Goa Politics: खरी कुजबुज; काल किती खून झाले?

Khari Kujbuj Political Satire: तुये येथील इस्पितळ इमारत कार्यान्वित करण्यासाठी ३० जानेवारीची मुदत मागून घेण्यात आली आहे. त्याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
Khari Kujbuj Political Satire
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

काल किती खून झाले?

राज्यात आजकाल सकाळची चहा-बिस्किटं संपायच्या आत ‘काल किती खून झाले?’ असा प्रश्न विचारला जातो. गुन्ह्यांचा आकडा इतक्या वेगाने बदलतोय की, शेअर बाजारालाही लाज वाटावी! विशेष म्हणजे हे सगळे प्रकार हमखास किनारी भागातच घडतात. जिथे पर्यटक सूर्यस्नान करतात, तिथेच कायदा-सुव्यवस्था सावलीला बसल्याची चर्चा आहे. ‘आम्ही सुरक्षित आहोत ना?’ हा प्रश्न आता फक्त बाहेरून आलेलेच नाही तर गोमंतकीयही स्वतःलाच विचारू लागले आहेत. पूर्वी ‘सुरक्षित स्वर्ग’ म्हणून ओळखला जाणारा गोवा, आता ‘सगळं सुसाट सुटलंय’ अशा चर्चांचा विषय ठरत आहे. भीतीचं वातावरण निर्माण करायला एखादी मोठी घटना पुरेशी असते, नाही का? ∙∙∙

तुये येथील इस्पितळाचा गुंता

तुये येथील इस्पितळ इमारत कार्यान्वित करण्यासाठी ३० जानेवारीची मुदत मागून घेण्यात आली आहे. त्याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. राहिलेल्या १५ दिवसांत यंत्रे कशी आणणार आणि मनुष्यबळ कसे आणणार हा प्रश्न आहे. ८ वर्षांत सरकारला जे जमले नाही, ते १५ दिवसांत कसे जमणार. सरकार हा चमत्कार कसा करणार हा चर्चेचा विषय ठरला आहे. गोमेकॉशी संलग्न असे हे इस्पितळ हवे, अशी मागणी सध्या रेटली जात आहे. सरकार आहे तेच सामाजिक आरोग्य केंद्र नव्या इमरतीत नेणार की गोमेकॉशी संलग्न असे दुसरे इस्पितळ सुरू करणार याविषयी स्पष्टता नाही. त्यावरच तर सारे काही अवलंबून आहे. ∙∙∙

बर्च बाय लेनची चर्चा अन् त्यांना अशीही धास्ती

बर्च बाय रोमिओ लेन प्रकरणी प्रश्न विधानसभेत शुक्रवारी चर्चेला आला. तो चर्चेला येणार म्हणून अनेक अधिकाऱ्यांच्या मनात धास्ती होती. ती त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. विधानसभेत विरोधक आक्रमक झाले. त्यांनी तांत्रिक विषयावर प्रश्न विचारणे सुरु केले. सरकारकडून होय चूका झालेल्या आहेत, पण त्या आधीच्या काळात असे सांगणे सुरु होते. अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरील तणाव निवळत नव्हता. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी समर्थपणे किल्ला लढवला. विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला मुद्देसूद उत्तर दिले. विषय संपला तेव्हा मुख्यमंत्र्यांनी हुश्श करण्याआधीच या अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरील तणाव नाहीसा झाला होता. ∙∙∙

रिबेलोंच्या आव्‍हानाचे युवा महोत्‍सवात पडसाद उमटणार?

आजपासून फोंड्यात दोन दिवसांचा गोवा युवा महोत्‍सव सुरू होत आहे. आता युवा महोत्‍सव म्‍हणजे, युवा ऊर्जेचा उत्‍सर्ग हा आलाच. राज्यभरातील युवकांचा उत्साह या महोत्सवात दिसून येईल. सध्‍या गोवा राखून ठेवण्‍यासाठी निवृत्त न्‍यायमूर्ती फर्दिन रिबेलो यांनी गाेव्‍यात आंदोलन छेडले असून डाेंगर कापणीला लगाम घाला असे आवाहन त्‍यांनी केले आहे. या आवाहनाचा आजच्‍या युवा महोत्‍सवात काही पडसाद उमटणार का? की युवांनी तडफेने गोव्‍याच्‍या रक्षणासाठी उतरावे असा आग्रह धरणाऱ्या कोकणीच्‍या नेत्‍यांकडून फक्‍त गुळमुळीत भूमिकाच घेतली जाणार. काय होणार ते अवघ्‍या काही तासात कळणारच म्‍हणा. ∙∙∙

सचिवाची वाचा बसली

हडफडे पंचायतीचा बडतर्फ सचिव रघुवीर बागकर याला अटक केली. त्याला शनिवारी रिमांडसाठी न्यायालयात नेण्यात येणार आहे. त्याला वैद्यकीय तपासणीसाठी पोलिसांनी आणले असता पत्रकारांनी अनेक प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. त्याला कुठे अटक केली. तो कुठे लपला होता. अपात्र ठरवलेला हडफडेचा सरपंच रोशन रेडकर कुठे आहे असे ते प्रश्न होते. पोलिसांनी चेहरा झाकलेला बागकर कोणत्याही प्रश्नाची उत्तरे देऊ शकला नाही. जणू या साऱ्या प्रकारामुळे वाचा बसली असावी असा त्याचा आविर्भाव होता. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: "मी भाजपमध्ये जाणार, ही केवळ वावडी", अफवा पसरवणाऱ्यांची तोंडं सरदेसाईंनी केली बंद VIDEO

सरपंच शरणागती पत्करणार?

बर्च दुर्घटनेच्या फाईलमधून अखेर ‘फरार’ हा शब्द काढून टाकायची वेळ आली आहे, कारण बर्च दुर्घटनेनंतर हडफडे पंचायतीचा सचिव आता थेट पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. आता साहजिकच तो ‘मला सगळं माहिती आहे’ मोडमध्ये जाणार, आणि पोलिसांसाठी नवनवीन धागेदोरे उलगडणार, अशी चर्चा आहे. सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर दोघांनीही उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी हात टेकले होते. आता सचिव सापडल्याने पंचायत मंडळाविरुद्ध बोलण्याची शक्यता वाढली आहे, आणि पोलिसांची बाजू अधिकच घट्ट होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सरपंचांना अटकपूर्व जामीन मिळणं आता स्वप्नवतच वाटतंय. पुढचा डाव काय, कायदेशीर बुद्धिबळ खेळायचं की थेट पोलिसांकडे शरण जायचं? हे पाहणं आता गावकऱ्यांसाठीही ‘पॉपकॉर्न मोमेंट’ ठरणार, अशी मिश्किल चर्चा सुरू आहे. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: खरी कुजबज; आता तरी युथ काँग्रेसला येणार अच्‍छे दिन?

आता फोंडा पोटनिवडणूक

बर्च बाय रोमिओ लेनच्या दुर्घटनेनंतर फोंडा पोट निवडणूक जणू विस्मृतीत गेल्यातच जमा झाली होती. फोंडा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे रवी नाईक यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आहे. तेथे भाजपकडून कोणाला उमेदवारी याचीच चर्चा आजवर आहे. अधून मधून मगो तेथे रितेश नाईक यांनाच उमेदवारी द्यावी, असे सांगत वातावरण तापवत ठेवत आहेत. आता ‘बर्च’ प्रकरण मागे पडून पोट निवडणुकीचा विषय चर्चेत येईल, असे वातावरण तयार होत आहे. विधानसभा अधिवेशनानंतर याकडे लक्ष देण्यास सर्वांना वेळही मिळणार आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com