
खरं म्हणजे कृषिमंत्री रवी नाईक व माजी खासदार नरेंद्र सावईकर हे एकाच म्हणजे भाजप पक्षातले. पण सध्या फोंड्यातील भाजपात ‘गटबाजी’ स्पष्ट दिसते आहे. त्यामुळे कोण कोणाकडे जातो, किंवा कोण एकत्र येतात, यावर सगळ्यांचे लक्ष लागून असते. सध्या एकीकडे फोंड्याचे नगरसेवक व व भाजप उमेदवारी करता इच्छुक विश्वनाथ दळवी यांची व माजी खासदार विनय तेंडुलकर यांच्याशी ‘सोयरीक’ जमू लागली आहे. तर दुसऱ्या बाजूला दुसरे माजी खासदार नरेंद्र सावईकर यांची व आमचे ‘पात्राव’ रवी बाब यांच्याशी गट्टी होऊ लागली आहे. पात्रावच्या कोणत्याही कार्यक्रमाला सावईकर सर हजर असतातच. परवा शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला फोंडा बस स्टॅंड वर झालेल्या ‘खास’ कार्यक्रमालाही सावईकर बाब आवर्जून उपस्थित होते. राजकारणात ‘कोणी कोणाचा नाही’ असे म्हटले जाते. तरी काही लागेबांधे उठून दिसतातच. त्यामुळेच सध्या रवी व सावईकरांच्या या ‘जवळीकी’ची जोरदार चर्चा फोंड्यात सुरू झालीय. ∙∙∙
स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध दामू नाईक यांनी प्रदेशाध्यक्षपदी आल्यानंतर बोलण्याचे भान ठेवावे लागते, असे जाहीरपणे सांगितले आहे. मंत्रिमंडळ फेरबदलाचा विषय गेले वर्षभर या ना त्या कारणाने चर्चेत आहे. दामू यांना तरी मंत्रिमंडळ फेरबदल कधी याची कल्पना आहे का, याची चाचपणी केल्यावर मी बोलून सनसनाटीपणा का करू, अशी विचारणा त्यांनी केली आहे. त्यांनी न बोलून बरेच काही सांगितल्याचा अर्थ मात्र काढला गेला तर.∙∙∙
गोमेकॉच्या डॉक्टरांमध्ये समन्वयाचा अभाव इतका टोकाला पोहोचलाय की, आता रुग्णांनाच एकमेकांना मार्गदर्शन करावे लागेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. एका रुग्णाने शिबिरातून मिळालेला केस पेपर दाखवल्यानंतर प्रवेश नाकारण्यात आला. मग नव्याने केस पेपर काढण्यासाठी दोन तास वाट पाहावी लागली. पेपर मिळाल्यावर डॉक्टरांना भेटायची वेळ आली, तेव्हा डॉक्टर स्वतः काही बोलले नाहीत, ४५ मिनिटांनी सुरक्षारक्षकांच्या हाती ‘पुढील चाचण्या करा’ असा संदेश सोपवला. रुग्ण थेट चाचणी विभागात गेला, तर तिथे उत्तर मिळाले – "दोन दिवसांनी या!’ इथवर सगळं ठीक, पण खरी मजा पुढे! चाचणी विभागात दुपारी २:३० पर्यंत काम चालते, पण त्या दिवशीच विशेष सवलत ‘१.२० वाजता काम बंद!’ तीन तास महाविद्यालयाच्या वाऱ्या करूनही उपचाराचा पत्ता नाही! शिबिरातील केस पेपरचा उपयोग होणार नसेल, तर तो देताच कशाला? डॉक्टरांनीच आधी आपसात समन्वय साधावा, नाहीतर आम्ही आता डॉक्टरांना ‘तुमच्या समन्वयाचा पेपर कुठे आहे?’ अशी विचारणा करणार, असे रुग्ण बोलू लागलेत. त्यामुळे डॉक्टरांचा ‘डॉक्टर डॉक्टर खेळ’ हा विषय गोमेकॉत चर्चेचा बनला आहे. ∙∙∙
प्रयागराज येथे ‘महाकुंभ’मध्ये मुख्यमंत्री, मंत्री, आमदार व इतरांनी केलेल्या विमानप्रवासावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक अखेर बोलले. त्यांनी महाकुंभसाठी जाण्यासाठीचा हा खर्च वैयक्तिकरीत्या केल्याचे सांगितले आहे. यामुळे या दौऱ्यात सहभागी झालेल्या इतरांचे चेहरे अनेकांना आठवले. त्यांनी महाकुंभात गंगा-यमुनेच्या संगमात डुबकी मारण्यासाठी इतर या वर्गात येणाऱ्यांनी खर्च केला असेल, ही आकडेवारीही काहींच्या डोळ्यांसमोर तरळली. काही का असेना दामू नाईक यांनी त्या विषयावर बोलण्याचे धाडस
दाखवलेच. ∙∙∙
बार्देस मधील आसगावचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे, ते तेथील एका रिसॉर्टमध्ये हणजूण पोलिसांना छापा टाकून आॅनलाईन जुगाराचा पर्दाफाश केल्याने. तेथे पोलिसांनी तब्बल बाराजणांना अटक केली व साडेतीन लाखांची रोकड तसेच लॅपटॅाप व अन्य यंत्रणा जप्त केली. पोलिस म्हणतात की, खास सुत्रांतून मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई केली गेली. पण लोकांत चर्चा सुरू आहे ती वेगळीच. ते म्हणतात की, अधिकृतपणे जर एवढा प्रचंड प्रमाणात हा जुगार सापडला असेल तर चोरीछुपे किती प्रमाणात चालत असेल त्याची कल्पनाच करता येणार नाही. पोलिसांच्या गुप्तहेर विभागाला या प्रकारांची माहिती नसेल हे पटत नाही. पकडलेले बाराही जण हे परप्रांतीय व विशिष्ट गटातील आहेत ही चिंताजनक बाब. यापूर्वी एक घर अवैधपणे पाडल्याने आसगाव चर्चेत होते. तर आता या आॅनलाईन जुगारावरील छाप्यामुळे ते चर्चेत आहे. ∙∙∙
म्हार्दोळ पोलिसांनी वळवईत मोठा अवैध रेती साठा पकडला. आता ही रेती कोण कशी काढतो हे सर्वांना माहीत आहे, तरीपण आवाज उठवल्यानंतर मग पोलिसांची कारवाई होते. नेमकी तीच गोष्ट वाघुर्मे, मुर्डी परिसरात आहे. या ठिकाणीही रात्रीच्यावेळी मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन करून वाहतूकही केली जाते. हे सगळे बिनबोभाटपणे सुरू आहे, मात्र कुणी आवाज उठवला की कारवाई केली जाते, अर्थातच मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर, अशीच ही भूमिका असते, हेही आता लपून राहिलेले नाही. ∙∙∙
कुणीही मोठे कार्य केले की, त्यांचे नाव रस्त्याला द्यायची प्रथा आहे. विशेषत: त्या मोठे कार्य करणाऱ्या माणसाची आठवण सर्वांना शेवटपर्यंत रहावी यासाठी असे नामकरण केले जाते. पर्रा येथील एका रस्त्याला म्हणे स्थानिक आमदार मायकल लोबो यांचे नाव दिले आहे. आता मायकलबाबांची कार्ये मोठमोठी हे सगळेच जाणतात. त्यामुळे त्यांचे नाव या रस्त्याला दिले का? कारण पर्रा रस्त्यांवरील एका ‘नो एंट्री’ नमुदीत रस्त्यावर जो अडथळा निर्माण केला आहे, त्यावर मायकल विसेन्त लोबो रोड असे स्पष्टपणे लिहिलेले दिसते. बरे झाले त्यांच्या हयातीतच रस्त्याला त्यांचे नाव प्राप्त झाले. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.