Goa Ancient History: अश्मयुगीन दगडी हत्यारे, नैसर्गिक गुहा अन् दगडी वर्तुळे; पालयेच्या पठारात दडला प्राचीन इतिहास!

Prehistoric Human Presence in Palye Goa: अश्मयुगीन दगडी हत्यारे आणि पुरातत्व शास्त्राच्या अभ्यासकांना पोषक अशा वेगवेगळ्या गोष्टी प्रामुख्याने आढळत असल्याने, या पठाराचे महत्त्व दृष्टीस पडत आहे.
Prehistoric Human Presence in Palye Goa
Goa Ancient HistoryDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

राजेंद्र पां. केरकर

अश्मयुगीन दगडी हत्यारे आणि पुरातत्व शास्त्राच्या अभ्यासकांना पोषक अशा वेगवेगळ्या गोष्टी प्रामुख्याने आढळत असल्याने, या पठाराचे महत्त्व दृष्टीस पडत आहे. नैसर्गिक गुहा, दगडी वर्तुळे तसेच पालयेच्या देवसूच्या माथ्यावरती असलेल्या दुसऱ्या पठारावरच्या नवलो फातर या पुरातत्त्वीय महत्त्व असलेल्या आणखी एका स्थळाचा अभ्यास करण्याची नितांत गरज निर्माण झालेली आहे.

अरबी सागराच्या किनारपट्टीवर आणि तेरेखोल नदीच्या मुखावर वसलेला पेडणे तालुक्यातील पालये गाव आदिम काळापासून मानवाला आकर्षण बिंदू ठरला होता. त्यासाठी केरी, पालये, हरमल आणि मांद्रे या गावांत अश्मयुग काळापासून मानवाचा संचार होता आणि त्याच्या पाऊल खुणा दर्शवणाऱ्या संचितांचे दर्शन गोवा मुक्तीनंतर त्यांचा शोध घेणाऱ्या पुरातत्व शास्त्रज्ञांना झाले होते. केरी गावात असणारा आजोबा आणि त्याच्याशी निगडित जुन्या काळातील शिलाखंड असो वा समुद्राच्या लाटांचा प्रतिध्वनी ज्या नैसर्गिक गुंफांत ऐकू यायचा, तो सारा परिसर खरंतर शेकडो वर्षांपासून मंतरलेला होता.

Prehistoric Human Presence in Palye Goa
Goa Politics: गोव्यात शिंदेंची निवडणूक मोर्चेबांधणी! 3 कार्यालये सुरू, तालुकावार समित्या; डिसेंबरमध्ये पदाधिकारी मेळावा

पालये गावातील अरबी सागराशी संलग्न असणारी किनारपट्टी असो अथवा गावाच्या माथ्यावर असणारे हरमल आणि केरी या दोन्ही गावांना जोडणारे विस्तीर्ण लोह खनिजाने युक्त असणारे जांभ्या दगडाचे पठार ही इथली नैसर्गिक शान होती.पालयेतील मधलावाडा येथे असलेले हिंदू-मुस्लिम संस्कृतीचे अनुबंध सांगणारे पिराचे थडगे, मिर्झलवाडा, बावाखानवाडा, अशी इथली स्थलनामे या गावच्या शेकडो वर्षांच्या इतिहासाची साक्ष देत आजही कायम आहेत आणि त्यातून कधीकाळी हा गाव अरबी सागरावरच्या जलमार्गाचा शिडाच्या गलबतांचा वापर करून ये- जा करणाऱ्या दर्यावर्दींना ज्ञात होता हे स्पष्ट होते. मांद्रे समुद्र किनाऱ्याजवळच्या आश्वेचा संबंध अरेबिया, पर्शिया इथून सुदृढ घोडे घेऊन येणाऱ्या व्यापाऱ्यांशी असला पाहिजे.

आज ही मांद्रे गावात जवळपास ७-८ ठिकाणांची स्थलनामे मुस्लिम धर्मियांशी निगडीत असून, कोरगावातील देवसू ते मोरजीपर्यंत जी पिरांची थडगी आज ही अस्तित्वात आहेत, त्यावरून सागरापल्याडच्या प्रदेशांतून येणाऱ्या व्यापारी, दर्यावदी, यात्रेकरू यांच्याशी असल्याचे स्पष्ट होते. इथल्या पश्चिम किनारपट्टीवर एकेकाळी अस्तित्वात असलेले रेवती द्वीप म्हणजे आजचे महाराष्ट्रातील रेडी गाव शेकडो वर्षांपूर्वी बदामी चालुक्यांच्या प्रादेशिक राजधानीच्या लौकिकास पात्र ठरले होते. त्यावरून जेथे तेरेखोल नदी अरबी सागराशी एकरूप, त्या मुखाजवळ वसलेल्या केरी आणि पालये या गावांना प्राचीन काळापासूनच नव्हे तर अश्मयुग काळातही विशेष महत्व लाभल्याचे स्पष्ट होत आहे.

पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. एम. नांबिराजन यांनी पालये गावाबद्दल लिहिताना नमूद केले आहे की, वालुकामय किनारे आणि भूशिरे असलेले हे गाव आहे, जिथे पृष्ठभागावर लाल मातीत मिसळलेले जांभे दगड-गोटे आढळतात. या भागात वाढणारे रानटी झुडूप, जे लोह खनिजाने समृद्ध आहे. सर्वेक्षणादरम्यान क्वार्ट्जचे तुकडे आढळले नाहीत. परंतु १९६४ मध्ये, पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. शंकर साळी यांनी या भागात मध्याश्मयुगीन हत्यारे असल्याची नोंद केली होती.

त्याचप्रमाणे भू-पुरातत्त्वशास्त्रज्ञ ए.आर. मराठे यांनी पठाराशीच संलग्न असणाऱ्या पेडणेतल्या केरी येथील नैसर्गिक गुहेत, जी या विस्तीर्ण पठारापासून अवघ्या काही मीटर अंतरावर आहे, तेथे त्यांनी मध्याश्मयुगीन हत्यारे गोळा केली होती. त्यांना पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणात क्वार्ट्जचे तुकडे आणि गाभा (कोर) आढळले होते, त्यापैकी काही त्यांनी गोळा करून, ती त्यांनी पुरातत्वशास्त्राच्या विद्यार्थी आणि संशोधकांच्या अभ्यास आणि संशोधनासाठी उपलब्ध करून ठेवली होती. त्यानंतर या पठाराचा पुरातत्वीय शास्त्राच्या दृष्टीने संशोधन होण्याची गरज होती. परंतु तसा अपवादात्मक अभ्यास झाला. २०१९ मध्ये, जेव्हा पालयेच्या या पठारावर ‘ए टीव्ही मेगा चॅम्पियनशिप’ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, तेव्हा आयोजकांनी पठारावरील दगडांची आपल्या स्पर्धेच्या सोयीच्या दृष्टीने रचना करून ट्रॅक तयार केला होता.

त्याचप्रमाणे पठारावरूनच पॅराग्लायडींग करण्याचा चित्तथरारक उपक्रम देश विदेशातल्या पर्यटकांसाठी हाती घेण्यात आला. त्यामुळे या पठारावरच्या पुरातत्वीय संचितांकडे दुर्लक्ष होत गेले. तथापि, या स्पर्धेच्यावेळी निर्माण केलेल्या दगडांच्या रचनेव्यतिरिक्त, या भागात पठारावरती दगडी वर्तुळे, त्याचप्रमाणे अश्मयुगीन दगडी हत्यारे आणि पुरातत्व शास्त्राच्या अभ्यासकांना पोषक अशा वेगवेगळ्या गोष्टी प्रामुख्याने आढळत असल्याने, या पठाराचे महत्त्व दृष्टीस पडत आहे. नैसर्गिक गुहा, दगडी वर्तुळे तसेच पालयेच्या देवसूच्या माथ्यावरती असलेल्या दुसऱ्या पठारावरच्या नवलो फातर या पुरातत्त्वीय महत्त्व असलेल्या आणखी एका स्थळाचा अभ्यास करण्याची नितांत गरज निर्माण झालेली आहे. स्थानिकांच्या मते जुन्याकाळी केळकर कुटूंबाच्या कुळागरात कष्टाची कामे करण्यासाठी एक दलित कष्टकरी यायचा.

बागायतीचा मालक दुपारच्या वेळेला स्वतःला तसेच दलित कामगारासाठी पेज घेऊन यायचा. दरवेळी पेज जेऊन जेऊन कंटाळल्याने, एक दिवस मालकाला म्हटले की आपण घरात पक्वान्नांचे जेवण जेऊन येता आणि मला दाखवण्यासाठी पेज जेवण्याचे नाटक करतात. आपल्यावर कामगाराने शंका घेतल्याने मालकाला वाईट वाटले आणि त्याने आपल्या हातातला विळा घेऊन, म्हणे आपले पोट फाडले तेव्हा त्यातून त्याच्या पोटातली पेजच बाहेर पडली आणि मालक मृत्युमुखी पडला. आपण दाखवलेल्या अविश्वासामुळे मालकाचा प्राण गेल्याने, कामगाराने तोच विळा आपल्या हाती घेऊन आपल्या शरीरावर ही प्राणघातक धाव घालून मृत्यूला कवटाळले. तेव्हापासून त्या जागेवर जंगलात उभा असलेला वैशिष्ट्यपूर्ण आकारातला शिलाखंड नवलो फातर या नावाने परिचित झाला.

Prehistoric Human Presence in Palye Goa
Goa Water Crisis: साळावली धरणाशेजारीच पाण्यासाठी वणवण! ग्रामस्थांची व्यथा समोर येताच मानवाधिकार आयोगाची अधिकाऱ्यांना नोटीस

एकेकाळी पालये गावातले हे पठार केरी आणि पालये परिसरातल्या कष्टकरी शेतकऱ्यांसाठी मान्सूनच्या पावसाळ्यात अन्नदात्री ठरले होते. याठिकाणी कुळीथ, उडीद, नाचणी त्याचप्रमाणे खोचरी, पाटणी या भातांच्या प्रजातींचे उत्पन्न घेतले जायचे. त्याचप्रमाणे जुन्याकाळी येथे केरी आणि महाराष्ट्रातून माल वाहून नेणारी मंडळी हरमलला जाण्यासाठी पठारावरून जाणाऱ्या मार्गाचा हमखास उपयोग करायचे, त्यावेळी जांभ्या दगडांचा वापर करून निर्माण केलेली दवरणी त्यांच्यासाठी महत्त्वाचा आधार ठरली होती. मध्यतंरी या पठारावर जपानी ग्राम आणि गोल्फ कोर्स प्रकल्प स्थानिकांच्या विरोधामुळे गुंडाळण्यात आला होता.आज या पठारावरच्या पुरातत्वीय आणि ऐतिहासिक संचिते विस्मृतीत जाण्याच्या वाटेवर असताना, हे पठार पावसाळ्यात मौसमी रानफुलांच्या वैविध्यपूर्ण वैभवासाठी आणि हिवाळ्यात देश विदेशातल्या पक्षीमित्रांसाठी शेकडो पक्षांचे दर्शन देत असल्याने आकर्षण बिंदू ठरले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.