

पणजी: अटल सेतूवरून पर्वरी उन्नत मार्गावर जाण्यापूर्वी डावीकडील सेवा रस्त्यावरून पर्वरीत जाण्यासाठी एक मार्गिका खुली करण्यात येणार आहे. त्याच मार्गिकेचा वापर करून पणजीहून म्हापशाच्या दिशेने जाणारी मांडवीच्या दोन्ही पुलांवरील वाहने उन्नत मार्गावर जाण्याची सोय केली जाणार आहे.
त्याचबरोबर उन्नत मार्गावरून अटल सेतूवर जाण्यापूर्वी डावीकडे एक मार्गिका सेवा रस्त्यावरून पणजीला जाण्यासाठी ठेवली जाईल. त्यासोबतच सेवा रस्त्यावरून पर्वरीवासीयांना अटल सेतूवर जाण्यासाठी एक मार्गिका उपलब्ध केली जाणार आहे. ही सारी व्यवस्था करण्यासाठी ‘निओ मॅजेस्टीक’ तसेच विरुद्ध बाजूला ३० सेकंद वाहतूक रोखून धरणारे सिग्नल बसविण्यात येणार आहेत. सिग्नल बसवेपर्यंत येत्या गुरुवारपासून वाहतूक पोलिस तैनात ठेवून ही व्यवस्था प्रायोगिक तत्त्वावर राबवली जाणार आहे. अटल सेतू हा चौपदरी आहे, तर उन्नत मार्ग हा सहापदरी आहे. याचा अर्थ दोन्ही दिशांना मिळून दोन मार्गिका जादा आहेत. त्यांचा वापर पर्वरीतील वाहनांना मार्गावर ये-जा करण्यासाठी केला जाणार आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पर्वरी उन्नत मार्गावरील वाहतूक कोंडी तसेच स्थानिकांना येणाऱ्या प्रवेश-निर्गमनाच्या अडचणी दूर करण्यासाठी तीन संरचनात्मक बदल करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला. आयआयटी खरगपूरच्या सूचनांच्या आधारे हे बदल करण्यात येणार असून, हे काम येत्या एक-दोन दिवसांत सुरू करून आठवडाभरात नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.
मुख्यमंत्री सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, पर्यटनमंत्री तथा पर्वरीचे आमदार रोहन खंवटे, म्हापशाचे आमदार तथा सभापती जोशुआ डिसोझा, सार्वजनिक बांधकाम खाते, वाहतूक पोलिस आणि गोवा पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उन्नत मार्गाचे तांत्रिक व वाहतूक सल्लागार असलेल्या आयआयटी खरगपूरच्या पथकाने बैठकीत आभासी माध्यमातून सहभाग घेतला. बैठकीत ठरविलेल्या उपाययोजना आठ दिवसांत सुरळीतपणे कार्यान्वित करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे सावंत यांनी सांगितले.
दरम्यान, ‘आयआयटी’ तसेच ‘आयआयएम’च्या सल्लागार पथकांनी सुचविलेल्या शिफारशींच्या तांत्रिक योग्यतेबाबत आमदार खंवटे यांनी प्रश्न उपस्थित केले. या शिफारशींची स्वतंत्रपणे पडताळणी करण्याची मागणी त्यांनी केली. बैठकीत दिलेल्या आश्वासनांच्या अंमलबजावणीवर दररोज लक्ष ठेवले जाणार असून, आठवड्यानंतर परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा बैठक घेण्याची मागणी करणार असल्याचे खंवटे यांनी सांगितले. उन्नत मार्गाच्या बांधकामामुळे दीर्घ काळ त्रास सहन केलेल्या पर्वरीतील नागरिकांच्या समस्या केवळ राष्ट्रीय महामार्गाच्या नियमांचा दाखला देऊन दुर्लक्षित करता येणार नाहीत, असेही खंवटे यांनी नमूद केले.
उन्नतमार्गाचे पडसाद : मेरशी, पर्वरीत वाहतूक कोंडी
पर्वरी उन्नत मार्गाचे प्रवेश आणि निर्गमन मार्ग बंद केल्याने आज मेरशी महामार्ग आणि पर्वरी परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. मेरशी सर्कल, निओ मॅजेस्टिक हॉटेल परिसर, मॉल दि गोवा या भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. गुगल मॅपवरही या मार्गावर वाहतूक संथ गतीने सुरू असल्याचे दिसत होते. विशेषतः पणजी - मडगाव महामार्गावर (एनएच-६६) आणि पर्वरीकडे जाणाऱ्या मार्गावर याचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना आणि प्रवाशांना याचा मोठा फटका बसत असून, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
त्रुटींसाठी जबाबदारी निश्चित करा : खंवटे
या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करणारे सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकारी सध्या खात्यात नसले तरी प्रकल्पातील त्रुटींसाठी जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे. आजच्या बैठकीतील निर्णयांच्या अंमलबजावणीच्या आधारे मुख्यमंत्र्यांना पत्र देणार असल्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी स्पष्ट केले.
‘त्या’ तरतुदी काढल्या कोणी? : माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी उन्नत मार्गाच्या मूळ आराखड्याचा मुद्दा उपस्थित केला. सुरुवातीपासूनच उन्नत मार्गावर दुचाकींना परवानगी देण्यास माझा विरोध होता, असे त्यांनी सांगितले. मूळ आराखड्यात चढ-उतारासह पर्वरीतील रहिवाशांसाठी प्रवेश आणि बाहेर पडण्याची सुविधा होती. मात्र, नंतर या तरतुदी काढून टाकल्याचा दावा काब्राल यांनी केला.
दुचाकी प्रवेशाचा विषय गुलदस्त्यातच
उन्नत मार्गावरील अपघातांची शक्यता कमी करण्यासाठी रस्त्यावरील वेग नियंत्रक पट्टे, गतिरोधक, वेगनोंदणी कॅमेरे आणि वाहनचालकांना आगाऊ सूचना देणारे ठळक फलक बसविण्याचा निर्णयही घेण्यात आला. मात्र, उन्नत मार्गावर दुचाकींना प्रवेश देण्याचा मुद्दा बैठकीत चर्चेला आला नसल्याचे मंत्री कामत यांनी स्पष्ट केले.
तीन प्रमुख बदल असे..
सार्वजनिक बांधकाम मंत्री कामत यांनी बैठकीनंतर तीन प्रमुख बदलांची माहिती दिली.
'सीएचओजीएम' मार्गावरून कळंगुटच्या दिशेने जाणाऱ्या आणि तेथून येणाऱ्या वाहनांसाठी प्रवेश व निर्गमनाची सुविधा, तसेच पर्वरीतील नागरिकांना अटल सेतूकडे जाण्यासाठी स्वतंत्र प्रवेशमार्ग उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हे तीन बदल तत्त्वतः मान्य केले असून, त्याची अंमलबजावणी तातडीने केली जाणार आहे.
पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी स्थानिक नागरिकांच्या वतीने मांडलेल्या सूचनांचाही विचार केल्याचे कामत यांनी स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.