Yuri Alemao: झुआरी ऑईल टॅंकिंग कंपनीला कठोर दंड करा; युरी आलेमाव
Yuri Alemao: दाबोळी येथील विहिरी, नाले आणि शेतजमीन पेट्रोलियम पदार्थांनी दूषित होण्याचे नेमके कारण शोधण्यात सरकारच्या अपयशाने पुन्हा एकदा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आपत्तीजनक परिस्थितीचा पर्दाफाश झाला आहे. भाजप सरकारच्या निष्काळजीपणामुळे संपूर्ण मुरगाव तालुका टिकींग बॉम्ब बनला आहे, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला आहे.
यापूर्वी मुरगाव तालुक्यातील बड्या उद्योगांमध्ये हानिकारक वायूंची गळती, स्फोटांमुळे कामगारांचा मृत्यू आणि इतर अनेक दुर्घटना घडल्या आहेत. सरकारचा बेजबाबदार आणि असंवेदनशील वृत्तीमुळेच या उद्योगांनी अजूनही योग्य धडा घेतलेला नाही आणि लोकांच्या जीवाशी खेळ सुरूच आहे. आता कायद्याचे उल्लंघन करणारे आणि लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची वेळ आली आहे, असेही आलेमाव म्हणाले.
विधानसभेच्या मार्च महिन्यातील अधिवेशनात सरकारने गोवा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण हे आपत्ती व्यवस्थापनात लागणाऱ्या मुख्य सामग्रीसाठी व इतर मदतीसाठी गोवा शिपयार्ड लि., मुरगाव बंदर प्राधिकरण, भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल आणि इतर खासगी उद्योगांवर अवलंबून असल्याची माहिती दिली होती.
यापैकी बहुतेक कंपन्या या मुरगाव तालुक्यातच असल्याचा दावा आलेमाव यांनी केला आहे.सरकारने नमूद केलेल्या सर्व कंपन्या आणि एजन्सी दाबोळीच्या नागरी व नौदल विमानतळाच्या 5 किलोमीटर परिघात आणि वास्को शहराच्या मध्यभागी तसेच झुआरीनगर येथील टेकडीवर पेट्रोलियम साठा करणाऱ्या टाक्यांसारख्या अतिजोखमीच्या स्थानकांनी वेढल्या असल्याने, एखादी आपत्ती झाल्यास संपूर्ण मुरगाव तालुकाच टिकिंग बॉम्ब बनेल आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा असाहाय्य ठरेल असा इशारा दिला होता, याची आठवण आलेमाव यांनी करून दिली. पेट्रोलियम उत्पादनांनी विहिरी, नाले, शेतजमिनी दूषित होणे ही सरकारसाठी धोक्याची घंटा आहे, असेही आलेमाव म्हणाले.
‘माहिती हक्क’चे दोन अर्ज
मुरगाव तालुक्यात विहिरींत कोणत्या स्वरूपाचे इंधनसदृश अंश सापडले आहेत, याविषयी ११ दिवस झाले तरी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ का खुलासा करत नाही? मंडळ या प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या कंपनीवर कारवाई करण्यास टाळाटाळ का करते, अशी विचारणा स्थानिकांनी साळगाव येथे येऊन गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाला केली.
गळतीचा शोध कंपनीवर अवलंबून
दाबोळीत विहिरींचे पाणी दूषित झाल्याचे आढळून एक आठवड्यापेक्षा जास्त दिवस झाले; परंतु प्रदूषणाचे नेमके कारण शोधण्यात सरकार असमर्थ ठरले आहे. पेट्रोलियम पदार्थाची गळती शोधण्यासाठी अधिकारी दोषी झुआरी इंडियन ऑईल टँकिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवरच अवलंबून आहेत, हे दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. भूजल, शेतजमीन नष्ट करणे आणि मानवी जीवनास धोका निर्माण करणे, यासाठी या कंपनीला कठोर दंड ठोठावला पाहिजे, अशी मागणी आलेमाव यांनी केली.
इंधन गळतीप्रश्नी कंपनीवर कारवाई करा : विजय सरदेसाई
वास्को येथे इंधन गळती होऊन विहिरी आणि शेतजमीन दूषित झाली, ती मानवनिर्मित आपत्ती असून ही आपत्तीजनक स्थिती वास्कोवासियांवर आणणाऱ्या झुवारी इंडियन ऑईल टँकिंग कंपनीवर कडक कारवाई करण्याची गरज गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली. ज्यांनी प्रदूषण केले आहे, त्यांना शिक्षा व्हायलाच हवी. भूजल साठे आणि शेतजमिनीचे नुकसान केल्यामुळे या कंपनीकडून पुरेपूर नुकसान भरपाई वसूल करून घेण्याची मागणी सरदेसाई यांनी केली आहे.
अद्ययावत उपकरणांचा अभाव
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तातडीने सर्व संबंधितांची बैठक बोलावून दाबोळीच्या रहिवाशांना भेडसावणाऱ्या पाणी दूषित समस्येचे निराकरण करावे. राज्यातील आपत्ती व्यवस्थापन हाताळण्यासाठी उपकरणे आणि संसाधने तसेच मनुष्यबळाची नियुक्ती करण्यासाठी केवळ मुरगाव तालुक्यावर विसंबून न राहता, राज्यातील महत्त्वपूर्ण ठिकाणे शोधून काढावीत. सरकारने कार्यक्रमांवर पैसे खर्च करणे थांबवून आपत्ती व्यवस्थापनातील अद्ययावत उपकरणे मिळविण्यासाठी निधीचा वापर करावा, अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.