

वाळपई: सत्तरी तालुक्यात यंदाचा काजू हंगाम जोरदार बहरला असून पारंपरिक फेणी आणि हुराक उत्पादनाला मोठी चालना मिळाली आहे. संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण असून शेतकरी आणि भट्टीधारकांसाठी हा हंगाम लाभदायक ठरत आहे.
तालुक्यात सध्या ३००हून अधिक परवानाधारक पारंपरिक भट्ट्या सुरू असून दिवस-रात्र फेणी आणि हुर्राक निर्मिती सुरू आहे. अनुकूल हवामानामुळे काजूचे भरघोस उत्पादन झाले असून प्रक्रियेला वेग आला आहे. सत्तरीतील सुमारे ७० टक्के क्षेत्र काजू बागांनी व्यापलेले असून काजू हेच येथील प्रमुख उत्पन्नाचे साधन आहे.
वाढत्या महागाईमुळे कामगार, साफसफाई आणि इतर खर्च वाढले असले तरी शेतकरी मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. कलमाच्या झाडांमुळे उत्पादन वाढत असले तरी गावठी काजू झाडांपासून मिळणाऱ्या टिकाऊ आणि दर्जेदार बोंडूंमुळे शेतकरी मिश्र पिकावर भर देताना दिसत आहेत.
दरम्यान, राज्य सरकारलाही या हंगामातून आबकारी महसुलात वाढ होत आहे. वाळपई येथील अबकारी विभागाच्या माहितीनुसार, फेणी-हुर्राक उत्पादनामुळे महसुलात लक्षणीय वाढ झाली आहे. कच्च्या काजू बोंडूंची मागणी वाढल्याने कर्नाटकातील कणकुंबीसारख्या भागांतून बोंडूंची आयातही सुरू आहे.
इतिहास पाहता, गोवा मुक्तीनंतर माजी मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांनी काजू लागवडीला प्रोत्साहन दिल्यामुळे रोजगारनिर्मिती आणि मृद्स्खलन रोखण्यास मदत झाली. त्याचा सकारात्मक परिणाम आजही जाणवतो.
ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ
१) शासनाच्या ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ योजनेमुळे सिंचन सुविधा वाढून पडीक जमीन लागवडीखाली आली आहे. कृषी खात्याकडून मिळणाऱ्या अनुदानामुळे तरुण पिढी शेतीकडे वळताना दिसत आहे.
२) एकूणच, काजू उत्पादन, पारंपरिक उद्योग आणि सरकारी योजनांचा संगम सत्तरीच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ देत असून हा हंगाम खऱ्या अर्थाने ‘सुवर्णसंधी’ ठरत आहे.
‘जीआय टॅग’मुळे उत्पादनाला योग्य दर
युवा शेतकरी योगेश देसाई यांचा आदर्श विशेष ठरतो. त्यांनी पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत काजू भट्टीतून हुर्राक आणि फेणी तयार केली आहे. त्यांच्या उत्पादनाला नुकताच ‘जीआय टॅग’ मिळाल्याने सत्तरीत ते वेगळे स्थान मिळवणारे ठरले आहेत. ‘‘यंदा उत्पादन चांगले असले तरी हवामानाचा काहीसा परिणाम झाला आहे. ‘जीआय टॅग’मुळे उत्पादनाला योग्य दर मिळेल, अशी अपेक्षा आहे,’’ असे योगेश देसाई यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.