Ramesh Tawadkar: वाड्यावाड्यावर जाऊन, युवकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे, क्रीडा शिक्षक ते मंत्री म्हणून झेप घेणारे 'रमेश तवडकर'

Ramesh Tawadkar Journey: जिद्द, चिकाटी व संघटन शक्तीच्या जोरावर उत्तुंग शिखरे गाठलेल्या डॉ. रमेश तवडकर यांचा जन्म आमोणे-पैंगीण येथील एका खेडे गावात २७ जुलै १९६८ मध्ये झाला.
Ramesh Tawadkar
Ramesh TawadkarX
Published on
Updated on

कोणी कोणत्या समाजात व जातीत जन्माला यावे हे जन्माला येणाऱ्याच्या हातात नसते. मात्र, मोठे होऊन त्याचे कर्तृत्व हीच त्यांची ओळख बनते. हे आमोणे येथील एका लहानशा गावात जन्मलेल्या रमेश तवडकर यांच्या बाबतीत तंतोतंत खरे आहे.

जिद्द, चिकाटी व संघटन शक्तीच्या जोरावर उत्तुंग शिखरे गाठलेल्या डॉ. रमेश तवडकर यांचा जन्म आमोणे-पैंगीण येथील एका खेडे गावात २७ जुलै १९६८ मध्ये झाला. आई लक्ष्मी, वडील बोंबो यांचे हे तिसरे अपत्य. लहानपणापासून चळवळ्या व नावीन्याचा ध्यास घेऊन आव्हाने पेलण्याचा स्वभाव होता.

आमोणे येथील सरकारी प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गावापासून सुमारे सहा किलोमीटर असलेल्या पैंगीण येथील श्रद्धानंद विद्यालयात पायपीट करीत माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. मुळात शेतकरी कुटुंबात जन्मल्यामुळे श्रमसंस्काराचे बाळकडू त्यांना मिळाले होते.

मात्र, विद्यालयात असताना समाजसेवा विषयाद्वारे श्रमदानाचा कित्ता त्यांनी गिरविला. पुढे काणकोण येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय व महाविद्यालयीन शिक्षण घेताना ‘एनएसएस उत्कृष्ट स्वयंसेवका’चा पुरस्कार त्यांनी कधीच सोडला नाही.

कला शाखेतून पदवी संपादन केल्यानंतर मिरज-सांगली अंबाबाई तालीम संस्थेच्या बीपीएड महाविद्यालयातून बीपीएडची पदवी मिळवली. आजही श्री श्रद्धानंद विद्यालयाचे दिवंगत माजी मुख्याध्यापक फ.य. प्रभुगावकर आणि कमलाकर म्हाळशी यांना तवडकर आपला आदर्श मानतात.

बीपीएड अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर श्री श्रद्धानंद विद्यालयात क्रीडा शिक्षक म्हणून तवडकर रुजू झाले. गावडोंगरी-खोतीगावातील युवक शिक्षणापासून दूर आहेत, व्यसनाधीनता बळावली आहे. त्याविषयी जागृती करून युवकांमध्ये सत्त्व जागविण्यासाठी समविचारी युवकांना बरोबर घेऊन २७ डिसेंबर १९९५ ला ‘आदर्श युवा संघा’ची स्थापना केली.

वाड्यावाड्यावर जाऊन युवकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. समाजातील मुलांना दर्जेदार शिक्षणाची दारे खुली करण्याच्या उद्देशाने ‘बलराम शिक्षण संस्थे’ची स्थापना केली. अर्धफोंड येथील एका भाड्याच्या घरात जेमतेम वीस मुलांना घेऊन पाचवीचे वर्ग सुरू केले.

त्यावेळी त्यांच्या या धाडसाची टर्र उडविली गेली. मात्र, ते खचले नाहीत. पुढे निवासी शाळेचे रूप त्याला देण्यात आले. काही काळाने ‘आदर्श ग्राम आमोणे’ येथे वर्गखोल्या उभारून शाळेचे स्थलांतर करण्यात आले.

केंद्र सरकारच्या सहकार्याने आज या ठिकाणी भव्य असे निवासी शाळा संकुल निर्माण झाले आहे. मध्यंतरीच्या काळात दहावीनंतर मुले शिक्षणाकडे पाठ फिरवितात, हे लक्षात घेऊन त्यांनी कला व वाणिज्य शाखेचे उच्च माध्यमिक विद्यालय सुरू केले. त्याला जोड म्हणून दोन वर्षांमागे आदर्श ग्रामात विज्ञान शाखा सुरू केली आहे.

शिक्षणाचा रथ ओढत असतानाच अनुसूचित जमातीला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आदर्श युवा संघाच्या मदतीने चळवळ उभारली. त्याच माध्यमातून तवडकर २००० पासून ‘गाकुवेध’ (गावडा, कुणबी, वेळीप व धनगर) संघटनेचा क्रियाशील कार्यकर्ता म्हणून काम करू लागले.

२००० मध्ये श्रीस्थळ येथे दोन हजार कार्यकर्त्यांचा सहभाग असलेल्या अधिवेशनाचे आदर्श युवा संघ व गाकुवेध संघटनेतर्फे यशस्वी आयोजन त्यांनी केले.

मध्यंतरीच्या काळात ‘उटा’ आंदोलन त्यांच्या व अन्य अनुसूचित जमातीच्या नेत्यांच्या सहकार्याने बाळ्ळी येथे छेडण्यात आले. या आंदोलनात जमातीतील दोन युवक शहीद झाले. या आंदोलनाचा अप्रत्यक्षरित्या भाजपला निवडणुकीत फायदा झाला. हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही.

२००२ मध्ये झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत तवडकरांना भाजपने पैंगीण मतदारसंघातून उमेदवारी दिली. मात्र, ते निवडणुकीत यशस्वी झाले नाहीत. २००५ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत पैंगीण मतदारसंघातून ते विजयी झाले व प्रथम आमदार बनले. २०१२ ते २०१७ या कालावधीत ते दुसऱ्यांदा आमदार बनले.

Ramesh Tawadkar
Digambar Kamat Ramesh Tawadkar Oath: दिगंबर कामतांना देव पावला, रमेश तवडकरांसोबत घेतली मंत्रिपदाची शपथ; आता खाती कोणती मिळणार याची उत्सुकता

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री बनले. त्यांच्याकडे कृषी, पशुसंवर्धन, क्रीडा व आदिवासी कल्याण ही महत्त्वाची खाती देण्यात आली. त्याच काळात कृषी क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याने त्यांना केंद्र सरकारचा ‘कृषी करमण्ये’ हा पुरस्कार प्राप्त झाला.

आदिवासी कल्याण खात्याचा पदभार सांभाळताना त्यांनी आदिवासी समाजासाठी एकवीस वेगवेगळ्या कल्याणकारी योजना आखून त्यांची कार्यवाही केली. बलराम चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ‘श्रम-धाम’ ही अभिनव योजना तवडकर यांनी सुरू केली.

Ramesh Tawadkar
Ramesh Tawadkar political career: रमेश तवडकर यांची 'श्रम-धाम फळाला, क्रीडा शिक्षक ते सभापतीपदापर्यंत यशस्वी वाटचाल, वाचा त्यांची कारकीर्द

राज्य व राज्याबाहेरील गरजूंना ज्यांना योग्य निवारा नाही, त्यांना श्रम-धाम योजनेतून घरे बांधून देण्याचा अभिनव उपक्रम त्यांनी राबविला. त्या योजनेतून आतापर्यंत ७० घरे पूर्ण झाली आहेत. त्याची दखल केंद्र सरकार व सामाजिक संस्थांनी घेऊन त्यांना या सामाजिक कार्यासाठी ‘डॉक्टरेट’ पदवी बहाल केली.

सुमारे अडीच वर्षे डॉ. प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळात सभापती म्हणून त्यांनी यशस्वी कामगिरी पार पाडली. डॉ. रमेश तवडकर यांनी एकदा कोणतीही गोष्ट मनावर घेतल्यानंतर त्यांच्या संघटन शक्तीच्या जोरावर ती यशस्वी करून दाखवितात. अर्थात त्याला साथ असते अर्धांगिनी सविता तवडकर, आदर्श युवा संघाचे प्रामाणिक कार्यकर्ते, श्रम-धाम योजनेचे वॉरियर्स आणि भाजपचे असंख्य कार्यकर्ते यांची.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com