
राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर आभार प्रदर्शन करताना संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रश्न उपस्थित केला, तो हा की अनुसुचित जाती जमातीतील एकाच कुटुंबातील तीन खासदार संसदेत आहेत का? त्यांचा रोख सहाजिकच कॉंग्रेसच्या गांधी कुटुंबातील सोनिया, राहुल व प्रियांका गांधी यांच्यावर होता. पंतप्रधानांनी गोव्यात काय चालू आहे, हे तपासावे, अशी चर्चा सध्या चालू झाली आहे. गोव्यात दोन कुटुंबातील दोन दोन आमदार व एक एक सरपंच आहे. तसेच पती -पत्नीच्या तीन जोड्या आमदार म्हणून विधानसभेत आहेत. हे सर्व भाजपचेच आहेत. आता २०२७ मधील विधानसभा निवडणुकीतही हीच स्थिती असेल किंवा पती-पत्नीच्या, वडील - पुत्रांच्या जोड्या आणखी वाढतील, अशी शक्यता लोक बोलू लागले आहेत. पंतप्रधान हे रोखू शकतील का? दुसऱ्यांच्या घरावर बोट दाखविणे सोपे, मात्र आपल्या घरात काय चाललेय, हे समजून घेणे कठीण, असेही लोक बोलू लागलेत. ∙∙∙
मांद्रेतील राजकारण आता बरेच गुंतागुंतीचे होऊ लागले आहे. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या म्हणण्यानुसार ते भाजपच्या दरवाजाबाहेर आहेत पण घराबाहेर नाहीत. आमदार जीत आरोलकर हे कधीही भाजपवासी होतील अशी मांद्रेत चर्चा आहे. त्यामुळे ते घरात जाण्यासाठी तयार आहेत, असे दिसते. माजी आमदार दयानंद सोपटे तर भाजपमध्ये असल्याने ते घरात आहेत. विधानसभा निवडणुकीत यापैकी कोणाला भाजपच्या घराचा लाभ होतो, याकडे मांद्रेवासीयांचेच नव्हे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. ∙∙∙
उत्तराखंड येथील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याला तीन सुवर्णपदके मिळाली. खरेतर ही क्रीडा खात्यासाठी आनंदाची बाब. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी या खेळाडूंचे सर्वप्रथम समाज माध्यमांवर अभिनंदन केले. ही सुवर्णपदके मिळवणे ही गोव्यासाठी भूषणावह बाब असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी समाज माध्यमांवर म्हटले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनीही अभिनंदनासाठी हात आखडता घेतला नाही. क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनीही जाहीरपणे या खेळाडूंचे अभिनंदन केले. आता या कामगिरीसाठी ते खेळाडूंच्या पाठीवर कोणती थाप मारतील त्याची एक वेगळी चर्चा क्रीडा वर्तुळात सुरू झाली आहे. या खेळाडूंना नेमकी कोणती बक्षिसी मिळेल याकडे सगळ्यांचे लक्ष आहे कारण क्रीडामंत्र्यांचा उत्तराखंड दौरा अविस्मरणीय झाला होता.∙∙∙
या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत आणि वादात असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा कुतिन्हो या पुन्हा चर्चेत आल्या आहेत. याचे कारण म्हणजे, सध्या त्यांना म्हणे, व्हॉटसॲपवरून धमक्या येऊ लागल्या आहेत. याबद्दल त्यांनी मडगाव पोलिसात तक्रारही दिली आहे. वास्तविक मडगाव येथे कुठलीही घटना घडल्यास त्याची पत्रकार परिषद बहूतेक जण मडगावातच घेतात. पण प्रतिमाने आपल्याला येणाऱ्या धमक्यांची कैफियत प्रसारमाध्यमांकडे मांडण्यासाठी राजधानीचे शहर असलेल्या पणजीला धाव घेतली. मडगावच्या पत्रकारांवर विश्वास नाही, म्हणून प्रतिमा पणजीला गेली का? की मडगावचे पत्रकार प्रतिमा यांच्या बातम्या छापत नाहीत, म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला? ∙∙∙
कोलवाळ कारागृहात ड्रग्जसह दारू तसेच मोबाईल याची तस्करी होणे, हे काही नवे नाही. असे हे प्रकार अधुनमधून होतच असतात. अनेक प्रकरणेही उघडकीस आली तरी दडपली जातात. त्यातील एखादा प्रकरणाची माहिती बाहेर आली तर तुरुंगरक्षक किंवा पोलिसांविरुद्ध कारवाई केली जाते. मात्र, त्यातील मुख्य सूत्रधार असलेले वरिष्ठ मात्र निमानिराळे राहतात. ड्रग्ज व इतर सामानाच्या तस्करीप्रकरणी जेलर व सहाय्यक उपनिरीक्षक निलंबित झाले तरी त्यांनी ज्या अधिकाऱ्यांची नावे चौकशीवेळी घेतली आहेत त्यांना मात्र इतर ठिकाणी बदली करून सोपवण्यात आले आहे. या अधिकाऱ्याला यापूर्वीही कारागृहातील वादग्रस्त प्रकरणात तुरुंग महानिरीक्षक कार्यालयात बदली झाली होती. त्याने येथील मुख्यालयातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून पुन्हा आपली बदली कारागृहात करवून घेतली होती. त्यानंतर कारागृहात ‘येरे माझ्या मागल्या’नुसार तस्करी सुरू केली होती. पोलिसांना तुरुंगात प्रवेश नसल्याने विविध सामानाची बॅग प्रवेशद्वारापर्यंत नेऊन दिल्यावर या वादग्रस्त अधिकाऱ्याच्या संगनमताने जेलर ती कारागृहात नेली जात होती. मात्र या सर्व प्रकरणातून हा अधिकारी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशिर्वादामुळे सहीसलामत कारवाईतून सुटला आहे. ∙∙∙
गोवा विधानसभा निवडणुकीला अजूनही दोन वर्षे बाकी आहेत मात्र आतापासूनच मांद्रे मतदारसंघावर डोळा ठेवून आजी - माजी आमदारांनी तसेच इच्छुक नेते कामे करू लागलेत. विद्यमान आमदार जीत आरोलकर हे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर तसेच आमदार मायकल लोबो यांच्या मतदारसंघातील कारवायांबाबत हसत हसत उत्तर देतात. मात्र, आतून त्यांना धाकधूक वाटत आहे. पार्सेकर हे अनुभवी राजकारणी व चांगले शिक्षक आहेत व ज्येष्ठ राजकारण्याचा आदर करणे हे माझे कर्तव्य आहे. त्यांच्या मतांबाबत मी काही बोलू शकत नाही. आमदार लोबो हे मांद्रेमध्ये फिरू शकतात. प्रत्येकाला कोठेही फिरण्याचा अधिकार आहे. सध्या मी सरकारमध्ये आहे. त्यामुळे सत्तेमधील कोणीही काही केले त्याकडे अधिक लक्ष देत नाही, असे आमदार आरोलकर म्हणतात. मात्र त्यांनाही माहीत आहे, की त्यांना आगामी निवडणूक जड जाऊ शकते. आता सरकारमध्ये असलो तरी निवडणुकीच्या मैदानावर विरोधकांवर मात करण्यासाठी मित्रमंडळीकडे दुर्लक्ष करून लक्ष्य गाठावे लागते. त्यानुसार वेळ आल्यावर केले जाईल. सध्या मला तरी ‘भिवपाची गरज ना’, असे मिस्किलपणे आरोलकर म्हणतात. ∙∙∙
भाटले येथे मलनिस्सारणाचे काम सुरू आहे. चार चाकीसाठी हा रस्ता बंदच आहे. फुटलेल्या जलवाहिनी दुरुस्ती काम सुरू असल्याने बुधवारी दुचाकींनाही प्रवेश बंद ठेवण्यात आला होता. यासाठी खास वाहतूक पोलिसही तैनात करण्यात आला. मात्र एका वाहतूक पोलिसावर भागले नाही. रस्ता बंद असूनही अनेक वाहने अडवण्यात आली. त्यांच्याकडून ‘लायन्सन्स’ची विचारणा करण्यात आली. अनेकांना ‘तालांव’ देण्यात आले. आधीच रस्ता खड्डेमय मग तालांव तरी कशाला, असा संतप्त सवाल नागरिक विचारत होते. मात्र पोलिसांची ‘वसूली’ थांबली नाही. ना.. रस्ते नीट, ना सुविधा., उलट नाहक त्रास, अशी स्थिती असताना पोलिसांचे ‘टार्गेट’ कधी संपणार?. ∙∙∙
मडगावात गेल्या काही वर्षांत कित्येक कोटींचे सौंदर्यीकरण प्रकल्प राबविले गेले. प्रत्यक्षात ते प्रकल्प कसे तकलादू होते, याचा भांडाफोड शेडो कौन्सिलच्या सावियोबाबांनी अनेकवार केला आहे. पण त्याची दखल संबंधित यंत्रणांनी काही घेतलेली दिसत नाही.असाच एक सौंदर्यीकरणाचा प्रकल्प पाच-सहा वर्षांपूर्वी आके वीजभवन जंक्शन ते रेल्वे स्टेशन आके बाजू ते व्हिक्टर हॅास्पिटल दरम्यान हाती घेतला गेला. त्यातील रेल्वे स्टेशन -आकेबाजू पर्यंतचे काम पूर्णही झाले आहे व त्या पुढील काम रेंगाळत सुरू आहे. ते कधी पूर्ण होईल त्याची माहिती कदाचित मडगावच्या बाबांनाच असेल, असे म्हटले जाते. पण पूर्ण झालेल्या कामातील दोन्ही बाजूंच्या पदपथाच्या पेव्हर्स सुटून पडलेले आहेत, एका बाजूचा रस्ता अजून डांबरी केलेला नाही व दोन्ही बाजूंना गवत व झुडपे वाढलेली आहेत त्यामुळे हे असेच चालणार असेल तर सौंदर्यीकरण तरी कशाला करता, अशी विचारणा लोक करत आहेत. या टप्प्याच्या सुरवातीच्या पदपथावर फळवाले, झाडे विक्री करणारे व इतरांनी बस्तान मांडलेले आहे. त्यामुळे हे रुंदीकरण व सौंदर्यीकरण अशा विक्रेत्यांसाठीच केले आहे की काय, अशी विचारणाही मडगावकर करताहेत. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.