Sanquelim Municipality Election 2023 : साखळी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीत वातावरण तापत असताना सत्ताधारी ‘टुगेदर फॉर साखळी’ गटातील माजी नगराध्यक्ष नगरसेवक रियाझ खान यांनी बुधवारी १२ रोजी भाजपमध्ये प्रवेश केला.
सकाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी त्यांची महत्वाची बैठक झाली होती. या घडामोडीमुळे साखळीतील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.
याशिवाय एक नगरसेवक ज्यांची पत्नी सध्या नगरसेविका आहे, असा एक माजी नगराध्यक्ष भाजपच्या गळाला लागला आहे. त्यांना त्यांच्या पारंपरिक प्रभागांमध्ये भाजपने उमेदवारी निश्चितही केली आहे.
आता पक्षाचे काम करा व स्वतःबरोबर इतरही उमेदवारांना निवडून आणा, अशी सूचना या दोन्ही नेत्यांना मुख्यमंत्र्यांनी दिली आहे, असे सूत्रांनी सांगितले.
भाजपच्या वाटेवर असलेल्यांचे स्वागतच !
राज्यात भाजपचे सरकार सत्तेवर आहे, या सरकारचे कार्य लक्षात घेऊन अनेकजण भाजपच्या वाटेवर आहेत. त्यांचे पक्षात स्वागतच आहे,असे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी सांगितले.
नगरसेवक गेल्याचा फरक पडणार नाही !
आमच्या गटातील दोन नगरसेवक भाजपात गेले म्हणून काहीच फरक पडत नाही. ते नगरसेवक पूर्वीपासूनच भाजपच्या संपर्कात होते. एकाने तर गेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री सावंत यांना थेट पाठिंबा दिला होता.
त्यांच्या दोन्ही प्रभागातील मतदार आमच्याबरोबर आहेत. त्यामुळे आमच्या उमेदवारालाच मतदार निवडून देतील, असा टुगेदर फॉर साखळीचे विश्वास प्रवीण ब्लेगन व नगराध्यक्ष राजेश सावळ यांनी व्यक्त केला.
उमेदवारांची घोषणा उद्या : मुख्यमंत्री
साखळी नगरपालिकेच्या या निवडणुकीत आमच्याकडे सहा प्रभागांमध्ये उमेदवार आहेत. तर सहामध्ये उमेदवार उभे करायचे आहेत. उद्यापर्यंत (गुरू. दि. १३) हे सर्व उमेदवार निश्चित होतील. शुक्रवारी प्रदेशाध्यक्ष हे उमेदवार जाहीरही करतील.
भाजपने ही निवडणूक गांभिर्याने घेतली आहे. साखळीचा मास्टरप्लॅन पन्नास टक्के मार्गी लावला आहे, उर्वरित पालिकेवर सत्ता येताच पूर्ण करू, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.
रियाझ खान भाजपमध्ये प्रवेश
साखळी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष, नगरसेवक रियाझ खान यांनी बुध. दि. १२ एप्रिल रोजी रात्री एका बुथ बैठकीत भाजपमध्ये प्रवेश केला. प्रभाग क्र. ८ चे निरीक्षक विश्वंभर गावस यांनी रियाझ खान यांना भाजप पक्षाची शाल पांघरून पक्षात स्वागत केले.
यावेळी बुथ अध्यक्ष राधिका कामत सातोसकर उपस्थित होत्या. दोन टुगेदर फॉर साखळीचे नगरसेवक भाजपच्या संपर्कात आल्याने ते भाजपात प्रवेश करू शकतात, अशी माहिती मिळाली होती. तर या दोन्ही नेत्यांनी सकाळीच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी बैठकीत चर्चही केली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.