Goa Politics: खरी कुजबुज; तानावडेंची महाकुंभात डुबकी

Khari Kujbuj Political Satire: गेली चार ते पाच वर्षे झाली पणजीतील स्मार्ट सिटीची कामे चालू आहेत. दरवर्षी पावसाळा जवळ आला की ही कामे पूर्ण होण्यासाठी पावसाळ्यानंतरची पक्की वेळ सांगितली जाते.
Goa political Updates
Khari KujbujDainik Gomantak
Published on
Updated on

तानावडेंची महाकुंभात डुबकी

सत्ताधारी आमदार, मंत्री प्रयागराज येथे केव्हा जाणार हे समजून येत नाही. मध्यंतरी ते जाणार होते. मात्र, उत्तर प्रदेश प्रशासनाने मौनी अमावास्येचे कारण देत या यात्रेला लाल सिग्नल दिला. म्हणून की काय खासदार सदानंद शेट तानावडे यांनी शनिवारी स्वतंत्रपणे प्रयागराज गाठून संगमात डुबकी मारली. त्यांच्यासोबत त्यांनी आपले निवडक अशा १० जणांचा गट नेला होता. त्यांची तेथील सारी व्यवस्था त्यांनी केली होती. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी याची जबाबदारी घेतली होती. यामुळे तानावडे यांनी आपली वेगळी ओळख निर्माण करणे सुरू केल्याचे यावरून मानले जाणे सुरू झाले आहे. ∙∙∙

तोपर्यंत पाऊस तर पडणार नाही ना?

गेली चार ते पाच वर्षे झाली पणजीतील स्मार्ट सिटीची कामे चालू आहेत. दरवर्षी पावसाळा जवळ आला की ही कामे पूर्ण होण्यासाठी पावसाळ्यानंतरची पक्की वेळ सांगितली जाते, पण कामे काही पूर्ण होत नाहीत अशा तक्रारी राजधानीतील रहिवाशांकडून केल्या जातात. काहीजण तर आता या कामांची म्हणजे खोदलेले रस्ते व उघडी गटारे व नाले यांची आता सवय झाल्याचे म्हणतात. असे असतानाही अगोदर केलेले रस्ते पुन्हा वेगवेगळ्या कारणांसाठी खोदले जात आहेत व ते ३१ मार्च वा एप्रिल किंवा मे अखेरपर्यंत पूर्ण केले जातील असे छातीठोकपणे सांगत आहेत. तर आता इमेजिन पणजी या कामांच्या पूर्ततेसाठी जून अखेरची मुदत सांगत आहे. त्यावरून ही कामे करणाऱ्या कोणत्याच एजन्सीला त्या कामांच्या पूर्ततेबाबत खात्री नाही हे स्पष्ट होते. त्यामुळे कोणत्याही स्थितीत पावसाळा सुरू होईपर्यंत तरी ही कामे खरेच पूर्ण होतील का? अशी विचारणा पणजीतील रहिवासी करू लागले आहेत. ∙∙∙

पाण्याचा भ्रष्टाचार!

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी २०२६ पर्यंत गोव्यात आम्ही ‘कसेबसे’ चार तासच पाणीपुरवठा करू शकू अशी ग्वाही दिल्यामुळे भाजपा कार्यकर्तेही अस्वस्थ बनले. याचे कारण पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात २४ तास पाणीपुरवठ्याचे वचन दिले होते. कार्यकर्तेच विचारू लागले आहेत की मुख्यमंत्र्यांनी तिळारी कालव्यावर ३८० कोटी रुपये खर्च करण्याची घोषणा केली. तिळारीवर हा खर्च करण्याऐवजी जर सरकारने लहानसहान धरणे, जलाशय बांधले असते, तर पाण्याबाबतीत राज्य स्वयंपूर्ण बनले असते. तसे न करता तिळारीवर करोडो रुपये खर्च करणे ही कोणाची सोय असते? तज्ज्ञ सांगतात, कंत्राटदारांवर सरकार मेहेरबान असते व त्यात नेत्यांचीही चंगळ असते. दुःखाची गोष्ट म्हणजे आज २० दिवस लोटूनही पर्वरी, बार्देशचा पाणीपुरवठा सुरळीत बनलेला नाही. म्हापशाला कालही एक तासच पाणी आले. ∙∙∙

गोव्याचा वचपा दिल्लीत

गोव्याच्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने काँग्रेसला दणका दिला होता. मत विभागणीमुळे किमान १० जागांवर काँग्रेसचे उमेदवार काही शे मतांनी पराभवास सामोरे गेले होते. त्यावेळी मतविभागणी झाली नसती, तर काँग्रेस पूर्ण बहुमतापर्यंत वाटचाल करू शकली असती. आता दिल्लीच्या निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा मिळाली नसली, तरी आपला त्यांनी मोठे नुकसान पोचवले आहे. दिल्लीतील १३ मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारांना जेवढी मते मिळाली ती भाजप आणि आप यांच्यातील फरकापेक्षा जास्त होती. एका अर्थाने काँग्रेसने आता आपसोबत तेच केले जे आपने २०२२ मध्ये गोव्यात काँग्रेससोबत केले होते याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ∙∙∙

बरे झाले गोमंतकीयाची निवड झाली!

‘घर की मूर्गी दाल बराबर’ ही म्हण आपले सरकार अमलात आणण्यात धन्यता मानत आहे याची अनेक उदाहरणे पुढे आली आहेत. आपल्याकडे चांगले व कार्यक्षम अधिकारी असूनसुद्धा आपले मायबाप सरकारचा परराज्यातील अधिकाऱ्यांवर जास्त भरवसा दिसतो. विद्यापीठ असो किंवा पोलिस खाते एवढेच काय राज्यातील अधिकाऱ्यांची भरती करण्यासाठी स्थापन केलेल्या गोवा पब्लिक सर्व्हिस कमिशनवर ही बिगर गोमंतकीय अधिकाऱ्याची निवड करून सावंत सरकारने आपले तथाकथित गोंयकारपण दाखवून दिले आहे. गोवा स्टाफ सिलेक्शनवर मात्र सरकारने नारायण सावंत या कार्यक्षम गोमंतकीय अधिकाऱ्याची नेमणूक करून सरकारने आपली चूक सुधारली आहे हे बरे झाले. मुख्यमंत्री साहेब जात धर्म विसरून कोकणीची प्रगती करू हे सांगणे सोपे. मात्र, त्यासाठी हृदयात गोंयकारपण लागते. ∙∙∙

Goa political Updates
Goa Politics: खरी कुजबुज, गोव्यात काय चालू आहे, ते पंतप्रधानांनी तपासावे!

आज फैसला मंदिर समित्यांचा!

निवडणुका आल्या म्हणजे साम दाम दंड भेद हा मंत्र आलाच. महाजन कायद्यांतर्गत सरकार दरबारी नोंदणीकृत मंदिर समित्यांच्या आज निवडणुका होत आहेत. राज्यातील मोठमोठ्या श्रीमंत मानल्या जाणाऱ्या मंदिर समितीवर निवडून येण्यासाठी महाजन धडपडत आहेत. परराज्यात स्थायिक झालेले महाजन बसगाड्या घेऊन गोव्यात दाखल झाले आहेत. निवडून येण्यासाठी काही महाजनांनी ओल्या सुक्या पार्ट्याही केल्या त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. काही ठिकाणी महाजन समित्यांवर गंभीर आरोप करून सोशल मीडियावरून बदनामी करण्याचे प्रकारही पाहायला मिळाले. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले काही उमेदवार आपल्याला मतदान करण्यासाठी महाजनांवर विविध प्रकारे दबाव आणीत असल्याची चर्चा आहे. काही ठिकाणी उमेदवारांनी पुरावा म्हणून महाजनांनी मतपत्रिकेचे फोटो काढून आणण्याची सक्ती केल्याचे कळते. ज्याच्यावर सगळ्यांची श्रद्धा असते त्या देवी देवतांच्या मंदिरांचे प्रशासन चालविण्यासाठी हा एवढा खटाटोप का? याचा अर्थ एका गोमंतकीय लेखकाने मंदिर व मंदिर समित्यांवर जो आरोप केला होता त्यात तथ्य असल्याचे सिद्ध होत नाही का? ∙∙∙

Goa political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; कंडक्टरला स्वप्न ‘कदंबा’च्या ‘डीटीओ’ पदाचे!

पर्यटन खात्याचा कारभार

हरमल येथील किनाऱ्यावर काही दिवसांपूर्वी शॅक्स कर्मचाऱ्यांनी केलेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाला आणि पोलिसांत खुनाचा गुन्हा नोंद झाला. या घटनेवरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडल्याचा आरोप झाला. ये-जा करण्याच्या मार्गावर शॅक्सवाल्याने घातलेल्या खुर्च्या काढल्यामुळे वाद झाला आणि त्यात युवकाला बेदम मारहाण झाली. मारहाण करणारे परराज्यातील लोक असल्याने शॅक्स भाड्याने दिल्याचे उघड झाले. आता एक गंमत पुढे आली आहे, पर्यटन खात्याच्या दप्तरी त्या वादग्रस्त शॅक्सचा क्रमांक तो नाहीच. दुसऱ्याच क्रमांकाच्या शॅकवर ही मारहाणीची घटना घडली होती असे म्हणणे ज्या शॅक्सचा क्रमांक सांगितला जातो त्या शॅक्सधारकाचे आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पर्यटन खात्याने ज्यांना नोटीस बजावली आहे, त्यात शॅक्स क्रमांक पाहिलाच नाही का? असा सवाल उपस्थित होतो. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com