Calangute MLA Michael Lobo: कांदोळीत लवकरच सुसज्ज आणि सर्वसोयींनी युक्त अशी आरोग्य केंद्राची इमारत उभारण्यात येणार असून त्यासाठी लागणारे कायदेशीर सोपस्कार पूर्ण झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्याकडूनही येथील नवीन इमारतीला हिरवा कंदील मिळाल्याचे कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी कांदोळीत सांगितले.
स्थानिक पंचायतीचे सरपंच ब्लझ फर्नांडिस तसेच पंचायत मंडळाचे इतर सदस्य तसेच आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांसहित कांदोळीत आरोग्य केंद्राची पाहणी केल्यानंतर आमदार लोबो स्थानिक प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सध्याची आरोग्य खात्याची इमारत १९६५ साली उभारण्यात आली होती. सध्या ती इमारत अत्यंत जीर्ण झालेली असून भिंतींना जागोजागी तडे गेल्याचे लोबो यांनी यावेळी सांगितले.
कांदोळीसकट आसपासच्या गावचे लोक मोठ्या प्रमाणात येथील केंद्राचा लाभ घेत असतात. शिवाय किनारी भागात बुडालेल्या तसेच अपघातग्रस्त लोकांना सर्वप्रथम प्राथमिक उपचारासाठी येथेच आणले जातात,
त्यामुळे जागेची तसेच सोयीसुविधांची कमतरता असलेल्या येथील केंद्राचा लवकरात लवकर कायापालट होणे आवश्यक होते.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राजकारणात येण्याआधी स्वतः येथील केंद्राच्या आयुर्वेद विभागात काम केलेले आहे, त्यामुळे येथील समस्यांची त्यांना पुरेपूर जाणीव आहे. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे व मुख्यमंत्र्यांनी येथील बांधकामासाठी हिरवा कंदील दाखविला आहे. नवीन इमारतीच्या उभारणीनंतर या भागातील हजारो लोकांची व पर्यटकांचीही सोय होणार आहे.
- मायकल लोबो, आमदार
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.