पणजी: स्वतःला राजकीय रणनितीकार म्हणवणारे प्रशांत किशोर हे देशातील सर्वात मोठे विश्वासघातकी व्यक्ती आहे. मी पक्षात प्रवेश करतेवेळी मला मोठमोठी आश्वासने दिली होती. प्रत्यक्षात प्रशांत किशोर यांनी एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही. प्रशांत किशोर हे कसलेले खेळाडू नसून विश्वासघात करणारी बिनभरवशाची व्यक्ती आहे, असा आरोप तृणमूल काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष किरण कांदोळकर यांनी केला.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत थिवी मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार तथा जिल्हा पंचायत सदस्य कविता कांदोळकर यांनी पक्षाला रामराम ठोकल्यानंतर आता तृणमूल काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष किरण कांदोळकर हे सुध्दा लवकरच पक्षाला रामराम ठोकण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर किरण कांदोळकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, बुधवारी २७ रोजी सकाळी मी कार्यकत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत माझे समर्थक आणि कार्यकर्त्याशी चर्चा करून पुढील भूमिका स्पष्ट केली जाईल. तसेच सायंकाळी पत्रकार परिषदेत ती जाहीर केली जाईल, असे ते म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्ष सोडून जात आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर मला विचार करावा लागेल. मी अजूनही पक्षाचा राजीनामा दिलेला नाही. परंतु पक्षाने धोरण बदलले नाही तर कडक भूमिका घेऊ, असेही ते म्हणाले. पक्षाची गोवा कार्यकारिणी विसर्जित केल्याची मलाही माहिती नाही. मी नुकताच कोलकाता येथे जाऊन आलो. ममता बॅनर्जी यांची भेट होऊ दिली नाही. अभिषेक बॅनर्जी यांच्याही साधकबाधक चर्चा करून मी गोव्यात परतलो, असे श्री. कांदोळकर यांनी सांगितले.
निकालानंतर घूमजाव
निवडणूक काळात मी प्रशांत किशोर यांची कित्येकदा भेट घेतली. निवडणुकीचे सर्वाधिकार त्यांनाच होते. निवडणुकीतील सर्व उमेदवारही त्यांनीच निवडले होते. निकालानंतर पक्षाचा पराभव दिसताच त्यांनी घूमजाव करीत गोव्याच्या निवडणुकीत माझा सहभाग नव्हता, असे विधान केले. अशा व्यक्तीवर विश्वास कसा ठेवायचा, असा सवाल कांदोळकर यांनी केला. निवडणुकीपूर्वी मोठमोठ्या गप्पा मारणारे प्रशांत आता गोवा तृणमूल काँग्रेस विषयी काहीच बोलत नाहीत. प्रशांत किशोर या तथाकथित राजकीय रणानितिकाराला मुळात गोवा समजालाच नाही. यामुळे गोव्यात तृणमूलला पराभव पहावा लागला, अशी टीका कांदोळकर यांनी केली.
भाडे दिले नाही! : विधानसभा निवडणुकांसाठी प्रशांत किशोर यांच्या आयपॅकने भाडेतत्त्वावर वाहने घेतली होती. फ्लॅट घेतले होते. हॉटेल्समधील खोल्या बुक केल्या होत्या. गोवा तृणमूल काँग्रेसचे संपूर्ण नियोजन आयपॅककडे होते. यामुळे ही सर्व बिले आयपॅकने देणे आवश्यक असताना त्यांनी ते अद्यापही फेडलेले नाही. पक्षाचा अध्यक्ष या नात्याने संबंधित लोक माझ्या घरी चकरा मारत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.