Sanguem tragic Car Accident : तारीपांटो - सांगे येथील पुलावरून जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने कारगाडी पुलावरून थेट उगे नदीत कोसळली. सोमवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास झालेल्या या अपघातात मायलेकाचा दुर्दैवी अंत झाला.दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी कार नदीतून बाहेर काढली. कारच्या काचा फोडून मृतदेह बाहेर काढले.
मृतांमध्ये रेखा नाईक (वय ३२) आणि दोन वर्षीय दिव्यांश नाईक यांचा समावेश आहे. रेखा यांचे पती मिलिंद नाईक (वय ३८) हे अजून बेपत्ता असून त्यांचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता.
कुमयामळ-सांगे येथे राहणारे हे नाईक कुटुंबीय (जीए - ०१ - आर - ९१५८) कारने सांगे बाजाराकडे येत होते. तारीपाटो - सांगे येथील पुलावरून जात असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला.
पुलाच्या बाजूने खोलगट भागातून कार सरळ नदीच्या पात्रता कोसळली. उतरणीवर असलेल्या पुलाला दोन्ही बाजूने संरक्षण कठडे नव्हते. कारमध्ये कितीजण होते हे अद्याप समजू शकले नाही.
मात्र, रेखा नाईक आणि त्यांचा मुलगा एकमेकांच्या मिठीत असलेल्या अवस्थेत आढळून आले. सांगे पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर कार नदीतून बाहेर काढली.
मोठ्या मुलीमुळे ओळख पटली
रेखा नाईक आणि त्यांच्या मुलाचा मृतदेह सांगे इस्पितळात आणण्यात आला. त्यावेळी दिव्यांशच्या मोठ्या बहिणीने मृतदेहांची ओळख स्पष्ट केली. तिला या घटनेमुळे जबर मानसिक हादरा बसला आहे. आपल्या आईला गाडी चालविता येत नव्हती. बाबाच गाडी चालवत होते, असे तिने पोलिसांना सांगितले.
उशिरापर्यंत शोधमोहीम; युवकाचे धाडस
अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी उशिरापर्यंत बेपत्ता मिलिंद नाईक यांचा शोध घेण्याचा प्रयत्न चालविला होता. स्थानिक बबलू नाईक या युवकाने पाण्यात उडी घेऊन कारला दोरीच्या साहाय्याने बांधण्याचे धाडस केले. यासाठी त्याने आपल्या जिवाची पर्वा केली नाही.
गाडी पाण्यात पडताच मोठा आवाज झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. शोधमोहिमेसाठी सांगेचे पोलिस निरीक्षक प्रवीण गावस, कुडचडेचे निरीक्षक वैभव नाईक, अग्निशमन दलाचे निरीक्षक दामोदर जांबावलीकर घटनास्थळी तैनात होते.
पुलाला कठडे असते तर...
तारीपांटो-सांगे येथील पुलाच्या दोन्ही बाजूने संरक्षक कठडे नसल्याने कार थेट नदीत कोसळली. कदाचित कठडे असते, तर कार कोसळली नसती. या पुलावर अशा अनेकदा घटना घडलेल्या आहेत. स्थानिकांनी यापूर्वी पुलाला संरक्षक कठडे बांधण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.