

योगेश मिराशी
म्हापसा: बार्देश तालुक्यातील साळगाव विधानसभा मतदारसंघ गोव्याच्या राजकारणात कायमच लक्षवेधी आणि सत्तासंघर्षाचा मुख्य आखाडा राहिला आहे. एकेकाळी माजी मुख्यमंत्री दिवंगत डॉ. विल्फ्रेड डिसोझा (विली) यांचा अभेद्य बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात नंतरच्या काळात पक्षांतराचे अनेक प्रयोग झाले.
२०२२ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले विद्यमान आमदार केदार नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, आता माजी मंत्री जयेश साळगावकर यांनी भाजपला रामराम ठोकल्याने साळगावमधील राजकीय गणिते पुन्हा एकदा पूर्णपणे बदलली असून, आगामी २०२७ च्या निवडणुकीत आमदार केदार नाईक यांच्यासाठी ही लढत आव्हानात्मक ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
या मतदारसंघाचा राजकीय इतिहास पाहिला, तर २००७ मध्ये भाजपचे दिलीप परुळेकर यांनी विलींच्या वर्चस्वाला सुरुंग लावला होता. २०१७ मध्ये गोवा फॉरवर्डकडून लढताना जयेश साळगावकर यांनी परुळेकरांचा पराभव केला; तर २०२२ मध्ये भाजपकडून रिंगणात असलेल्या जयेश यांचा काँग्रेसच्या केदार नाईक यांनी पराभव केला. निवडणुकीनंतर काही महिन्यांतच केदार नाईक भाजपमध्ये दाखल झाल्यामुळे पक्षात दिलीप परुळेकर, जयेश साळगावकर आणि केदार नाईक अशी तिहेरी कोंडी निर्माण झाली होती. आता जयेश यांनी भाजप पक्ष सोडल्यामुळे भाजपची उमेदवारी मिळण्याचा केदार नाईक यांचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्र वरवर दिसत असले, तरी प्रत्यक्ष जमिनीवरील लढाई मात्र त्यांच्यासाठी अधिक खडतर झाली आहे.
सध्या साळगाव मतदारसंघात स्थानिक समस्यांवरून भडका उडाला आहे. साळगावचा कचरा प्रक्रिया प्रकल्प परिसरातील रहिवाशांसाठी मोठी डोकेदुखी ठरला असून, दुर्गंधी आणि प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याशिवाय पिण्याच्या पाण्याचा तुटवडा, टेकड्यांचे सपाटीकरण, कथित अनिर्बंध जमिनींचे रूपांतरण आणि वाढते काँक्रिटीकरण यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये विद्यमान नेतृत्वाबद्दल तीव्र नाराजीची भावना आहे.
सत्ताधारी पक्षात असूनही आमदार या मूलभूत समस्या सोडवण्यात अपयशी ठरल्याचा थेट आरोप होत आहे. याच वाढत्या असंतोषाचा फायदा उठवत जयेश साळगावकर यांनी आक्रमक रणनीती आखली आहे. साळगाव आणि लगतच्या पंचायतींमधील अनेक आजी-माजी पंच सदस्यांची भक्कम साथ त्यांना मिळत असून, त्यांनी आमदारांच्या विरोधात थेट मोहीम उघडली आहे. जरी पत्रकार परिषदेत जयेश साळगावकर यांनी विद्यमान आमदारांवर थेट घणाघाती टीका केली नसली, तरी साळगावकरांनी साळगाव मतदारसंघात जागा मोकळी झाली असल्याचे स्पष्ट करत, २०२७ मध्ये भावी आमदार म्हणून आपली दावेदारी ठोकली आहे.
मतदारसंघातील एकूण २८ हजार मतदारांपैकी सुमारे १८,५०० हिंदू मतदार असून, त्यात ६५ टक्के मतदार हे भंडारी समाजाचे आहेत. ख्रिश्चन आणि गोमंतक मराठा समाजाची मतेही येथे निर्णायक ठरतात. काँग्रेस पक्ष सध्या एका सक्षम उमेदवाराच्या शोधात असून तुलिओ डिसोझा आणि वीरेंद्र शिरोडकर यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. जर काँग्रेसने मजबूत चेहरा दिला आणि जयेश साळगावकर दुसऱ्या पक्षाकडून किंवा अपक्ष लढले, तर ही लढत थेट त्रिकोणी होईल. केदार आणि जयेश या दोघांचाही मुख्य प्रभाव स्थानिक मतदारांवर असल्याने पारंपरिक मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर पडणार, यावरच अंतिम निकाल अवलंबून असेल. कचरा प्रकल्प व पर्यावरण रक्षणाच्या प्रश्नांवर विद्यमान आमदारांना जनतेला ठोस उत्तरे द्यावी लागणार आहेत; तसेच मुळात जयेश साळगावकर यांनी काँग्रेसचा हात धरला, तर त्यांची राजकीय स्थिती आणखीन भक्कम होऊ शकते.
विधानसभा लढवणार : जयेश
जयेश साळगावकर यांनी आगामी २०२७ ची विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले. लोकांच्या आग्रहामुळे भाजप सोडण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. सध्या कोणत्याही पक्षाशी संपर्क नसल्याचे नमूद करून, घरोघरी जाऊन जनतेच्या भेटी घेणार असल्याचे ते म्हणाले. साळगावची जनता जो निर्णय घेण्यास सांगेल, त्यानुसार योग्य पक्षात प्रवेश करेन, असे त्यांनी स्पष्ट केले. जनहित हीच खरी विचारधारा असून, जनतेची सुरक्षितता व कल्याणकारी योजनांवर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पक्षाशी एकनिष्ठ राहणार : परुळेकर
भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री दिलीप परुळेकर यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचा निर्धार व्यक्त केला. पक्षाने सांगितल्याप्रमाणे जयेश साळगावकर यांच्यासोबत काम करून मतदारसंघाचा विकास साधल्याचे त्यांनी सांगितले. आगामी निवडणुकीसाठी भाजपकडे उमेदवारी मागितली असून, विकासकामे व कार्यक्षमतेच्या जोरावर आपल्यालाच तिकीट मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. साळगावकरांनीही आपली स्वतंत्र मतपेढी असल्याचे मान्य केल्याने भाजपसाठी आपण योग्य उमेदवार असल्याचे परुळेकर म्हणाले.
त्यांच्या राजीनाम्याची पक्षश्रेष्ठींना पूर्वकल्पना : केदार नाईक
जयेश साळगावकर यांनी भाजपच्या पक्षश्रेष्ठींना पूर्वकल्पना देऊन राजीनामा दिला आहे. जाताना त्यांनी मुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्षांचे आशीर्वाद घेतले. साळगावकर आगामी विधानसभा निवडणुकीत उभे राहिले, तरी त्याचा फायदा आम्हालाच होईल. भाजप हा मोठा राजकीय पक्ष असून प्रत्येक निवडणूक रणनीतीने लढवतो. त्यामुळे भाजपच आगामी निवडणूक जिंकेल, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे, असे साळगावचे आमदार केदार नाईक यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.