

मडगाव: संजील कुडचडकर अपहरण प्रकरणातील एका संशयितावर खुनाच्या प्रयत्नाचे दोन गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून गुन्हेगारी वृत्तीची पार्श्वभूमी असलेला हा संशयित भाडोत्री गुंड असल्याचे उघड होऊ लागले आहे. या पार्श्वभूमीवर या अपहरण प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.
या अपहरण प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेली कुडचडकर यांची पत्नी लुईझा फर्नांडिस ही अजूनही फरार असून तिच्या शोधासाठी मडगाव पोलिसांचे एक पथक कर्नाटकात तळ ठोकून आहे. गेल्या शुक्रवारी कोंब - मडगाव येथून संजील यांचे भर दिवसा सकाळी साडेदहाच्या सुमारास अपहरण झाले होते. या अपहरण प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते.
त्याच्या वीस वर्षीय मुलीने नंतर पोलिसांत तक्रार नोंद केली होती. मागाहून पोलिसांनी कारवार येथून नासिर बिन मसूद व शाह अली सौदागर या दोघांना जेरबंद करून संजीलची सुटका केली होती. अपहरणासाठी वापरलेली कारही पोलिसांनी जप्त केली होती. कौटुंबिक वादातून हे अपहरण घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
संशयितांची पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर आज त्यांना पुन्हा न्यायालयात उभे केले असता पाच दिवसांची अतिरिक्त पोलिस कोठडी सुनावण्यात आली.पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नासिर याच्यावर कोलवा पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचे दोन गुन्हे दाखल आहेत. त्याला ‘टायसन’ या टोपण नावानेही ओळखले जाते.
दरम्यान, या प्रकरणी मडगाव पोलिस ठाण्यात संपर्क साधला असता, पोलिसांनी संशयितांबाबत अधिक माहिती देणे टाळले. तपास प्राथमिक अवस्थेत असल्याने व मुख्य सूत्रधार लुईझा या सापडल्या नसल्याने आताच काही गोष्टी उघड करता येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
कौंटुंबिक वादातून अपहरण
जोपर्यंत लुईझा पोलिसांच्या हाती लागत नाही, तोपर्यंत या अपहरणामागील नेमके कारण स्पष्ट होणार नाही, अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे. कौंटुंबिक वादातून अपहरणाचे ही घटना घडली असल्याचे आतापर्यंतच्या पोलिस तपासात पुढे आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.