
Ro-Ro Ferry Viral Video: गोव्याच्या पर्यटन उद्योगाला आणखी एक नवा आयाम देत, देशातील पहिल्या वहिल्या रो-रो फेरी सेवेचा भव्य शुभारंभ सोमवार (१४ जुलै) ला झाला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते राज्यात रो-रो फेरीचं लोकार्पण झालं, त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि नदी नेव्हिगेशन मंत्री सुभाष फळदेसाई यांचीही उपस्थिती होती. ही केवळ राज्यातीलच नव्हे, तर संपूर्ण देशातील पहिली रो-रो फेरी सेवा असून, यामुळे गोव्याचे पर्यटन आणखी बहरेल आणि स्थानिक नागरिकांनाही मोठा दिलासा मिळेल असं म्हटलं जातंय.
सध्या या रो-रो फेरीचे अनेक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत असून, तिचे अनोखं आकर्षण लोकांना मोहित करतंय. ही भव्य फेरी एकाच वेळी १६ कारगाड्या, ४० मोटरसायकल आणि शंभरहून अधिक प्रवाशांना घेऊन जाण्याची क्षमता ठेवते. रायबंदर ते चोडण या जलमार्गावर धावणारी ही फेरी पर्यटकांचं पूर्ण लक्ष स्वतःकडे वेधून घेतेय.
अथांग समुद्राच्या कुशीत वसलेल्या गोव्यामध्ये अशा आधुनिक रो-रो फेरीचे आगमन हे पाण्यावर आधारित पर्यटनासाठी एक पर्वणीच म्हणावं लागेल. या फेरीत एकदा आपली गाडी पार्क केल्यानंतर, तुम्ही थेट वातानुकूलित केबिनमध्ये जाऊन बसू शकता. या केबिनला काचेच्या मोठ्या खिडक्या जोडलेल्या आहेत, ज्यातून तुम्ही निसर्गाचा आणि वाहणाऱ्या पाण्याचा विहंगम देखावा आरामात अनुभवू शकता. सोबतच, या फेरीमध्ये उत्तम वॉशरूमची सोय उपलब्ध असल्याने, प्रवाशांना अत्यंत आरामदायी प्रवास करता येतो.
चोडण-रायबंदर रो-रो फेरीबोटीचे दर सरकारने अत्यंत किफायतशीर ठेवले आहेत, ज्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय. प्रवासी आणि दुचाकी वाहनांसाठी हा प्रवास पूर्णपणे मोफत असेल, तर चारचाकी वाहनांना केवळ ३० रुपये शुल्क आकारले जाईल. नियमित ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी खास पास सिस्टिमद्वारे ५० टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे.
या सर्व सुविधांमुळे ही रो-रो फेरी केवळ रोजच्या प्रवासासाठीच नव्हे, तर गोव्याला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठीही एक नवीन आणि महत्त्वाचे आकर्षण ठरतेय. यामुळे गोव्याच्या पर्यटनाला चालना मिळण्यासोबतच, स्थानिक नागरिकांची वाहतूक व्यवस्थाही अधिक सुलभ होईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.