

डिचोली: शिवसेना राज्यप्रमुख उपेंद्र गावकर यांच्यावर शिरगाव येथे गोळीबार करून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघा पुतण्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्राणघातक हल्ला प्रकरणात डिचोली पोलिसांनी प्रज्योत उर्फ शिरीष लक्ष्मण गावकर आणि गिरीश लक्ष्मण गावकर या संशयितांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना १० दिवसांची पोलिस कोठडी बजावली आहे.
संशयितांनी गोळीबारासाठी वापरलेली बंदूक आणि काडतुसे पोलिसांनी जप्त केली असून ही बंदूक विनापरवाना असल्याची माहिती मिळाली आहे. शुक्रवारी रात्री मधलावाडा-शिरगाव येथे उपेंद्र गावकर यांच्यावर त्यांच्या पुतण्यांनी कौटुंबिक वादातून खुनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा संशय आहे. या घटनेमुळे शिरगावात खळबळ उडाली आहे.
गोळीबार झाल्यानंतर घरातून स्वत:ची सुटका करून घेतल्यानंतर उपेंद्र यांनी थेट डिचोली पोलिस स्थानक गाठले. त्यांनी घडलेला प्रसंग कथन केल्यानंतर पोलिसांनी लगेच कारवाई सुरू केली. पोलिसांनी रात्रीच शिरगावात गोळीबार केल्याप्रकरणी प्रज्योत आणि त्याचा भाऊ गिरीश यांना ताब्यात घेतले.
तर मध्यरात्री पोलिसांच्या फॉरेन्सिक विभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पुरावे गोळा केले. याप्रकरणी पोलिसांनी ‘बीएनएस’ कायद्याच्या १०९, ११५(२), २९६, ३२९(३), ३३१(४), ३३३, ३२४ (४), ३५१(३) रीड विथ ६१(२) आणि शस्त्र कायद्याच्या ७ आणि २५ कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली डिचोली पोलिस पुढील तपास करीत आहेत.
प्रसंगावधान राखल्यामुळे गावकर बचावले
धोका ओळखून उपेंद्र गावकर यांनी वेळीच घरातून पळ काढल्यामुळे ते या हल्ल्यातून बालंबाल बचावले. तर त्यांच्या पत्नीने घराच्या मागील दारातून पळ काढला. त्यामुळे उपेंद्र आणि त्यांच्या पत्नी सुखरूप बचावल्या. भर लोकवस्तीत रात्रीच्यावेळी गोळीबार झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. नेमके काय झाले त्याची लोकांना काहीच माहिती नव्हती.
एक गोळी दरवाजात, दुसरी गोळी भिंतीत
शुक्रवारी रात्री उपेंद्र यांचा पुतण्या प्रज्योतने उपेंद्र यांच्यावर हल्ला केला. प्रज्योतने बंदुकीच्या दोन गोळ्याही झाडल्या. पैकी एक गोळी उपेंद्र यांच्या घराचा मुख्य दरवाजा फोडून आत घुसली. तर दुसरी गोळी भिंतीत घुसली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.