Goa Politics:...तर गोव्यात वेगवान राजकीय बदल

Goa Politics: राजकीय उलथापालथ : आता केवळ पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निकालाची प्रतीक्षा
Goa Government
Goa GovernmentDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Politics: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल समाधानकारक नसतील, तर गोव्यातील भाजप मंत्रिमंडळात लागलीच बदल करून लोकसभा निवडणुकांसाठी नव्याने रणनीती आखली जाईल. त्यामुळे सत्ताधारी नेते या निकालांकडे धास्तीपूर्वक लक्ष देऊन आहेत. या निवडणुकांकडे लोकसभा निवडणुकांच्या पूर्वतयारीचा भाग म्हणूनच पाहिले जात आहे.

Goa Government
Vedanta News: 'सेझा’ कामगारांची सतावणूक सुुरू

‘‘भाजपने पाच राज्यांच्या निवडणुका विलक्षण गांभीर्याने घेतल्या आहेत. लोकसभा निवडणुकांचा निर्देशांक म्हणूनही त्याकडे पाहिले जाते. या निवडणुकांचा निकाल अनुकूल लागला तर ठीक, नाहीतर राज्य मंत्रिमंडळात मोठे बदल करून लोकसभा निवडणुकीत अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी पक्ष कामाला लागेल,’’ अशी प्रतिक्रिया पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘गोमन्तक’ला दिली. पक्ष संघटनेतील धुरीण याबाबतीत चर्चा करू लागले असून सुकाणू समितीच्या बैठकीतही याबाबत गुप्तपणे रणनीती आखली जात आहे.

‘‘या निकालांमुळे सरकारमध्ये संपूर्ण बदल होणे कठीण आहे; परंतु खांदेपालट जरूर होईल. काही सदस्यांना डच्चू दिला जाईल, काही खात्रीशीर चेहरे, ख्रिस्ती नेते यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल, त्याची चाचपणी सुरू झाली आहे व चतुर नेते पाच राज्यांच्या निवडणुकांचा आढावा घेत आहेत,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.

मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा व मणिपूर येथे या विधानसभा निवडणुका होत असून त्यातील पहिल्या तीन राज्यांचा राजकीय कल पक्षाला लोकसभेची तयारी करण्याच्यादृष्टीने महत्त्वाचा असेल.

‘‘या निवडणुकांमध्ये सार्वत्रिक यश प्राप्त झाले तर मात्र मंत्रिमंडळात कोणताही बदल होणार नाही, मुख्यमंत्र्यांनाही निर्धास्त राहता येईल,’’ असे जाणकार सांगतात.

राजकीय विश्लेषकांच्या मते, मध्यप्रदेशमध्ये निवडणूकपूर्व निकालांचा अंदाज काँग्रेसला अनुकूलता दर्शवितो. तेथे भाजपचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी पंधरा वर्षे पूर्ण केल्यामुळे त्यांना फारशी अनुकूलता नाही. त्यामुळे धूर्तपणाने भाजपने चौहान यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनविलेले नाही. तेथे काँग्रेसविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींचाच चेहरा पुढे करण्यात आला आहे.

राजस्थानमध्ये सत्ताधारी काँग्रेसविरोधात प्रस्थापितविरोधी मत आहे. तेथे प्रत्येक निवडणुकीत परिवर्तन करण्याची परंपराच आहे. त्यामुळे भाजपला विजयाची संधी अधिक आहे.

छत्तीसगढमध्ये काँग्रेस पक्षाला विजयाची संधी अधिक असल्याचे निवडणूकपूर्व अंदाज व्यक्त झाले आहेत. काँग्रेस पक्षाने तेथे मतदारांबरोबर सौहार्दाचे नाते निर्माण केले आहे. एबीपी - सी वोटरच्या अंदाजानुसार तेथे काँग्रेस पक्ष आपले सरकार स्थापन करेल, अशीच परिस्थिती आहे. तेथे अनेक पक्ष निवडणुकीत उतरल्यामुळे विजयी होणाऱ्या पक्षाचे मताधिक्य घटेल, पण काँग्रेस पक्ष इतरांवर मात करून सत्ता संपादन करण्यात यशस्वी होईल. तेथील सर्वेक्षणानुसार विद्यमान मुख्यमंत्री भूपेश बाघेल इतर प्रतिस्पर्ध्यांपेक्षा कितीतरी पुढे आहेत.

Goa Government
Vijay Sardesai: ‘माडाच्या फेणीला जीआय टॅग द्या’

तेलंगणा येथे भाजपला विजयाची दुरान्वयेही आशा नाही, असे भाजपच्या त्या राज्याचा दौरा केलेल्या नेत्यांना वाटते. भाजप तेथे केवळ लढायला पाहिजे म्हणून लढतो आहे, असे हे नेते म्हणतात. ‘सी-वोटर’ या संस्थेच्या मते तेथे काँग्रेस पक्षाला किंचित आशा असली, तरी तेलंगणामध्ये कोणालाही स्पष्ट बहुमत प्राप्त होणार नाही.

या निवडणुकीत मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर), भारत राष्ट्र समिती (बीआरएस) व काँग्रेस या पक्षांमध्येच अटीतटीची लढत असून बीआरएसला ४३ ते ५५ व काँग्रेसला ४८ ते ६० जागा प्राप्त होण्याचे संकेत आहेत. भाजपने ज्येष्ठ नेत्यांना रिंगणात उतरविले असले, तरी त्यांच्या पदरात ५ ते ११ जागा पडतील असा अंदाज आहे. सत्तास्थापनेसाठी ११९ सदस्यीय विधानसभेत ६० जागांची आवश्यकता आहे. मिझोराम निवडणुकीत मिझो नॅशनल फ्रंटला सत्तेवर येण्याची संधी अधिक आहे.

एका ख्रिस्ती मंत्र्याला डच्चू़ शक्य, सासष्टीला मिळणार प्रतिनिधित्व

पाच राज्यांपैकी तीन राज्यांमध्ये भाजपला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत असून निकाल विपरीत निघाल्यास आठ दिवसांत गोव्यात राजकीय बदल होतील. एका ख्रिस्ती मंत्र्याला नारळ देऊन सासष्टीला प्रतिनिधित्व दिले जाईल. त्यानंतर मडगावचे नेते दिगंबर कामत यांनाही मंत्रिमंडळात महत्त्वाचे स्थान देण्याचा विचार पक्षाला करावा लागेल. काही वादग्रस्त व अकार्यक्षम मंत्र्यांची खाती बदलली जाऊ शकतात. पक्ष संघटनेलाही आपली प्रतिमा बदलण्यासाठी त्वरित उपाय योजनेचे आदेश पक्षश्रेष्ठींकडून येऊ शकतात.

स्थानिक नेतृत्वाची लागणार कसोटी

लोकसभा निवडणुकीसाठी भाजप खूप मेहनत घेत असून प्रत्येक राज्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. भाजपला गोव्यात दोन्ही जागा महत्त्वाच्या वाटतात. दक्षिण गोव्याची जागा कोणत्याही स्थितीत हातची जाऊ नये यासाठी पक्ष यापूर्वीच कामाला लागला आहे. या निवडणुकीत दोन्ही जागा पदरात पाडल्या नाहीत, तर स्थानिक नेतृत्वाचीही कसोटी लागेल, त्यामुळे प्रमोद सावंतसुद्धा दबावाखाली आले आहेत.

काही मंत्र्यांच्या गच्छंतीची शक्यता

लोकसभा निवडणुकीनंतर काही बदल निश्चित होणार आहेत. त्यात रवी नाईक व इतर काहींच्या कार्यक्षमतेचा आढावा जरूर घेतला जाईल, परंतु विधानसभा निवडणुकांचे निकाल विपरीत लागले, तर या नेत्यांची गच्छंती तत्पूर्वीच अपेक्षित आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com