Ramesh Tawadkar: 'दिलेल्या खात्‍यांमध्‍ये दम नाही', मंत्री तवडकर उद्विग्‍न; दर्शवली राजीनामा देण्‍याची तयारी

Goa Politics: आपल्‍याकडे सोपविण्‍यात आलेल्‍या खात्‍यांमध्‍ये ‘दम’ नसल्‍याची भावना मंत्री रमेश तवडकर यांची बनली असून, दोन दिवसांपूर्वी भाजपच्‍या झालेल्‍या बैठकीत ‘ते’ उद्विग्‍न झाले.
Ramesh Tawadkar
Ramesh TawadkarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: आपल्‍याकडे सोपविण्‍यात आलेल्‍या खात्‍यांमध्‍ये ‘दम’ नसल्‍याची अणकुचीदार भावना मंत्री रमेश तवडकर यांची बनली असून, दोन दिवसांपूर्वी भाजपच्‍या झालेल्‍या बैठकीत ‘ते’ उद्विग्‍न झाले. तीव्र नाराजीला मोकळी वाट करून देत, प्रसंगी मंत्रिपदाचा राजीनामा देण्‍याची तयारी त्‍यांनी दर्शवली.

खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार, पणजीत भाजपच्‍या ज्‍येष्‍ठ नेत्‍यांची बैठक झाली. त्‍यामध्‍ये तवडकर सहभागी झाले होते. यावेळी आपल्या ताब्‍यातील खात्‍यांसंदर्भात मनातील खंत तवडकरांनी उघडपणे व्‍यक्‍त केली. कला व संस्‍कृती, तसेच क्रीडा व युवा व्‍यवहार खात्‍यांमध्‍ये तर काहीच दम नसल्‍याचा सूर त्‍यांनी आळवला.

क्रीडा खात्‍यातर्फे शेकडो कोटींचे देणे असल्‍याचे त्‍यांनी प्रकर्षाने अधोरेखित केले. भाजपच्‍या ज्‍येष्‍ठ नेत्‍यांना तवडकरांचे म्‍हणणे ऐकून घ्‍यावे लागले. उपरोक्‍त बैठकीविषयी मात्र गुप्‍तता बाळगण्‍यात आली आहे. मंत्रिमंडळ पुनर्रचनेविषयी मागील वर्षभर तर्क काढले जात होते. सभापतिपद भूषविणाऱ्या रमेश तवडकर यांना मंत्रिपद हवे होतेच.

वादग्रस्‍त मंत्री गोविंद गावडे यांची १८ जूनला सरकारमधून हकालपट्टी केल्‍या‍नंतर दोन महिन्‍यांनी २० ऑगस्‍टला राज्‍य सरकारने अखेर मुहूर्त साधला. आलेक्‍स सिक्‍वेरांचा राजीनामा घेत, तवडकर आणि कामत यांना मंत्रिपदे दिली. मात्र, खाती देण्‍यास पुन्‍हा सात दिवस ताटकळावे लागले होते.

मोठे आव्‍हान कायम

मंत्री तवडकर यांनी आदिवासी कल्‍याण खात्‍याविषयी कोणतेही विधान केलेले नाही. कला व संस्‍कृती आणि क्रीडा खात्‍याचा ढासळलेला कारभार जाग्यावर आणण्‍याचे मोठे आव्‍हान मात्र त्‍यांच्‍यासमोर आहे. तवडकर यांनी यापूर्वी मनोहर पर्रीकरांच्‍या मंत्रिमंडळात प्रभावी कामगिरी केली आहे. त्‍यांच्‍या मनात सध्‍या निर्माण झालेली खदखद भविष्‍यात निराळ्या वळणावरही पोहोचू शकते. शिवाय पक्षही त्‍यांचे विधान हलक्‍यात घेणार नाही, असे मानले जात आहे.

प्रतिक्रिया देण्‍यास नकार

भाजपच्‍या बैठकीत घेतलेल्‍या पवित्र्याविषयी प्रस्‍तुत प्रतिनिधीने मंत्री तवडकरांशी थेट संपर्क साधण्‍याचा प्रयत्‍न केला; परंतु तो होऊ शकला नाही. भाजपच्‍या ज्‍येष्‍ठ नेत्‍यांना याविषयी विचारले असता त्‍यांनी प्रतिक्रिया देण्‍यास नकार दिला.

Ramesh Tawadkar
Ramesh Tawadkar: वाड्यावाड्यावर जाऊन, युवकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे, क्रीडा शिक्षक ते मंत्री म्हणून झेप घेणारे 'रमेश तवडकर'

बैठकीत काय झाले?

१. भाजपचे मंत्री व पक्ष यांच्‍यातील समन्‍वयार्थ पणजीत नेहमीप्रमाणे नेत्‍यांच्‍या उपस्‍थितीत बैठक झाली.

२. मंत्री तवडकर यांनी आपल्‍याला ज्‍येष्‍ठतेनुसार खाती मिळाली नसल्‍याप्रति खदखद व्‍यक्‍त केली.

३. प्रसंगी मंत्रिपदाचा राजीनामा देण्‍याची त्‍यांनी तयारी दर्शविल्‍याने ज्‍येष्‍ठ नेतेही अवाक झाले.

Ramesh Tawadkar
Digambar Kamat Ramesh Tawadkar Oath: दिगंबर कामतांना देव पावला, रमेश तवडकरांसोबत घेतली मंत्रिपदाची शपथ; आता खाती कोणती मिळणार याची उत्सुकता

ज्‍येष्‍ठतेनुसार खात्‍यांची अपेक्षा केली होती व्‍यक्‍त

१ खातेवाटपापूर्वी तवडकर यांची मुख्‍यमंत्री डॉ. सावंत यांच्‍यासोबत बैठक झाली होती. तेव्‍हा प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईकही उपस्‍थित होते. आपल्‍याला ज्‍येष्‍ठतेनुसार खाती मिळावीत, अशी अपेक्षा तवडकरांनी व्‍यक्‍त केली होती.

२ काणकोण येथे स्‍थानिक पत्रकारांशी बोलताना तवडकरांनी क्रीडा, कला व संस्‍कृती खात्‍यांमध्‍ये ‘नावीन्‍यपूर्ण’ कामाची संधी अत्‍यल्‍प असल्‍याचे मत नोंदवत, शिक्षण खात्‍यात आपल्‍याला रस असल्‍याचे जाहीर विधान केले होते.

३ परंतु, तवडकर यांचा अपेक्षाभंग झाला. शिक्षण खाते मुख्‍यमंत्र्यांकडेच राहिले. कामतांना ‘बांधकाम’ हे वजनदार खाते मिळाले. त्‍याचवेळी मंत्री सुभाष फळदेसाई यांच्‍याकडे ‘पेयजल’ची धुरा सोपवून त्‍यांचे हात अधिक बळकट करण्‍यात आले.

४ तवडकरांना मंत्रिमंडळात द्वितीय क्रमांकाची खाती अपेक्षित होती, असे त्‍यांचे समर्थकही खासगीत व्‍यक्‍त होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com