

वाळपई: यंदाच्या पावसाने दडी मारल्याने सत्तरी तालुक्यातील भातशेती संकटात सापडली आहे. जुलै महिना अर्धा होत आला तरी अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतातील ओलावा कमी होत चालला आहे. त्यामुळे भात पिकाच्या वाढीवर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, तालुक्यात यंदा ३० टक्के क्षेत्रातच भात लागवड करण्यात आली आहे.
जून महिन्यातही पावसाचा जोर कमी राहिल्याने नांगरणी, बी पेरणी आणि रोपलागवडीची कामे उशिराने सुरू झाली. काही दिवस पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी कामांना सुरुवात केली; मात्र सातत्याने पाऊस न झाल्याने अनेक ठिकाणी लागवड रखडली आहे. काही शेतकऱ्यांनी थेट बी पेरणी केली असून काहींनी बाहेरील भागांतून रोपे आणून लागवड केली आहे.
भात पिकासाठी सतत ओलसर जमीन आणि पुरेसे पाणी आवश्यक असते. मात्र यंदा शेतात आवश्यक चिखल व ओलावा निर्माण झालेला नाही. त्यामुळे तीन ते चार महिन्यांच्या भात उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सत्तरीतील काही भागांत जमिनीचा प्रकार वेगवेगळा असल्याने पाणी टिकून राहण्याचे प्रमाण बदलते.
मात्र गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत आहे. पुढील काही दिवस पाऊस न झाल्यास आधीच लागवड झालेल्या पिकांवरही संकट येऊ शकते. सध्या सत्तरीत केवळ सुमारे ३० टक्के क्षेत्रावर भात लागवड झाली आहे. बदलते हवामान, मजुरांची कमतरता, वाढता खर्च आणि पावसाची अनिश्चितता यामुळे भातशेतीचे क्षेत्रही कमी होत आहे.
दरम्यान, ‘ज्योती’ जातीचे भातपीक सुमारे तीन महिन्यांत तर ‘जया’ जातीला साडेतीन ते चार महिने लागतात. पुढील काळात पाऊस उशिरा झाल्यास दाणे भरण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होऊन उत्पादन घटण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.