गोव्यातही महाराष्ट्र पॅटर्न राबवणार! : संजय राऊत

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी गोव्यातही फोन टँपिंगचा महाराष्ट्र पॅटर्न राबविला जात असल्याचा दावा केला आहे.
संजय राऊत
संजय राऊत Dainik Gomantak
Published on
Updated on

गोवा: शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी गोव्यातही फोन टँपिंगचा महाराष्ट्र पॅटर्न राबविला जात असल्याचा दावा केला आहे. त्याची कोणी विशेष गंभीर दखल घेतलेली नसली तरी मतमोजणीनंतर महाराष्ट्र धर्तीचा राजकीय प्रयोग होऊ शकतो. अशी चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसचे गाडे 10-12 वर अडले व म.गो.ला 7-8 जागा मिळाल्या तर प्रसंगी त्या पक्षाला सरकार स्थापनेसाठी काँग्रेसने पाठिंबा द्यावा व भाजपला सत्तेपासून दूर ठेवावे असे सेनेला वाटते. यात सेनेला ना नफा, ना तोटा. कारण ती विधानसभेत खाते खोलण्याची शक्यता नाही. पण, जुळले तर महाराष्ट्र पॅटर्न गोव्यात राबविल्यासारखे होणार आहे.

ताळगावात काट्याची टक्कर

राज्यातील मतदानानंतर अनेक उमेदवारांच्या प्रचारा कार्यालयामध्ये सामसूम दिसत होती ती पुन्हा गजबजू लागली आहे. मतमोजणीला काही दिवसच उरले असल्याने उमेदवाराच्या मतमोजणी एजंटाची जमवाजमव सुरू झाली आहे. ताळगावचे काँग्रेसचे उमेदवार टोनी रॉड्रिग्ज हे भाजपचे उमेदवार जेनिफर मोन्सेरात यांची हॅट्‍ट्रीक रोखणार यावरून ताळगावात पुन्हा चर्चेला ऊत आला आहे. ताळगावात दोन दशकानंतर अटतटीची लढत झाली आहे. यापूर्वी मगो व काँग्रेसमध्ये लढत झाली होती.

तेव्हा काँग्रेसचे उमेदवार जुवारकर हे दोनअंकी मतांनी विजयी झाले होते. त्यानंतर पुन्हा यावेळी भाजप व काँग्रेसमध्ये काट्याची टक्कर आहे. गेल्या दोन दशकापासून ताळगावातील मोन्सेरात कुटुंबियांची सुरू असलेली घौडदौड टोनी फर्नांडिस रोखणार अशीच सध्या चर्चा आहे. जेनिफर मोन्सेरात यांना भाजपमध्ये दिलेला प्रवेश भाजपचे कट्टर समर्थकांना रुचलेला नाही. बाबुश मोन्सेरात यांचा लोकांशी संपर्क असला तरी जेनिफर या लोकांपर्यंत पोहचल्या नाहीत, मतदारांचा कौल काँग्रेसकडेच गेला असल्याची चर्चा सुरू आहे.

संजय राऊत
पणजी येथे फ्रान्सिस रॉड्रिग्ज यांच्यावर आज अंत्यसंस्कार

त्यांचे काय होणार?

निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकून राहिलेल्या विविध पदांसाठी निवड झालेल्या त्या युवकांना नोकरी मिळणार? की नवीन सरकार त्या नोकऱ्या व ती निवड रद्द ठरविणार ही चिंता निवड झालेल्या उमेदवारांना सतावत आहे. निवड न झालेले उमेदवार त्या नोकऱ्या रद्द होण्याची वाट पहात आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्यात निवडलेल्या अभियंत्यांना व पोलिस खात्यात नेमणूक झालेल्या पोलिस उपनिरीक्षक व पोलिस शिपायांना नेमणूक पत्रे न मिळाल्यामुळे ती वादग्रस्त नेमणूक रद्द होण्याची भीती त्या निवड झालेल्यांना सतावत आहे.

वीज खात्यात ऑफर लेटर व नेमणूक पत्रे दिली होती. मात्र, नोकरीवर रुजू करून घेतले नव्हते. ते ही निवडलेले अभियंते सरकारकडून सकारात्मक निर्णयाची वाट पाहत आहेत. नीलेश काब्राल व दीपक पाऊसकर निवडून येवोत व सरकारात सहभागी होऊन मागचे पुढे जावो म्हणून ते निवडलेले युवक देवाला साकडे घालीत आहेत. आता देव न निवडलेल्यांना पावतो की निवडलेल्यांना हे दहा तारखेला समजणार आहे. तोपर्यंत ‘व्हील कीप फिंगर्स क्रॉस.’

वेध देवस्थान समिती निवडणुकीचे!

सध्या आपल्या राज्यात निवडणुकीचे वातावरण आहे. विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी संपली आता निकाल लागण्याची प्रतीक्षा आहे. नवी विधानसभा व नवीन सरकार स्थापन झाल्यावर लगेच 13 तारखेला राज्यातील देवस्थान समितीच्या निवडणुका होणार आहेत. नंतर लगेच पंचायत निवडणुकीचा गोंधळ सुरू होणार. सध्या देवस्थान समितीवर जाण्यास इच्छुक असलेल्यांनी महाजनांच्या घरी घर चलो अभियान सुरू केले आहे. काही ठिकाणी या निवडणुका जंगी होणार हे निश्चित.

संजय राऊत
इंदिरानिष्ठ आयरीन बार्रुश यांच्यावर आज अंत्यसंस्कार

‘त्या’ अधिकाऱ्याची धावधाव

उत्तरप्रदेशमध्ये गेलेल्या पोलिसांना टपाली मतदानासाठी पोलिस खात्याने खटाटोप केला असला तरी या पोलिसांना झालेला मनःस्ताप व त्रास याला खातेच जबाबदार आहे अशी जोरदार चर्चा पोलिस वर्तुळात सुरू झाली आहे. वरिष्ठांच्या हलगर्जीपणामुळेच हा नाहक तसेच अमानवी वागणुकीला सामोरे जाण्याची पाळी आहे. या निवडणूक कामासंदर्भात एका पोलिस अधीक्षकपदाच्या अधिकाऱ्याला नेमण्यात आले होते.

त्याला या टपाली मतदानाबाबत पूर्वकल्पना होती. मात्र, सध्या जो सावळागोंधळ झाला आहे त्यातून आपली बाजू मांडण्यास वरिष्ठ पोलिस अधिकारी तसेच मंत्र्यापर्यंत धावाधाव सुरू केली आहे. तीन दिवस गाडीत बसून प्रवास केलेल्या पोलिसांचे अतोनात हाल झाले आहेत. कोणी याविरुद्ध आवाज उठविल्यास वरिष्ठांकडून त्यांच्या सेवेचा रेकॉर्ड नकारात्मक लिहू अशी तंबी देण्यात आली आहे. त्यामुळे कोणीही झालेल्या हालअपेष्टांबाबत ‘ब्र’ काढत नाहीत. निमूटपणे झालेला अन्याय सोसण्याच्या पलिकडे पर्याय नाही. पोलिसांची स्थिती ‘धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय’ अशी झाली आहे.

साहेब हे खरे आहे कां ?

‘कोंबडं झाकलं म्हणून दिवस उजाडायचा राहत नाही’ ही म्हण आपल्या राजनेत्यांनी व सरकारी अधिकाऱ्यांनी ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. आपल्या चुका झाकून ठेवल्या निवडलेल्या उमेदवारांची यादी जाहीर न करता सरकारी भरती केली म्हणजे आपण सुटलात असे आपल्या अधिकाऱ्यांना वाटत असेल तर ती त्याची भूल आहे. आरोग्य खात्यात म्हणे बीएससी नर्सिंग केलेल्यांना डावलून एका व्यक्तीच्या संस्थेत नर्सिंगचा सहा महिन्यांचे प्रमाणपत्र कोर्स केलेल्यांना स्टाफ नर्स म्हणून विद्यमान सरकारने नेमल्याचा आरोप होत आहे.

ज्यांना आयव्ही लावायला येत नाही. सीरींजमध्ये इंजेक्शन भरता येत नाही. अशाना बाबाने स्टाफ नर्स म्हणून नेमल्याने डॉक्टर संताप व्यक्त करीत असल्याचे कळते. एका अर्धवट शिकलेल्या स्टाफ नर्सने म्हणे एकाचे इंजेक्शन दुसऱ्यालाच टोचले. असे अनेक किस्से सरकारी इस्पितळात व आरोग्य केंद्रात ऐकायला मिळत आहेत. हे जर सत्य असेल तर बाबा व दोतोर प्रमोद तुम्हाला व त्या अर्धवट नर्स यांना परिणाम भोगावे लागतील.

मच्छीमारांचा उठाव!

गोव्याच्या समुद्रकिनारी पट्ट्यात वास्तव्य करून असलेल्या रहिवाशांना आणि विशेषत: मच्छीमारांना जाचक असलेले अधिनियम संमत करण्याचा घाट केंद्र सरकारने सध्या घातलेला असल्याचा भीतीने त्याविरोधात सध्या शिवोली विधानसभा मतदारसंघातील शापोरा-वागातोर भागातील मच्छीमारांनी उठाव केला आहे.

त्या आंदोलनाचे नेतृत्व मच्छीमारांचे स्थानिक नेता बलभीम मालवणकर यांनी केले असले तरी त्यांना शिवोली गट काँग्रेसच्या अध्यक्ष पार्वती नागवेकर, तसेच काँग्रेसचे अन्य नेते राजन घाटे व संजय बर्डे यांनी क्रियाशील सहभाग दर्शवून त्यांना पाठिंबाही व्यक्त केला.

मच्छीमारांच्या पोटापाण्याचा विचार न करता एवढी वर्षे त्या भागात वास्तव्य करून असलेल्या नागरिकांना जाचक ठरणारा कायदा केंद्र सरकार आणू पाहत असून, त्याबाबत भाजपचे स्थानिक नेते दयानंद मांद्रेकर, मोहन दाभाळे, नारायण मांद्रेकर हे सर्व जण मूग गिळून गप्प बसलेले आहेत, असा दावाही त्या भागातील पारंपरिक मच्छीमारांनी केला आहे. हा प्रश्न केवळ शिवोली मतदारसंघातीलच नाही, तर संपूर्ण गोवाभरातील मच्छीमारांवर केंद्र सरकारच्या संभाव्य कायद्यामुळे संक्रांत येणार आहे, असे तेथील मच्छीमारांचे म्हणणे आहे. असे असले तरी यासंदर्भात स्वत:वर परिणाम होणार असला तरी, पंतप्रधान मोदींच्या व भाजप नेत्यांच्या भयाने या गंभीर विषयासंदर्भात स्थानिक भाजप कार्यकर्ते कोणतेही वक्तव्य करण्याचे प्रकर्षाने टाळतात, अशीही मतदारसंघात चर्चा आहे.

खोटा आत्मविश्वास

आजकाल नाक्यावर निवडणूक निकालाच्या अंदाजाशिवाय दुसरी चर्चा होताना दिसत नाही. ज्यांच्यासाठी काम केले ते म्हणतात अचानक बदलली म्हणून मी अमुक व्यक्तीला मतदान केले. त्यात आपल्याच कार्यकर्त्यांनी दगा फटका केला हे आता गुपित राहिले नाही. आता आळ कोणावर तरी घ्यायला हवा म्हणून पराभूत होण्यापूर्वी किमान खोटा आत्मविश्वास तूर्त चेहऱ्यावर दाखविला जात आहे. मात्र, आतून जळफळाट होत आहे. आता हा जळफळाट निकालानंतर उफाळून येणार की चिरडला जाणार हे निवडणूक निकालाअंतीच स्पष्ट होईल.

आता किती दंड?

सोनसोडोवर भडकलेली आग शमण्यापूर्वीच तिचे कवित्व सुरू झालेले आहे. दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकारे लागलेली आग तब्बल पंधरवडाभर धुमसत राहिली व ती विझविण्यासाठीची मोहीम मडगाव नगरपालिकेला व सरकारला नेमकी किती कोटींना पडली ते त्यांचे त्यांनाच ठाऊक.

तेवढ्याने भागले नाही तर त्या आगीमुळे पर्यावरणाच्या विध्वंसापोटी प्रदूषण नियंत्रण मंडळाने पालिकेला एख कोटी दंड ठोठावला. तो भरला गेला की नाही ते कळू शकले नाही; पण आता पालिकेवर दंडाची पुन्हा तलवार लटकल्याची चर्चा मडगावात रंगू लागली आहे.

मगोच्या जागांचे गूढ

मतमोजणी दारांत येऊन ठेपलेली आहे. काँग्रेस व भाजपवाले आपणालाच बहुमत मिळेल वा जादूई संख्येच्या जवळ येऊन पोचणार व इतरांची मदत घेऊन सत्ता स्थापण्याची मनोराज्ये रचत आहेत. पण, मतदारांनी नेमके काय केले आहे ते कोणालाच माहित नाही. ते नेमके येत्या गुरुवारी कळणार आहे.

मात्र, आता म.गो. किमान दहा ते बारा जागा जिंकू शकतात अशी एक हवा तयार झाली आहे. त्या मागे नेमका कोण आहे ते कळायला मार्ग नाही की त्या जागा नेमक्या कोणत्या तेही उघड केले जात नाही. कारण मडकई सोडल्यास मगोसाठी अन्य कुठेच खात्री नाही. अगोदर प्रियोळमध्ये आशा होती; पण तेथे तृणमूलकडील दोस्ती अडथळा ठरली या परिस्थितीत दहा बारा म्हणजे अतीच झाले. ∙∙∙

काँग्रेस नेत्यांची धडपड

2017 मध्ये सरकार स्थापनेची संधी असलेल्या कॉंग्रेसला ती गमवावी लागली. शेवटी त्यांचे केवळ दोनच आमदार राहिले. या निवडणुकीत कॉंग्रेस जिंकणार की नाही, हे आता गुरुवारच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. तरीसुद्धा जणू काय आपलाच पक्ष सत्तेवर येईल अशा तोऱ्यात कॉंग्रेसचे नेते वावरत आहेत.

सरकार स्थापनेची वेळ निश्र्चित करणे, दिल्लीत जाऊन हायकमांडना मिळणे, संभावीत उमेदवारांकडे सल्लामसलत करणे हे काम कॉंग्रेस पक्षाने सुरू केले आहे. यावेळी निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम मतमोजणीच्या चार दिवस अगोदरच गोव्यात येऊन राहिले आहेत. गेल्यावेळचा अनुभव पुन्हा येऊ नये, यासाठीच कॉंग्रेस नेत्यांची ही धडपड आहे.

धमकी देणाऱ्यांना ‘इंगा’!

परप्रांतीय मतदार हा राजकीय लोकांचा बॅंक बेलन्स. कोणतेही काम करायचे नाही. केले तर हातातून जाणार म्हणून थांबा होणार होणार म्हणून झुलवत ठेवायचं. अन् निवडणूक काळात मतदान होताच तुमचे काम होणार म्हणून गाजर दाखविले जात होते. पण, किती वेळ झुलवीत ठेवणार. अखेर सांगेतील परप्रांतीय मतदारांनी आपला इंगा धमकी देणाऱ्यांना दाखविला असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

अपक्षांचा प्रभाव किती?

मतमोजणीचा दिवस जसजसा जवळ येत चालला आहे तसतशी उमेदवारांच्या जीवाची घालमेल सुरू झाली आहे. मतदानानंतर जवळपास पंचवीस दिवसांनी निकाल जाहीर होणार असल्याने उमेदवारांच्या काळजाचे ठोके जलदगतीने पडायला सुरवातही झाली आहे. राज्यात काही ठिकाणी अपक्षांचा बोलबाला असला तरी बहुतांश राजकीय पक्षांचे उमेदवार निवडून येणार आहेत.

काही मोजके अपक्ष उमेदवार सोडले तर बहुतांश अपक्षांनी संबंधित राजकीय पक्षांनी तिकीट नाकारल्याने अथवा सत्ताधारी आमदाराच्याविरोधात डूख मनात धरूनच निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला. साखळी मतदारसंघातील तर एका उमेदवाराने मुख्यमंत्र्यांनी आपल्याला चांगली वागणूक दिली नाही, असा आरोप करीत उमेदवारी दाखल केली. पण हा आरोप खासगीत बरं का..! त्यासाठी स्वतः कमावलेली पुंजीही खर्ची घातली आहे. आता हे अपक्ष उमेदवार किती मते घेतील, आणि कुणाची मते बाद करतील, ते पहावे लागेल. शेवटी राजकारण ना...!

संजय राऊत
फूटपाथवर राहणाऱ्या कुटुंबांमुळे मडगाव वासीयांची गैरसोय

काँग्रेसचा मुख्यमंत्री कोण?

काँग्रेस सरकार स्थापन करणार व अर्ध्या तासात राज्यपाल कडे सरकार स्थापनेचे पत्र देणार असे काँग्रेसचे भावी मुख्यमंत्री मायकलबाब सांगत आहेत.मायकल बाबा खुश असून आपणच मुख्यमंत्री होणार अशा थाटात त्यांनी राहुल गांधीनाही शपथ विधीचे निमंत्रण दिल्याचे तेच सांगतात मायकलने बंद गला शेरवानी सूट शिवायला दिला असल्याचे मायकल समर्थक सांगतात साष्टीत मात्र बाबा मुख्यमंत्री होणार असा दावा काँग्रेस समर्थक करतात.

साष्टीत युरी, बाबा कामत व विजय असे तीन मंत्री मिळणार असे ही काँग्रेस समर्थक सांगतात मायकल जर सत्तेसाठी फुटू शकतो तर मायकलला सत्ते पासून दूर ठेवण्यास बाबा फुटू शकत नाही का? असा ही प्रश्न काँग्रेस समर्थक व्यक्त करीत आहेत.आता काँग्रेस जिंकणार की मायकलचे आमंत्रण बाद होणार हे दहा तारखेला कळणारच आहे तो पर्यंत या कॉमेडी सर्कस चा आनंद उठवू या.

गिरीशरावांनाही भीती

निवडणूक म्हटली की, जे उमेदवार लढतात तेच काय तो निवडणुकीच्या मतमोजणी व निकालावर डोळे ठेवून असतात. पण, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चोडणकर यांनीही ही निवडणूक गांभीर्याने घेतल्याने निकालाशिवाय ते सध्या कोणताच विचार करीत नाहीत. यापूर्वीच्या काही निवडणुकांमध्ये जेव्हा जेव्हा कॉंग्रेस पक्ष पराभूत झाला आहे, तेव्हा पक्षाध्यक्षाला स्वतः जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा लागला आहे.

यावेळीही कॉंग्रेस पक्ष सत्तेबाहेर राहिला तर गिरीशबाबांना म्हणे राजीनामा द्यावा लागणार असल्याची चर्चा आहे. असे घडले तर पक्षात काहीच महत्त्व राहणार नाही, याची भीतीही गिरीशरावांना सतावतेय म्हणे.

खाणसम्राट झाले सक्रिय

गुरुवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच सरकार स्थापन करण्याची जी तयारी काँग्रेसने चालविली आहे त्यामुळे गोव्यातील खाणसम्राट भलतेच खूष झाले आहेत. 2017 मधील प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून त्यांनी आवश्यक ते फासेही टाकले आहेत.

तब्बल दहा वर्षांनी आपल्या पसंतीचे सरकार येण्यास अनुकूल वातावरण आहे हे या मंडळींना वाटते. काँग्रेस सरकार सत्तेवर येणे गरजेचे आहे हे आजवरच्या अनुभवावरुन त्यांना कळून चुकलेले आहे. त्यासाठीच त्यांनी फासे टाकले आहेत; पण काँग्रेस सत्तेवर येण्याबरोबरच आपल्या पसंतीचा मुख्यमंत्रीही त्यांना हवा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com