

फोंडा: साकोर्डा येथे झालेल्या दुचाकी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या निधी पाटील आणि राघवी गावकर या दोघींवर स्थानिक स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
निधी आणि राघवी या दोघीही हिराबाई तळावलीकर हायस्कूलमध्ये नववीच्या वर्गात शिकत होत्या. अभ्यासात हुशार आणि मनमिळाऊ स्वभावाच्या या विद्यार्थिनी शाळेत सर्वांच्या परिचयाच्या होत्या. त्यांच्या अपघाती मृत्यूची बातमी समजताच गावात शोककळा पसरली. दोघींचे पार्थिव घरी आणल्यानंतर आई-वडील आणि मित्रपरिवाराने केलेला आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.
निधीच्या मृतदेहाची शवचिकित्सा मडगाव येथील सरकारी रुग्णालयात, तर राघवीच्या मृतदेहाची बांबोळी येथील रुग्णालयात करण्यात आली. त्यानंतर स्वतंत्र शववाहिकांमधून त्यांचे पार्थिव घरी आणण्यात आले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर हिराबाई तळावलीकर हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना सकाळीच घरी सोडले. शिक्षक, पालक आणि शाळा पदाधिकाऱ्यांनी दोन्ही विद्यार्थिनींच्या घरी जाऊन अंतिम दर्शन घेतले.
दरम्यान, अपघातस्थळाची पाहणी केली असता रस्त्यावर आणि ओहळात दोघींच्या चपला आढळल्या. पावसाळ्यात वाहून आलेली चिखल-माती रस्त्यावर साचल्याने दुचाकी घसरून ओहळात पडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सायंकाळपर्यंत अपघातग्रस्त स्कूटर ओहळातून बाहेर काढून ठेवण्यात आली होती.
साकवाच्या दोन्ही बाजूंना संरक्षक कठडे नसल्याचेही पाहणीत दिसून आले. हे कठडे असते तर स्कूटर ओहळात पडण्याचा धोका टळला असता, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. पंचायत प्रशासनाने याची दखल घेऊन साकवाच्या दोन्ही बाजूंना तातडीने संरक्षक कठडे उभारावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पालकांनी अल्पवयीन मुलांना दुचाकी, चारचाकी वाहने देऊ नयेत, असे आवाहन कुळेचे पोलिस निरीक्षक मेलेटो फर्नांडिस यांनी केले. अल्पवयीन मुले वाहन चालवताना आढळल्यास वाहन जप्त करून दंडात्मक कारवाई करू, असा इशाराही त्यांनी दिला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.