सासष्टीच्या राजकारणाची 2027 ची रणनीती, चुरशीच्या लढतीचे संकेत; नावेली, कुंकळ्ळी, मडगाव अन् फातोर्डा जागांकडे साऱ्यांच्या नजरा

Salcete Constituency Politics 2027: विधानसभा निवडणुकीत सासष्‍टी तालुक्‍यावर काँग्रेस आपला वरचष्‍मा राखू शकेल की दिगंबर कामत भाजपात प्रवेश केल्‍यामुळे ते तालुक्‍यातील काही मतदारसंघ भाजपकडे खेचून नेऊ शकतील, याचे उत्तर आगामी निवडणूक देणार आहे.
goa election 2027 salcete key constituencies
goa election 2027 salcete key constituenciesDainiak Gomantak
Published on
Updated on

मडगाव: सासष्‍टी तालुका हा प्रामुख्‍याने काँग्रेसधार्जिणा तालुका असला तरी २०२७ च्‍या विधानसभा निवडणुकीत या तालुक्‍यावर काँग्रेस आपला वरचष्‍मा राखू शकेल की दिगंबर कामत यांनी भाजपात प्रवेश केल्‍यामुळे ते या तालुक्‍यातील काही मतदारसंघ भाजपकडे खेचून नेऊ शकतील, याचे उत्तर आगामी निवडणूक देणार आहे.

मडगाव आणि फातोर्डा या दोन्‍ही मतदारसंघात आतापर्यंत दिगंबर कामत आणि विजय सरदेसाई यांनीच वर्चस्‍व कायम ठेवलेले आहे. मात्र, यावेळी विजय सरदेसाई यांनी आपण मडगावातही लक्ष घालणार असा गर्भित इशारा दिला असून दुसऱ्या बाजूने पक्षाने आदेश दिल्‍यास फातोर्डातही लक्ष घालू, असे उत्तर दिगंबर कामत यांनी दिल्‍यामुळे या दोन्‍ही नेत्‍यांची भूमिका काय असेल, याची उत्‍सूकता लागली आहे.

goa election 2027 salcete key constituencies
West Bengal Election Results 2026: पश्चिम बंगालमध्ये 'कमळ' फुलणार! भाजप बहुमताच्या पार, शुभेंदु अधिकारींचा विजयाचा दावा; ममता बॅनर्जींच्या बालेकिल्ल्यात चुरस

सासष्‍टी तालुक्‍यातील आठ मतदारसंघापैकी, मडगाव, फातोर्डा, नावेली आणि कुंकळ्‍ळी या चार मतदारसंघांचा आढावा घेतला असता, या चारही मतदारसंघांत यावेळी चुरशीची लढत होण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त केली जात आहे. नावेली मतदारसंघात विद्यमान भाजप आमदार उल्‍हास तुयेकर यांना वालंका आलेमाव यांच्‍या आव्‍हानाला तोंड द्यावे लागणार आहे; तर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव हे प्रतिनिधित्‍व करत असलेल्‍या कुंकळ्‍ळी मतदारसंघात यावेळी बहुरंगी लढत अपेक्षित असून त्‍याचा फायदा नेमका कुणाला होईल, हे अद्याप स्‍पष्‍ट होत नाही.

फातोर्डात पुन्‍हा लढत विजय विरुद्ध दामू शक्‍य :

विजय सरदेसाई आणि दिगंबर कामत यांच्‍या राजकीय कारकिर्दीत वर्षांची मोजणी केल्‍यास दिगंबर कामत यांची कारकीर्द मोठी आहे. मात्र, दोघांचीही राजकीय सुरुवात एकाचतऱ्हेने झाली आहे. विजय सरदेसाई हे आपल्‍या पहिल्‍या विधानसभा निवडणुकीत फातोर्डातून हरले होते. मात्र, त्‍यानंतर लागोपाठ सतत तीन निवडणुका त्‍यांनी जिंकल्‍या असून या चारही वेळा त्‍यांचे प्रतिस्‍पर्धी भाजपचे विद्यमान प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक हेच होते. या पार्श्वभूमीवर २०२७ मध्‍ये पुन्‍हा एकदा विजय विरुद्ध दामू अशीच लढत होणार की त्‍यात काही बदल होणार याची उत्‍सूकता लोकांना लागून राहिली आहे.

goa election 2027 salcete key constituencies
Bye-Election: पोटनिवडणुकांचा पेच सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावर! एकच कायदा, पण तीन राज्यांत तीन वेगळे दृष्टिकोन; लोकप्रतिनिधी कायद्यातील 'त्या' अटीवरुन वाद

मागची १५ वर्षे विरोधी पक्षात असतानाही विजयने फातोर्डा मतदारसंघात बऱ्यापैकी विकासकामे करून काम करू शकणारा आमदार अशी आपली प्रतिमा केली आहे. मागच्‍या तीन निवडणुका त्‍यांनी याच प्रतिमेवर जिंकल्‍या होत्‍या. मात्र, यावेळी दामू नाईक त्‍यांच्‍या विरोधात उभे असल्‍यास भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष म्‍हणून उभे रहाणार आणि दुसऱ्या बाजूने मडगावचे आमदार दिगंबर कामत यांचाही त्‍यांना पाठिंबा मिळण्‍याची शक्‍यता असल्‍याने नाही म्‍हटले तरी मागच्‍या तीन निवडणुकांच्‍या तुलनेत दामूचे पारडे काही प्रमाणात का होईना पण जड होऊ शकते. तथापि, या निवडणुकीत दामूच उभा रहाणार की भाजपतर्फे अन्‍य कुणाला उमेदवारी दिली जाईल हे अद्याप स्‍पष्‍ट झालेले नाही. त्‍यामुळे सध्‍यातरी विजय यांचेच नाणे या मतदारसंघात खणखणीत असल्‍याचे वाटत आहे. या मतदारसंघात इतर पक्षांचे उमेदवार कोण असणार आणि प्रभाव काय असणार यावरही बरेच काही अवलंबून रहाणार आहे.

नावेलीत उल्‍हाससमोर प्रतिमा, सिद्धेश उभे ठाकणार

नावेली मतदारसंघ हा प्रामुख्‍याने काँग्रेसधार्जिणा मतदारसंघ असून २०२२ च्‍या निवडणुकीत या मतदारसंघात अनेक पक्षांचे उमेदवार उभे असल्‍याने भाजप विरोधी मतात मोठ्या प्रमाणावर विभागणी झाल्‍याने पहिल्‍यांदाच या मतदारसंघात भाजपला लॉटरी लागली होती. नावेली मतदारसंघातून जिंकून येऊन भाजपचे उल्‍हास तुयेकर यांनी एक नवा विक्रम केला होता. मात्र त्‍यावेळी या विजयाकडे एक चमत्‍कार म्‍हणूनच पाहिले जात होते. यावेळी उल्‍हास पुन्‍हा असा चमत्‍कार करणार का, हा प्रश्‍‍न विचारला जात आहे. सत्ताधारी पक्षात असल्‍यामुळे उल्‍हास तुयेकर यांनी नावेली मतदारसंघात बऱ्यापैकी विकासकामे केली आहेत, याचा फायदा त्‍यांना या निवडणुकीत मिळू शकतो.

goa election 2027 salcete key constituencies
Ponda Assembly Bye-Election: कोर्टाच्‍या निकालानंतर गप्‍प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल; फोंडा पोटनिवडणूकप्रश्‍‍नी आयोगाला द्यावी लागणार उत्तरे!

यावेळीही भाजपविरोधी पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर उमेदवार उभे केल्‍यास त्‍याचा फायदा पुन्‍हा एकदा भाजपला होऊ शकतो. सध्‍याची परिस्‍थिती पाहिल्‍यास मागच्‍या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्‍यावतीने निवडणूक लढविलेल्‍या चर्चिलकन्‍या वालंका आलेमाव या पुन्‍हा एकदा नावेलीतून निवडणूक लढविण्‍यास सज्‍ज झाल्‍या आहेत. आपल्‍या कन्‍येला काँग्रेसची उमेदवारी मिळावी यासाठी चर्चिल आलेमाव यांनी काँग्रेसकडे असलेले आपले जुने संबंध वापरुन लॉबिंगही सुरू केले आहे. वालंका आलेमाव यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाल्‍यास भाजपला ते जड जाऊ शकते. मात्र, काँग्रेस सध्‍या तरी वालंकाला उमेदवारी देण्‍याच्‍या मूडमध्‍ये दिसत नाही. अशा परिस्‍थितीत काँग्रेसचा उमेदवार कोण असेल याबद्दलही सर्वांमध्‍ये उत्‍सुकता आहे. प्रतिमा कुतिन्‍हो, सिद्धेश भगत यांचीही इच्छुक उमेदवार म्‍हणून नावे चर्चेत आहेत.

मडगावात कामतांसमोर युवा उमेदवारांचे आव्‍हान

मडगाव मतदारसंघातून दिगंबर कामत हे आतापर्यंत ८ वेळा जिंकून आले आहेत. पहिल्‍या निवडणुकीत पराभव स्‍वीकारल्‍यानंतर दुसऱ्या निवडणुकीत त्‍यांनी मडगावातून बाजी मारली होती. त्‍यानंतर आजपर्यंत या मतदारसंघावर त्‍यांचाच कब्‍जा आहे. भाजपात असो किंवा काँग्रेस पक्षात प्रत्‍येकवेळी कामत यांनीच बाजी मारली आहे. अशा परिस्‍थितीत आता ते नवव्‍या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. यावेळी दिगंबर कामत यांच्‍या विरोधात चिराग नायक आणि प्रभव नायक या दोन युवा संभाव्‍य उमेदवारांनी सध्‍या आव्‍हान उभे केले आहे.

goa election 2027 salcete key constituencies
Canacona municipal election: काणकोण पालिका निवडणूक; इच्छुक उमेदवार लागले कामाला, गुडघ्याला बाशिंग बांधून तयार

आपल्‍या अनुभवाच्‍या जोरावर कामत हे आव्‍हान पेलणार की यावेळी मडगावात बदल होणार याचे उत्तर २०२७ ची विधानसभा निवडणुकीत मिळेल. आतापर्यत मडगावात भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच लढत झालेली आहे. यावेळीही याचीच पुनरावृत्ती होणार अशी शक्‍यता आहे. चिराग नायक यांच्‍याबरोबरच सावियो कुतिन्‍हो या दोघांकडे काँग्रेसचे संभाव्‍य उमेदवार म्‍हणून पाहिले जात आहे. प्रभव नायक हेही निवडणूक मैदानात उतरणार. मात्र ते कोणत्‍या पक्षावर निवडणूक लढविणार हे अद्याप स्‍पष्‍ट झालेले नाही. पालिका निवडणुकीत आपण लक्ष घालणार, असा इशारा यापूर्वीच गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांनी दिला आहे. मडगाव विधानसभा निवडणुकीतही विजयची भूमिका निर्णायक होऊ शकते.

कुंकळ्‍ळीत बहुरंगी लढतीची शक्‍यता :

इस्‍टरच्‍यावेळी कुंकळ्‍ळी मतदारसंघातील पाच विरोधी पक्षांतील उमेदवारांनी एकत्रित बॅनर झळकावला होता. या बॅनरवर माजी आमदार क्‍लाफास डायस यांच्‍यासह कुंकळ्‍ळीतून निवडणूक लढविण्‍यास उत्‍सुक असलेले एल्‍विस गोम्‍स, सॅमी तावारिस, डॉ. जॉर्सन फर्नांडिस आणि आपचे प्रशांत नाईक यांचे फोटो होते. हा बॅनर पहाता काँग्रेसचे युरी आलेमाव यांच्‍या विरोधात आम्‍ही सगळे एकत्र येऊन लढा देऊ, अशा आशयाचा संदेश त्‍यातून जात होता. मात्र, निवडणूक येईपर्यंत ही एकी कायम राहील की त्‍यात दुही निर्माण होईल, हे पहावे लागेल. सध्‍या तरी येणारी निवडणूक कुंकळ्‍ळीत बहुरंगीच होणार असे दिसत आहे. कुंकळ्‍ळी हाही काँग्रेससाठी पूरक मतदारसंघ असून मागच्‍यावेळी युरी आलेमाव या मतदारसंघातून जिंकून आले होते.

goa election 2027 salcete key constituencies
Ponda By Election: योग्‍य बाजू मांडण्‍यात आयोग अपयशी; न्‍यायालयावर खापर फोडणे अयोग्‍य!- निवृत्त न्या. खांडेपारकर

त्‍यांना लगेच विरोधी पक्षनेते मिळाल्‍याने या मतदारसंघात त्‍यांची प्रतिमाही वाढली आहे. आमदार म्‍हणून त्‍यांची कामगिरीही तशी वाईट नाही. मात्र, याच मतदारसंघांतून एकेकाळी कुंकळ्‍ळीवर पूर्ण कब्‍जा आहे, असे सांगितले जायचे, त्‍या ज्‍योकी आलेमाव यांना भाजपकडून पराभव स्‍वीकारावा लागला होता. याकडेही दुर्लक्ष करता येणे शक्‍य नाही. अशातच कुंकळ्‍ळीतून आपणही निवडणूक लढविणार, असा इशारा युरीचेच काका चर्चिल आलेमाव यांनी दिला आहे. असे म्‍हणतात, वालंका आलेमाव हिला नावेलीतून काँग्रेसची उमेदवारी मिळावी यासाठी काँग्रेसवर दबाव आणण्‍यासाठी आपण कुंकळ्‍ळीतून निवडणूक लढविणार, अशी धमकी दिली आहे. पण, आलेमाव यांनी ही धमकी खरी करून दाखविल्‍यास काँग्रेससाठी ती अडचणीची ठरू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com