवणूक (Fraud) करणाऱ्या 'स्पा' केंद्रांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरु शकते, जेणेकरुन गोव्याची एक सुरक्षित पर्यटन स्थळ म्हणून असलेली प्रतिमा जपली जाईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.