

प्रकाश तळवणेकर
पेडणे: पेडणे तालुक्याचे क्षेत्रफळ व लोकसंख्या मोठी असतानाही सार्वजनिक स्मशानभूमींची संख्या अत्यंत मर्यादित आहे. परिणामी, अनेक भागांतील नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून नव्या स्मशानभूमींची गरज अधोरेखित होत आहे.
पेडणे तालुक्याचे क्षेत्रफळ मोठे असून एक लाखांहून अधिक लोकसंख्या आहे. तालुक्यात १९ ग्रामपंचायती व एक नगरपालिका आहे. असे असले तरी संपूर्ण तालुक्यात सार्वजनिक स्वरूपाच्या पेडणे नगरपालिका क्षेत्रातील एक, तुये ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन, कोरगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन, हसापूर ग्रामपंचायत क्षेत्रातील एक आणि मोपा परिसरातील एक अशा मिळून सुमारे आठ ते नऊ सार्वजनिक स्मशानभूमी आहेत. मात्र अन्यत्र अनेक समस्यांना सामोरे जात अंत्यसंस्कार करण्याचा प्रसंग येतो.
स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध न होणे व जमीनदारांकडून स्मशानभूमीसाठी ना-हरकत दाखला न मिळणे ही दोन मुख्य कारणे आहेत. असे असले तरी पेडणे नगरपालिकेची व मुरमुसे येथील स्मशानभूमी येथे जात, समाज, प्रांतवाद यांचा भेद न करता अंत्यसंस्कार करता येतात. अन्य काही स्मशानभूमींमध्ये अटी-बंधने नसली तरी त्या ठरावीक भागातील लोकांपुरत्याच मर्यादित राहतात.
पेडणे मतदारसंघातील धारगळ, वजरी, कासारवर्णे, चांदेल-हसापूर, इब्रामपूर-हणखणे, वारखंड, उगवे-तांबोसे, मोपा-तोर्से, पोरस्कडे आदी गावांमध्ये बहुतांश ठिकाणी पक्क्या स्वरूपाच्या सार्वजनिक किंवा अन्य स्मशानभूमी नाहीत. मांद्रे मतदारसंघातही अशीच परिस्थिती आहे. केरी, पालये, हरमल, मांद्रे, मोरजी, आगरवाडा-चोपडे, पार्से, तुये व विर्नोडा या नऊ ग्रामपंचायतींमध्येही अनेक ठिकाणी हीच समस्या आहे.
विजेची सोय नाही
पेडणे नगरपालिकेच्या स्मशानभूमीचे श्रेय तत्कालीन पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांना जाते. कृषी खात्याची जमीन ताब्यात घेऊन पर्यटन खात्यामार्फत त्यांनी ही स्मशानभूमी उभारली व मोठी समस्या सोडवली. मात्र अद्याप या स्मशानभूमीत नगरपालिकेला विजेची सोय करता आलेली नाही.
भाटकारांनी विकल्या जमिनी
पेडणे तालुक्यातील मोरजी, मांद्रे, हरमल व केरी या किनारी भागांत गेल्या काही वर्षांत अनेक भाटकारांनी (जमीनदारांनी) आपली जमीन विकून टाकली आहे. पूर्वी ज्या जागांवर अंत्यसंस्कार केले जात होते, त्या जागा परप्रांतीय किंवा कंपन्यांच्या मालकीच्या झाल्याने स्थानिकांना तेथे अंत्यसंस्कार करण्यास मनाई केली जाते.
जागांभोवती कुंपण
काही गावांमध्ये पारंपरिक स्मशानभूमीच्या जागांभोवती कुंपण घालण्यात आले आहे. काही ठिकाणी जमीनमालकांनी अंत्यसंस्कारास मज्जाव केल्याने मृतदेह ताटकळत राहण्याच्या घटनाही घडल्या आहेत. काही ठिकाणी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी किंवा निषेध म्हणून मृतदेह मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर नेण्याचे प्रकारही घडले आहेत.
मोपामुळे जमिनी विकल्या
मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यानंतर पेडणे मतदारसंघातील जमिनींचे दर प्रचंड वाढले आहेत. डोंगर-जमिनी विकल्या जात असून पूर्वी ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार होत असत, तेथे आता तसे करणे शक्य राहिलेले नाही. त्यामुळे मांद्रे मतदारसंघाप्रमाणेच पेडणे मतदारसंघातही अंत्यसंस्काराची समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.
मुरमुसे येथील आदर्श
मुरमुसे येथील स्मशानभूमी मुरमुसे विकास मंच या संस्थेने सरकारी जमिनीवर उभारली आहे. प्रारंभी अंत्यसंस्कारासाठी दोन चबुतरे होते. त्यानंतर लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या प्रयत्नांतून सरकारी योजनेद्वारे आणखी एक चबुतरा व शेड उभारण्यात आले. ठरावीक शुल्क भरून ही स्मशानभूमी सर्वांसाठी खुली आहे. तसेच लहान मुले व गर्भवती अवस्थेत मृत्यू झालेल्या महिलांच्या दफनाचीही येथे व्यवस्था आहे.
प्रत्येक वाड्यावर, गावांत सार्वजनिक स्मशानभूमी हवी
पेडणे तालुक्यातील गावांची व वाड्यांची लोकसंख्या आणि व्याप्ती वाढत आहे. बहुतांश स्मशानभूमी समाजापुरत्या किंवा कुटुंबापुरत्या मर्यादित असतात. त्यामुळे इतर समाजातील व्यक्तीचे निधन झाल्यास अंत्यसंस्कार करताना मोठी अडचण निर्माण होते. याचा विचार करून प्रत्येक गावात व वाड्यावर सरकारी सार्वजनिक स्मशानभूमी असणे आवश्यक आहे. तिचा ताबा ग्रामपंचायतीकडे असावा. ज्या ठिकाणी नवीन इमारती व वसाहती उभ्या राहत आहेत, तेथे स्मशानभूमीची तरतूद सक्तीची करावी.
निश्चल शेटये, कोरगाव
चांगले घर हवे, मग चांगली स्मशानभूमी नको?
पेडणे व मांद्रे भागातील अनेक स्मशानभूमी मी पाहिल्या आहेत; मात्र त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. काही ठिकाणी तर स्मशानभूमीच नाहीत. ‘वस्ती तिथे स्मशानभूमी’ ही आजची खरी गरज आहे. ज्या ठिकाणी स्मशानभूमी आहेत, त्यांची वेळोवेळी दुरुस्ती व्हायला हवी. प्रत्येक स्मशानभूमीकडे जाण्यासाठी पक्का रस्ता, तसेच वीज व पाण्याची सुविधा असायला हवी. प्रत्येक स्मशानभूमीची नोंद पंचायत व नगरपालिकेकडे असणे गरजेचे आहे. चांगले घर हवे, मग चांगली स्मशानभूमी नको?
शिवकुमार आरोलकर, लेखक-मांद्रे
समस्या अनेक
१ पेडणे तालुक्यातील अनेक स्मशानभूमींना जाण्यासाठी रस्ते नाहीत. मृतदेह ठेवण्यासाठी व्यवस्था नाही. छप्पर नाही.
२ पावसाळ्यात झाडे-झुडपे वाढल्याने पायवाटेने खांदा देत मृतदेह नेण्याची वेळ येते.
३अचानक पाऊस आल्यास छप्पर नसल्याने अंत्यसंस्कारात व्यत्यय येतो. अनेक ठिकाणी केवळ अंत्यसंस्कार होतात म्हणून त्या जागेला स्मशानभूमी म्हणावे लागते.
४ त्यातही अनेक स्मशानभूमी ठरावीक कुटुंबीयांच्या किंवा समाजाच्या मालकीच्या आहेत.
५ त्यामुळे इतर कुटुंब, समाज किंवा परप्रांतीय व्यक्तींना तेथे अंत्यसंस्कार करता येत नाहीत.
६अशा वेळी भाड्याने शववाहिका आणून पेडणे नगरपालिका किंवा तुये येथील स्मशानभूमीत मृतदेह नेण्याची वेळ येते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.