Pooja Naik: 3 कोटींची वाहने, 1 कोटींचे दागिने वापरणारी 'पूजा'च दोषी! मंत्री, अधिकाऱ्यांना क्‍लीन चिट; पैसे मालमत्तेतून करणार वसूल

Pooja Naik cash for job: पूजा हिने लोकांकडून नोकरी देण्याच्या बदल्यात घेतलेले पैसे तिच्या मालमत्तेतून वसूल करण्यावर आता पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे.
Pooja Naik
Pooja NaikDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: नोकऱ्यांचा काळ्याबाजार प्रकरणात पूजा नाईक हिने केलेले सर्व आरोप पोलिस तपासात खोटे असल्याचे आढळल्याचे पोलिसांनी जाहीर केले. पूजा हिने लोकांकडून नोकरी देण्याच्या बदल्यात घेतलेले पैसे तिच्या मालमत्तेतून वसूल करण्यावर आता पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे.

या प्रकरणात पूजा हिने मंत्री सुदिन ढवळीकर, अभियंता उत्तम पार्सेकर आणि अधिकारी निखिल देसाई यांची नावे घेऊन खळबळ उडवून दिली होती. मुख्यमंत्र्यांनी याविषयी तपासाचे आदेश दिल्यावर पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागातील गुन्हे शाखेने तपास केला.

पूजा हिने केलेले सर्व आरोप तथ्यहीन असल्याचे स्पष्ट झाल्याचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत आज स्पष्ट केले. पूजाने केलेले सर्व आरोप खोटे असून या प्रकरणातील चौकशी बंद केल्याचेही त्यांनी जाहीर केले.

गुप्ता यांनी ‘कॅश-फॉर-जॉब’ आरोपांच्या तपासाचा अहवाल जाहीर केला. त्यांनी सांगितले की, नाईकने एका वरिष्ठ मंत्र्यासह काही अधिकाऱ्यांवर पैसे घेऊन नोकऱ्या देण्याचा घोटाळा चालवित असल्याचा आरोप केला होता.

मात्र, तपासात हे सर्व आरोप आधारहीन, खोटे आणि अप्रमाणित असल्याचे निष्पन्न झाले. उलट, पूजा नाईकच सरकारी नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या उमेदवारांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक करत असल्याचा भक्कम पुरावा पोलिसांना मिळाला आहे.

उमेदवारांच्या पैशातून ऐषोआराम

बीएमडब्ल्यू, ऑडी, फॉर्च्युनर, जेसीबी यांसह ३ कोटींपेक्षा जास्त किमतीची वाहने

१ कोटींहुन अधिक किमतीचे दागिने

घर दुरुस्तीसाठी ९० लाखांहून अधिक गुंतवणूक

मंदिराला १५ लाखांची देणगी

फर्न कदंबा हॉटेलमध्ये ४ लाखांपेक्षा अधिक खर्चाचा मुक्काम

‘तो’ फ्‍लॅट कधीही सरकारी अधिकाऱ्यांकडे नव्‍हताच!

१.   पूजा हिने पर्वरी पीडीए कॉलोनीत पैसे देत असल्याचे दावे केले होते. मात्र, पूजाने दाखवलेला तो फ्लॅट कधीही सरकारी अधिकाऱ्यांच्या वापरात नव्हता. मालक व भाडेकरू नोंदीत फक्त हॉटेल मॅनेजमेंटचे विद्यार्थी राहिल्याचे निष्पन्न झाल्याचे देखील पोलिसांनी सांगितले.

२.  तसेच पूजा हिने जप्त मोबाईलमध्ये रोख व्यवहाराचे व्हिडिओ असल्याचा दावा केला होता; पण तपासात तो मोबाईल तिच्या पतीने सहारनपूर (यूपी) येथे विकल्याचे उघड झाले आणि त्यामध्ये काहीही नाही, हे आमच्या तपासात स्पष्ट झाल्याचा खुलासा देखील गुप्ता यांनी केला.

३. दरम्यान, पूजाचे कॉल डिटेल्स, व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स तपासूनही तिने आरोप केलेल्या अधिकाऱ्यांशी कोणताही संवाद आढळला नाही. तिने उमेदवारांकडून १७ लाख रुपये प्रति व्यक्ती घेतल्याचा दावा केला. पण तिच्या, पतीच्या व मुलींच्या खात्यातून ८ कोटी रुपयांहून अधिक व्यवहार झाल्याचे सिद्ध झाले. मात्र सरकारी अधिकाऱ्यांकडून एकाही व्यवहाराचा मागोवा मिळाला नाही.

तन्‍वी नावाची व्‍यक्‍तीच अस्‍तित्‍वात नाही!

पूजा हिने २०१२ मध्ये आपण मगो पक्षाच्या कार्यालयात काम केल्याचा दावा केला होता; पण कार्यालयातील सर्व कर्मचारी, नोंदी, पगार स्लिप, हजेरी आणि इतर कोणत्याही दस्तऐवजात तिचा कुठलाही उल्लेख सापडला नाही.

तसेच तिने तन्वी नावाच्या व्यक्तीकडे ६१३ उमेदवार व त्यांच्या पैशांच्या नोंदी असलेली डायरी दिल्याचे सांगितले. पण ती व्यक्तीच अस्तित्वात नसल्याचे, तसेच पूजाकडे तन्वीचा संपर्क देखील नसल्याचे पूजा हिने स्पष्ट केल्याचे राहुल गुप्ता यांनी सांगितले.

महत्त्वाचे निष्कर्ष

मगो कार्यालयात काम केल्याचा दावा खोटा

६१३ उमेदवारांची “डायरी” अस्तित्वातच नाही

‘स्कॅम ऑफिस’चा दावा खोटा

“पुराव्यांचा मोबाईल” कधीच पोलिसांकडे नव्हता

अधिकाऱ्यांशी कोणताही संपर्क नाही

आर्थिक उलाढालीत मोठा घोटाळा

Pooja Naik
Pooja Naik: 'पूजा नाईकचे सर्व दावे खोटे!' गोवा पोलिसांच्या तपासावर मुख्यमंत्र्यांचा शिक्कामोर्तब; म्हणाले, तपास अजूनही थांबलेला नाही...

पोलिसांकडून आवाहन

पोलिस पूजाकडून संबंधित रक्कम वसूल करून पीडितांना परत देण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू करत आहेत. म्हार्दोळ ठाण्यातील तक्रार आता पुढील सखोल आर्थिक तपासासाठी क्राईम ब्रँचकडे वर्ग करण्यात आली असून बळी ठरलेल्या सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन पोलिसांनी केले.

Pooja Naik
Pooja Naik: 'पूजा नाईकच लोकांना फसवत होती', गुन्हे शाखेचा मोठा खुलासा! 17.68 कोटी रुपयांच्या 'कॅश फॉर जॉब'चे आरोप खोटे

आधीच पाच फसवणुकीचे गुन्‍हे

पूजाविरुद्ध वास्को, डिचोली, पणजी, पर्वरी आणि म्हार्दोळ येथे गुन्हे नोंद आहेत. तिच्या पतीवरही दोन गुन्हे आहेत. मे ते ऑक्टोबर २०२५ दरम्यान नाईकने पीडित लोक ‘हैराण करत आहेत’ अशी तक्रार नोंद केली होती.

आरोपीचे दावे खोटे ठरले. तपास थांबलेला नाही. ही केस अजूनही सुरू आहे आणि चौकशीही होत राहील.

प्रमोद सावंत, मुख्‍यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com