सासष्टी : साळ नदीला जोडणारे मडगाव, नावेली, बाणावली भागातील नाले जिओ-बॅग तंत्रज्ञानाद्वारे स्वच्छ करण्याच्या प्रक्रियेला हिरवा कंदील आज जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यानी दाखविला आहे.
जिओ-बॅग तंत्रज्ञानाच्या आयडिया टॅक कंपनीच्या प्रतिनिधींनी आज खारेला -खारेबांद येथील साळ नदीला जोडणाऱ्या नाल्याचे पाणी जिओ-बॅग तंत्रज्ञानाद्वारे स्वच्छ करण्याचे प्रात्यक्षिक करुन दाखविले. या प्रसंगी जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, आमदार दिगंबर कामत, आमदार वेन्झी व्हिएगश उपस्थित होते.
प्रात्यक्षिका नंतर पत्रकारांशी बोलताना जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले, आम्ही नव नवीन तंत्रज्ञानाचा स्विकार केला पाहिजे. जिओ-बॅग तंत्रज्ञान नाल्यातील सांडपाणी स्वच्छ करण्याची प्रभावशाली पद्धती आहे. साळ नदीला जोडणारे सर्व नाले या तंत्रज्ञानाद्वारे स्वच्छ करण्यास काहीच हरकत नाही.
तरी सुद्धा या सर्वाचा अंदाजे खर्च किती होईल, याचा सुद्धा अभ्यास होणे आवश्यक आहे. त्यानी त्याच क्षणी कंपनीच्या अधिकाऱ्यांना खर्चाचे अवतरण (कोटेशन) दोन तीन दिवसात देण्यास सांगितले आहे. शिवाय या तंत्रज्ञानाद्वारे फायदे कसे व किती होतील? त्याचा अभ्यासही करावा लागेल, असे त्यानी सांगितले.
यावेळी हा चांगला पथदर्शक प्रकल्प असून या तंत्रज्ञानाचा वापर करुन नाल्यातील गाळ नाहीसा होतो आणि पाण्याचा प्रवाह चांगल्या प्रकारे साळ नदीत वाहू शकेल. जर साळ नदी स्वच्छ झाली, तर पर्यटनाच्या दृष्टिने तिचा वापर करुन फ्लोटींग मार्केटची सुद्धा व्यवस्था करता येईल, असे आमदार वेन्झी व्हिएगश म्हणाले. हे नवीन तंत्रज्ञानाचे युग आहे व आम्हांला त्याचा स्विकार करण्याशिवाय गत्यंतर नाही, असे मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले.
साळ नदीला पूर्ववेैभव येणार?
23 वर्षांपूर्वी तेव्हाचे मुख्यमंत्री फ्रांसीस सार्दिन यांनी शिरवडे, मडगाव येथे 7.5 एमएलडी सिवरेज ट्रिटमेंट प्लांट उभारला होता. तेव्हा साळ नदीमध्ये सिवरेजचे सांडपाणी जाणार नाही, असे सांगण्यात आले होते. पण 23 वर्षांनंतरही परिस्थितीत काहीही बदल झालेला नाही. आज जिओ-बॅग तंत्रज्ञानाद्वारे साळ नदीला पूर्वीचे वैभव प्राप्त करुन देण्यासाठी जे प्रयत्न करण्यात येत आहे, ते यशस्वी होतील की नाही, हे काळच सांगू शकेल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.