
मडगाव: २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत गोव्यात पूर्णत: भाजपविरोधी वातावरण होते. त्यामुळेच शेवटच्या क्षणी भाजपने सतीश धोंड यांना गोव्यात आणले आणि धोंड यांनी जी राजकीय ‘गिमिक्स’ केली त्यामुळेच भाजपचे २० आमदार जिंकून येऊ शकले, असे मत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी व्यक्त केले.
‘गोमन्तक टीव्ही’च्या ‘साष्टीकार’ या लोकप्रिय कार्यक्रमात चोडणकर बोलत होते. गोव्यातील (Goa) ख्रिस्ती मते काहीही केले तरी भाजपच्या बाजूने जाणार नाहीत याची पूर्ण कल्पना सतीश धाेंड यांना होती. त्यामुळे त्यांनी ‘आरजी’ या नव्या पक्षाला जन्माला आणले आणि आम्हीच गोव्याचे खरे रक्षणकर्ते असा आव ‘आरजी’ने लोकांसमोर आणला. त्यामुळे काँग्रेसच्या पारंपरिक मतांमध्ये फूट पडली. ही निवडणूक बहुपक्षीय व्हावी यासाठी भाजपनेच गोव्यात तृणमूल पक्षालाही रिंगणात उतरवले, असा आरोपही चोडणकर यांनी केला.
२०२२ च्या निवडणुकीत भाजपची घटलेल्या मतांची टक्केवारी काँग्रेसपेक्षा जास्त होती. मात्र, काँग्रेसची मते दुसरीकडे कशी जातील याची पूर्ण व्यूहरचना सतीश धाेंड आणि इतर भाजप नेत्यांनी तयार करून ठेवली होती. त्यामुळे मतांची टक्केवारी घटलेली असतानाही त्यांच्या आमदारांची संख्या वाढली. काँग्रेसचे (Congress) किमान सात उमेदवार अगदी कमी मताधिक्क्याने पराभूत झाले. त्यावेळी मी प्रदेश काँग्रेस समितीचा अध्यक्ष होतो. आतासुद्धा भाजपविरोधी वातावरण आहे. सर्व विराेधक एका छताखाली आले तर भाजपविराेधी ताकद अधिक बळकट होईल आणि गोव्यातून सध्याचे हे भ्रष्ट भाजप सरकार हद्दपार होईल.
सध्याच्या भाजप सरकारविरुद्ध लाेकांमध्ये प्रचंड खदखद आहे. मात्र, त्या खदखदीला वाट करून द्यायची असेल तर काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेऊन रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. तसे केले तर सत्ताधारी घाबरून जातील आणि कित्येक नवीन युवक काँग्रेसच्या बाजूने आकर्षित होऊ शकतील, असे मत गिरीश चोडणकर यांनी व्यक्त केले. या रणनीतीची लवकरच सुरुवात केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.