

पणजी: येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडीच्या चर्चांना गती देतानाच, ‘आरजी’ने मंगळवारपासून सदस्यता नोंदणी तसेच निधी संकलन मोहीम सुरू केली. केवळ पाच रुपये भरून गोमंतकीयांना पक्षाचे सदस्यत्व घेता येईल.
तसेच निधीसाठी जुनेच बँक खाते ठेवण्यात आले आहे, अशी माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा आमदार वीरेश बोरकर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राज्य अध्यक्षा शविना नाईक शिरोडकर, खजिनदार कँडिडो कुरैया व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
सदस्यता नोंदणी मोहिमेत पक्षाच्या सर्व संघटना सहभागी होतील. ‘आरजी’ची स्थापना गोवा आणि गोमंतकीयांच्या रक्षणासाठी झाली होती. तेच ध्येय ठेवून पक्षाची वाटचाल सुरू आहे. येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक गोमंतकीयांनी सदस्यता नोंदणी मोहिमेत सहभागी होऊन पक्षाचे हात बळकट करणे गरजेचे आहे, असे आवाहन बोरकर यांनी केले.
‘आरजी’ हा गोमंतकीयांच्या विश्वासावर स्थापन झालेला पक्ष आहे. पक्षाच्या क्रांतीची मशाल आम्ही यापुढेही धगधगत ठेवू आणि सर्वांना सोबत घेऊन पुढे जाऊ, असे शविना शिरोडकर म्हणाल्या. तर, पक्षाचा आर्थिक कारभार आपण पारदर्शकरित्या हाताळू. कुणाला शंका आल्यास त्यांनी थेट आपल्याशी संपर्क साधावा, असे खजिनदार कुरैया म्हणाले.
निलंबनानंतरही खोलकरांकडून व्यवहार
माजी खजिनदार अजय खोलकर यांना पक्षातून निलंबित करण्यात आल्यानंतरही त्यांनी काही व्यवहार ऑनलाईन पद्धतीने केले आहेत. त्यामुळे खात्याचे सर्व व्यवहार सीएकडे पाठवण्यात आले आहेत. त्यांच्याकडून अहवाल आल्यानंतर किती पैशांचा अपव्यवहार झाला आहे, ते समोर येईल, असेही वीरेश बोरकर यांनी नमूद केले.
पक्षाकडे पैशांची कमतरता, मदत करा!
‘आरजी’ हा सद्य:स्थितीत गोव्यातील सर्वांत मोठा प्रादेशिक पक्ष आहे. परंतु, पक्षाकडे पैशांची कमतरता असल्यामुळे अनेक गोष्टींना खीळ बसत आहे. त्यामुळे नागरिक तसेच उद्योजकांनी पक्षाला आर्थिकदृष्ट्या मदत करावी, असे भावनिक आवाहन बोरकर यांनी केले. ‘आरजी’ची वेबसाईटही मंगळवारी रात्री लाँच करण्यात येणार आहे. त्यावर सर्वच कमिटी सदस्यांची तसेच आर्थिक व्यवहारासंदर्भातील माहिती प्रसिद्ध केली जाईल, असेही बोरकर म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.