Goa Ferry Boat: चोडण - रायबंदर जलमार्गावरील ‘साळ’ नामक जुन्या फेरीबोटीचा तराफा तुटून नदीच्या पाण्यात पडल्याने आतील वाहने व प्रवासी दोन तास अडकून पडले. नंतर बऱ्याच प्रयत्नानंतर फेरीबोटीत अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
रायबंदरहून चोडण फेरी धक्क्याकडे येणारी फेरीबोट आज सकाळी 11.30 वाजता धक्क्यावर पोचण्यापूर्वीच तिचा पुढील तराफा तुटून पाण्यात कोसळला व उजव्या बाजूकडील लोखंडी खांबही वाकला गेला.
दोन तासांनंतर आतील प्रवासी दुसऱ्या फेरीबोटीव्दारे किनाऱ्यावर आणण्यात आले, तर नदी परिवहन खात्यातील वर्कशॉपमधील मेकॅनिक व चोडणहून क्रेन आणून आतील वाहने काढावी लागली.
आजच्या या घटनेमुळे प्रवाशांत संताप तर व्यक्त होत आहेच, शिवाय ३० वर्षांची जुनी फेरीबोट या जलमार्गावर सेवेत ठेवल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. चोडणच्या नागरिकांनी या जलमार्गावरील ही ‘साळ’नामक फेरीबोट रद्द करून त्याऐवजी दुसरी नवी फेरीबोट त्वरित सुरू करण्याची मागणी केली आहे.
यासंदर्भात नदी परिवहन खात्याचे ज्येष्ठ अधिकारी विक्रमसिंग भोसले यांनी सांगितले, की जेव्हा ही फेरीबोट चोडण धक्क्यावर पोहचली तेव्हा एका बाजूकडील केबल तुटल्याने दुसऱ्या बाजूकडील केबलवर वजन झाले व त्याबरोबर तो लोखंडी खांबही वाकला व ही दुर्घटना घडली.
"सरकारी तज्ज्ञांकडून ही फेरीबोट चालविण्यास योग असल्याचे प्रमाणपत्र गेल्याच महिन्यात खात्याला मिळाले होते. या प्रमाणपत्रानुसारच फेरीबोटी जलमार्गावर चालविल्या जातात. ही फेरीबोट पणजी येथे नेऊन त्याच्या बदली ‘मडकई’ नामक फेरीबोट या मार्गावर सुरू केली आहे."
- विक्रमसिंग भोसले, ज्येष्ठ अधिकारी
"२३ जुलै रोजी झालेल्या चोडणच्या ग्रामसभेत या जलमार्गावरील जुन्या फेरीबोटी व अनागोंदी फेरीबोट व्यवस्थेवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती व आमदारांनी लक्ष घालून
सुधारणा करण्याची मागणी केली होती." "परंतु दीड महिना उलटला तरी यासंदर्भात ग्रामसभेत घेण्यात आलेल्या ठरावाची प्रत अद्याप खात्याला देण्यात आलेली नाही. फेरीबोट सेवेची सतत होणारी समस्या सोडविण्याची गरज आहे."
- आश्विन चोडणकर, युवा कार्यकर्ता
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.