Porvorim Elevated Road: पर्वरीच्या असह्य वाहतूक कोंडीवर 'उन्नत' उतारा! 641 कोटींच्या सहापदरी मार्गाचे गडकरींच्या हस्ते उद्घाटन; शुक्रवारपासून वाहतूक सुरू

Porvorim Elevated Road Inauguration: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी, वरिष्ठ अधिकारी तसेच नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
Porvorim Elevated Road Inauguration
Porvorim Elevated RoadDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: उत्तर गोव्याच्या वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाचा टप्पा ठरणाऱ्या पर्वरी येथील सहापदरी उन्नत मार्गाचे उद्‍घाटन उद्या, ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. मात्र, उद्‍घाटनानंतर लगेच या मार्गावर नियमित वाहतूक सुरू केली जाणार नाही. ११ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता या मार्गावरून प्रत्यक्ष वाहतूक सुरू होणार आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी, वरिष्ठ अधिकारी तसेच नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. उत्तर-दक्षिण प्रवास अधिक वेगवान पर्वरीत सातत्याने होणारी वाहतूक कोंडी, विशेषतः कार्यालयीन वेळेत आणि पर्यटन हंगामात निर्माण होणारी वाहतूक समस्या लक्षात घेता या उन्नत मार्गाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

Porvorim Elevated Road Inauguration
Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

उन्नत मार्गामुळे पर्वरीतील प्रमुख जंक्शनवर वाहतूक अडथळ्याविना पुढे जाण्यास मदत होणार असून, उत्तर गोवा ते दक्षिण गोवा प्रवासाचा वेळ कमी होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पामुळे विद्यमान राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचे नियोजनही अधिक सुलभ होणार आहे. जमिनीवरील मार्गाचा वापर स्थानिक वाहतुकीसाठी अधिक प्रमाणात करता येणार असल्याने पर्वरी परिसरातील अंतर्गत वाहतुकीलाही फायदा होण्याची शक्यता आहे.

८८ खांबांनी पेललाय भार

या उन्नत मार्गाच्या बांधकामात ५३० पाइल्स, ८८ पाइल कॅप्स, ८८ पिअर्स आणि ८८ कॅप्स उभारले आहेत. उन्नत मार्गाच्या अधिरचनेसाठी तब्बल १,४३१ पूर्वनिर्मित सिमेंट विभागांचा वापर केला आहे. गोव्यात प्रथमच अशा प्रकारच्या मोठ्या प्रकल्पात सेगमेंट कास्टिंग आणि लॉन्चिंग तंत्रज्ञानाचा वापर केल्याचे ‘साबांखा’कडून सांगण्यात आले. राजस्थानस्थित आरआरएसएम इन्फ्रा या कंपनीने ५ सप्टेंबर २०२४ रोजी प्रकल्पाचे काम सुरू केले होते. प्रकल्प पूर्ण करण्याबरोबरच पुढील १० वर्षे देखभालीची जबाबदारीही या कंपनीवर सोपविली आहे.

दोन दिवस नागरिकांसाठी खुला

उदघाटनापूर्वी गेल्या दोन दिवसांपासून हा उड्डाणपूल नागरिकांना पाहता यावा, यासाठी खुला करण्यात आला होता. त्यामुळे पर्वरीतील या नव्या वास्तूचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यासाठी नागरिकांची उत्सुकता दिसून आली. मात्र, नियमित वाहतूक सुरू करण्यासाठी ११ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Porvorim Elevated Road Inauguration
Goa Beach Shacks: तब्बल 450 शॅक होते, नोंदणीविनाच! शॅकवरही पर्यटन खात्याचा अंकुश; नोंदणी आता अनिवार्य

१२० टनचा एक विभाग; ५१ ट्रकच्या वजनाएवढा भार

या प्रकल्पाच्या बांधकामादरम्यान वापरलेले विशेष लॉन्चर हेही चर्चेचा विषय ठरले. प्रत्येक पूर्वनिर्मित विभागाचे वजन सुमारे १२० टन होते. हे वजन जवळपास तीन ट्रकच्या नव्हे, तर दिलेल्या तुलनेनुसार ५१ ट्रकच्या एकत्रित वजनाइतका भार हाताळण्याच्या क्षमतेचे आव्हान होते. त्यामुळे बांधकामासाठी वापरलेल्या लॉन्चरची क्षमता नेहमीच्या सुमारे १,६०० टन क्षमतेपेक्षा वाढवून २,०४० टन केली होती. एकावेळी तब्बल १७ विभाग जागेवर धरून बसविण्याचे आव्हान या यंत्रणेसमोर होते.

पर्यावरणीय आणि अभियांत्रिकी आव्हाने

पर्वरीतील दाट नागरी वस्ती, विद्यमान राष्ट्रीय महामार्गावरील प्रचंड वाहतूक, जमिनीखालील विविध सुविधा आणि पावसाळी हंगाम यांमुळे या प्रकल्पाच्या बांधकामासमोर अनेक पर्यावरणीय तसेच अभियांत्रिकी आव्हाने होती. वाहतूक सुरू ठेवत बांधकाम करण्याचे मोठे आव्हानही यंत्रणेसमोर होते. प्रकल्पामध्ये केवळ उन्नत मार्गाची उभारणी न करता भूमिगत सेवा वाहिन्या, विद्यमान सेवा वाहिन्यांचे स्थलांतर, राष्ट्रीय महामार्ग ६६ लगत निचरा व्यवस्था, पादचारी मार्ग आणि उन्नत मार्गाखालील सुशोभीकरण यांचाही समावेश आहे.

दहा वर्षांचा देखभाल करार

दहा वर्षांच्या देखभाल करारामुळे उड्डाणपुलाची देखभाल, दुरुस्ती आणि आवश्यक तांत्रिक बाबी दीर्घकाळ व्यवस्थित राखण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे उदघाटनानंतर केवळ वाहतूक कोंडी कमी करण्याचे नव्हे, तर पुढील अनेक वर्षे पर्वरीच्या वाहतूक व्यवस्थेला नवा आकार देण्याचे आव्हान या प्रकल्पासमोर असेल.

दररोज ७५ ते ८० हजार वाहनांचा पेलणार भार : सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सूत्रांनुसार, या मार्गावरून दररोज सुमारे ७५ ते ८० हजार वाहने धावण्याची शक्यता आहे. म्हणजेच या मार्गावरील एकूण वाहतुकीपैकी जवळपास ६० टक्के वाहतूक उन्नत मार्गावरून वळविली जाणार आहे. उर्वरित सुमारे ४० टक्के वाहतूक जमिनीवरील विद्यमान रस्त्यावरून सुरू राहणार आहे.

Porvorim Elevated Road Inauguration
Goa Medical Act: गोवा वैद्यकीय हिंसाचार कायद्याचे कलम 7 घटनात्मक आहे का? उच्च न्यायालयात आव्हान; राज्य सरकारला उत्तरासाठी 3 आठवड्यांची मुदत

६४१ कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प : सुमारे ५.१ किलोमीटर लांबीचा सहापदरी उन्नत मार्ग पर्वरीतील हॉटेल मॅजेस्टिकपासून ग्रीन लॅण्ड जंक्शनपर्यंत उभारला आहे. सुमारे ६४१ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे पर्वरीतील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. वाहनांची संख्या तसेच पुढील १५ ते २० वर्षांच्या वाहतूक गरजा लक्षात घेऊन हा प्रकल्प आखला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com