Goa Politics: खरी कुजबुज; भाजपचा मोठा जोर!

Goa Latest Political News: फोंड्यातील निवडणुकीच्या प्रचारात आताच कुठे रंग भरू लागला आहे. उमेदवारी निश्‍चित झाल्यामुळे तिन्ही उमेदवार प्रचारात व्यस्त आहेत.
Goa Politics
Goa PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

भाजपचा मोठा जोर!

फोंड्यातील निवडणुकीच्या प्रचारात आताच कुठे रंग भरू लागला आहे. उमेदवारी निश्‍चित झाल्यामुळे तिन्ही उमेदवार प्रचारात व्यस्त आहेत. त्यामुळे आपापल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन भाजप, काँग्रेस आणि आपचा उमेदवार फोंडा मतदारसंघात फिरत आहे. मतदान जवळ येत जाईल, तशी जाहीर सभाही होणार आहे. यावेळेला भाजपने मोठा जोर लावला आहे. त्यामुळे केंद्रीय नेत्यांपैकी एक कोणी तरी फोंड्यात येईल, अशी अटकळ बांधली जात आहे. काँग्रेसनेही दिल्लीतील बड्या नेत्याला फोंड्यात आणण्याचा चंग बांधला असून ‘आप’चे अरविंद केजरीवाल निश्‍चित आहेत.

नेमके खरे काय?

फोंडा पोटनिवडणुकीत ‘आप’ने उमेदवारी दिलेल्‍या गीतेश नाईक यांच्‍या प्रतिज्ञापत्राला काँग्रेस आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांनी प्रतिज्ञापत्रातून सादर केलेल्‍या माहितीवरून आक्षेप घेतला. गीतेश यांच्‍यावर बंगळुरु आणि राजस्‍थानात फसवणुकीच्‍या तक्रारी असतानाही त्‍यांनी प्रतिज्ञापत्रात त्‍याची माहिती न दिल्‍याने कार्लुस यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर हरकत घेतली होती. परंतु, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेरेरा यांचा आक्षेप फेटाळत गीतेश यांना दिलासा दिला. त्‍यामुळे आप काँग्रेसविरोधात आक्रमक झालेला आहे. आपण हे केवळ सर्वोच्च न्‍यायालयाच्‍या आदेशाचा मान राखण्‍यासाठी केल्‍याचे फेरेरा सांगत आहेत. पण, फेरेरांनी हा आक्षेप राजकारण करण्‍यासाठी घेतल्‍याचा दावा आपकडून होत आहे. यात नेमके काय खरे? फेरेरांच्‍या मनात काय चाललेय? याचा शोध फोंड्यातील मतदार घेत आहेत.

रितेशना मिळणार संधी?

फोंडा मतदारसंघाची निवडणूक झाल्यानंतर राज्यातील रिक्त मंत्रिपद भरणार असल्याचे सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी केले आहे, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याचे कारण म्हणजे रवी नाईक हे भाजपा मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री होते, त्यामुळे त्यांच्या जागी त्यांचे पुत्र रितेश नाईक यांना संधी दिली जाईल काय? याची चर्चा होत आहे, तसे पाहिले तर रितेश नाईक हे मृदूभाषी असले तरी त्यांचा प्रशासनावर चांगला पगडा आहे. फोंड्यातील पीईएस शिक्षण संस्थेचे सुरवातीला सचिव आणि आता अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी त्याची झलक दाखवली आहे, त्यामुळे निवडून येऊन मंत्रिपद मिळाले, तरी त्याचे सोने करण्याची धमक रितेशकडे आहे, असे त्याचे समर्थक म्हणताहेत.

आमची देणी द्या!

पणजी पोलिसात एक वेगळेच प्रकरण पोचले आहे. दररोज लाखोंची उलाढाल करणाऱ्या कॅसिनो चालकांकडून देणी फेडली गेली नसल्याचे हे प्रकरण आहे. कॅसिनोमध्ये लाखोंचे खेळ रंगतात, पण देणी चुकती करण्याची वेळ आली की मात्र ‘गेम ओव्हर’च! अनेक विक्रेत्यांनी थकबाकी न मिळाल्याची तक्रार करत आता थेट मागणी करणे सुरू केले आहे. जिथे आतमध्ये पैशांचा पाऊस पडतो, तिथे बाहेर मात्र विक्रेत्यांना कोरडे पडलेले चित्र. व्यवहारात पारदर्शकतेच्या गप्पा मारणाऱ्यांनी आधी आपली उधारी साफ करावी, अशीच आता मागणी जोर धरतेय. नाहीतर ‘जिंकणं’ फक्त टेबलावरच आणि ‘हरणं’ मात्र विक्रेत्यांच्या नशिबी, अशी विचित्र परिस्थिती कायम राहणार का अशी विचारणा होऊ लागली आहे.

कुंकळ्ळी पालिकेचे प्रभाग चौदाच!

मतदार यादी सुधारणेनंतर कुंकळ्ळी नगरपालिकेचे प्रभाग वाढणार, प्रभाग संरचना होणार आणि आपण नगरसेवक बनणार, असे काही इच्छुकांचे स्वप्न होते. मात्र निवडणूक आयोगाने कुंकळ्ळी नगरपालिकेचे प्रभाग आहेत, तेवढेच म्हणजे चौदाच ठेवल्‍याने अनेकांच्या स्वप्नांना तडा गेला असणार. आता विद्यमान चौदा नगरसेवकांमधील किती नगरसेवक पुन्हा निवडून येणार व किती नगरसेवक निवडणुकीत उतरणार, हे पहावे लागणार. विद्यमान पालिका मंडळात युरी समर्थक दहा नगरसेवक आहेत तर भाजपा समर्थक केवळ तीनच नगरसेवक आहेत. भाजपा समर्थक एक नगरसेविका, युरी आलेमाव यांच्या कळपात दाखल झाली आहे. आता आपल्या विद्यमान अकरा समर्थक नगरसेवकांपैकी किती नगरसेवकांची उमेदवारी कापणार व किती जणांना दुसरी संधी देणार हे पहावे लागणार.

परीक्षा न्यायव्यवस्थेच्या कसोटीची!

गोव्यात सध्या एक गंभीर विषय सगळीकडे चर्चेत आहे आणि वातावरणही तितकंच तापलेलं. पण या सगळ्या गंभीरतेतही काहीजण मिस्कीलपणे म्हणताना दिसतात, आता सत्य बाहेर येण्याची स्पर्धाच लागली आहे, की काय? एकामागून एक काही मुली धाडस करून पुढे येतायत, आपल्यावर झालेल्या अन्यायाची कहाणी सांगत आहेत आणि लोकही त्यांना पाठिंबा देतायत. पण गावागावात आता एकच प्रश्न कानावर येत आहे. अजून कोणी पुढे येणार का? की येथेच पडदा पडणार? काहीजण तर हळूच म्हणतात, सगळ्यांनाच न्याय हवा आहे, पण न्यायालयात ‘भावना’ नव्हे, ‘पुरावे’ लागतात हो! त्यामुळेच सध्या सगळ्यांची नजर आहे, ती अजून कोणी पुढे येतंय का? पोलिस काय करतात, आणि सगळे खरे-खोटे कसे सिद्ध होते. सामाजिक कार्यकर्तेही म्हणे ‘वेट अँड वॉच’ मोडमध्ये बसलेत. आता पुढचा एपिसोड कधी येतो? एकंदरीत काय, गोव्यातला हा विषय सध्या फक्त चर्चेचा नाही, तर परीक्षा आहे. धाडसाची, सत्याची आणि न्यायव्यवस्थेच्या कसोटीची!

पेट्रोलविषयी गैरसमजाचा फैलाव

राज्यात तब्बल १५ दिवस पुरेल इतका इंधनसाठा उपलब्ध आहे, असे सरकार सांगत असतानाही आपल्या ‘दूरदृष्टी’चा अतिरेक दाखवत काही वाहनचालकांनी जणू उद्याच पृथ्वीवर इंधन संपणार आहे अशा थाटात पेट्रोल पंपांवर धाव घेण्याचा उद्योग सुरू केला आहे. गंमत म्हणजे, या घाईघाईत केलेल्या ‘साठेबाजी’मुळेच पंपांवरील इंधन तात्पुरते आटते, मग टँकर मागवले जातात, काही वेळ विक्री बंद होते आणि लगेच त्याच लोकांच्या तोंडून “पहा ना, इंधन संपलं!” अशी अफवा जन्म घेते. म्हणजे स्वतःच खड्डा खणायचा आणि त्यात पडून सरकारला दोष द्यायचा, अशी ही भन्नाट शक्कल! वास्तवात कमतरता नसताना कृत्रिम तुटवडा निर्माण करण्याची ही सामूहिक मानसिकता पाहिली की, संकट कमी आणि अफवांवर जगणारी आपली मानसिकता जास्त धोकादायक वाटू लागते. इंधनापेक्षा जास्त वेगाने इथे ‘भीती’ आणि ‘गैरसमज’चाच साठा वाढताना दिसत आहे.

Goa Politics
Goa Accident: नियंत्रण सुटलं अन् आयुष्य संपलं! स्कूटरवरील नियंत्रण सुटल्यानं केरळच्या 26 वर्षीय तरुणाचा गोव्यात मृत्यू

राजेश वेरेकरांची भूमिका?

फोंड्याचे काँग्रेस नेते राजेश वेरेकर हे सध्या फोंडा पोटनिवडणुकीचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांचा सक्रियपणे प्रचार करताना दिसतात. काँग्रेसने उमेदवारी भाटीकरांना दिल्यामुळे राजेश नाराज होतील आणि बंड करतील असे अनेकांना वाटत होते. पण राजेशने सामंजस्याची भूमिका घेऊन आपला भाटीकरांना पाठिंबा जाहीर केल्याचे बघून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. एका बाजूला विश्वनाथ दळवी यांना भाजपची उमेदवारी न दिल्यामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याकरता प्रदेशाध्यक्ष दामू नाईक व मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना यावे लागते, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे राजेश वेरेकर स्वतःहून भाटीकराना पाठिंबा जाहीर करतात, हा विरोधाभास फोंड्यात सध्या चर्चेचा विषय बनला आहे. याबाबत काँग्रेसने आघाडी घेतल्याचे बोलले जात आहे. राजेशची ही भूमिका २०२७ ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेतली असावी, असा तर्क व्यक्त होत असला तरी सध्या या त्यांच्या भूमिकेचे फोंड्यात वारे माप कौतुक होताना दिसत आहे. आता राजेशची ही भूमिका तसेच त्यांची व केतनांची जोडी या पोटनिवडणुकीत कोणता ‘करिश्मा’ दाखविते याचे उत्तर मात्र येत्या काही दिवसात मिळणार आहे, एवढे नक्की.

हरकत फेटाळली!

फोंडा मतदारसंघात खरे म्हणजे दोघांतच खरी लढत होणार आहे. एक म्हणजे भाजपचे रितेश नाईक तर दुसरे म्हणजे काँग्रेसचे केतन भाटीकर. मात्र तिसरा उमेदवार ‘आप’चा गितेश नाईक हेही निवडणूक रिंगणात आहेत. पण त्याला तेवढा प्रतिसाद नाही, असा सूर व्यक्त करण्यात येत आहे. आता ‘आप’चा उमेदवार काँग्रेसची मते फोडणार हे नक्की, अशीही चर्चा होताना दिसते, त्यामुळेच की काँग्रेसने ‘आप’चा धसका घेत गितेश नाईक याच्या उमेदवारीवर हरकत घेतली होती, पण गितेश नाईक बचावले आणि हरकत फेटाळली. त्यामुळे सध्या तरी काँग्रेसवाल्यांसमोर टेन्शन आहे. आता हे टेन्शन कसे निस्तरायचे, याचाच विचार काँग्रेसवाले करीत आहेत.

Goa Politics
Goa Cabinet Expansion: पोटनिवडणुकीनंतर मंत्रिमंडळ विस्तार, मुख्यमंत्र्यांची भूमिका कायम; राजकीय हालचालींना वेग

एफडीएतील कार्यतत्परता

सरकारी कार्यालय म्हणजे आलेल्या नागरिकास कोणते, तरी कारण पुढे करून वाटेला लावणे, हे ठरून गेलेले असते. मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात जाण्याशिवाय अशा नागरिकांना मग पर्याय राहत नाही. बांबोळीला असलेले एफडीएचे कार्यालय मात्र याला अपवाद असावे. तेथे गेल्यावर उजवीकडे मदत कक्ष आहे. तेथे कोणी नागरिक एफडीए संदर्भात आपली समस्या घेऊन गेल्यावर तेथील तरूण मदत करण्यास सदैव तत्पर असतो. काल बुधवारी तर त्याने एफडीए नोंदणीसाठी अर्ज केलेल्या आणि अतिरीक्त कागदपत्रे अपलोड करण्यासाठी अडचण येणाऱ्या एका अर्जदारास मदत करण्यासाठी आपली खुर्ची सोडली आणि कक्षाबाहेर येऊन अर्ज करा दुरुस्त करावा, असे त्या नागरिकास दाखवले. त्यामुळे सरकारी कार्यालयातील हा सुखद अनुभव तो नागरिक परतला, पण त्याने हा अनुभव इतरांना सांगण्याचा मोह मात्र आवरला नाही आणि एफडीएची कीर्ती सगळीकडे पसरली. इतर सरकारी खात्यांनी याचे अनुकरण केले तर निदान साखळीतील जनता दरबारातील गर्दी कमी होईल, अशी चर्चा सुरू झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com