शिवोली: हडफडे येथील एका खासगी मालकीच्या पर्यटकगृहात (Goa Tourist) उतरलेल्या पर्यटकांच्या साहित्याची चोरीप्रकरणी हणजूण पोलिसांनी (Anjuna Police) दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी दोघांनाही अटक करून न्यायालयासमोर (Court) उभे केले असता त्यांची सात दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. चोरीची ही घटना 20 जुलै रोजी घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक धर्मेश पांड्या या पुणे येथील पर्यटकाचा किमती लॅपटॉप तसेच अन्य सामान मिळून दीड लाखांची चोरी करून फरार झालेल्या साळगावच्या दोघा स्थानिक संशयित चोरट्यांना हणजूण पोलिसांकडून एका महिन्यानंतर चोरीस गेलेल्या सामानासहित ताब्यात घेण्यात आले. त्या दोन्ही संशयितांना सात दिवसांची पोलिस कोठडी फर्मावण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक सूरज गावस यांनी सांगितले.
ग्रील्स वाकवून केली चोरी
हडफडे येथील खासगी पर्यटकगृहात प्रतीक पांड्या हे उतरले होते. 20 जुलै रोजी पांड्या हे पर्यटनासाठी घराबाहेर पडले असता संशयित रोहन साळगावकर (27, मोलेंभाट-साळगाव) याने दरवाजाचे ग्रील्स वाकवून घरात प्रवेश केला. यावेळी घरातील किमती लॅपटॉप, मोबाईल संच, तसेच अन्य इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू मिळून अंदाजे दीड लाखाचा ऐवज त्याने लंपास केला. दरम्यान, ही घटना घडून महिना उलटला तरी हणजूण पोलिस यंत्रणा चोरट्यांच्या सतत मागावर होती. सरतेशेवटी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत हणजूण पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक पार्सेकर तसेच पोलिस पथकाने संशयित रोहित साळगावकर याच्या मुसक्या आवळण्यात यश मिळविले. रोहितची कसून चौकशी केली असता चोरीच्या किमती वस्तू त्याने साळगावातील एका व्यक्तीला विकल्याची कबुली दिली.
चोरीचा ऐवज जप्त
या माहितीच्या आधारे हणजुण पोलिसांनी त्वरित त्याला अटक केली व त्याच्या ताब्यातील चोरीच्या वस्तू ताब्यात घेतल्या. या प्रकरणात महिन्याभरापूर्वी घडलेल्या या चोरीचा छडा लावण्यासाठी हणजूण पोलिस निरीक्षक सूरज गावस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अक्षय पार्सेकर तसेच कॉन्स्टेबल अजिंक्य घोगळे, सत्येंद्र नास्नोडकर, राज परब, तसेच रुपेश आजगावकर हे महिनाभर संशयिताच्या मागावर होते. अखेर संशयित रोहन साळगावकर व समीध साळगावकर यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.