Khari Kujbuj Political Satire: गत म्हणजे २०२२ मधील निवडणूक जरी बाबूंनी पक्षाच्या सांगण्यावरून मडगावातून लढविलेली असली तरी त्यात पराभव पत्करल्यावर आपण पुन्हा पेडणेत येणार असे त्यांनी जाहीर केले होते व त्यामुळे तेथील त्यांचे समर्थक खूषही झाले होते.
Khari KujbujDainik Gomantak

खरी कुजबुज: फोंड्यातील प्रकल्प काँग्रेसचे की रवींचे?

Khari Kujbuj Political Satire: गत म्हणजे २०२२ मधील निवडणूक जरी बाबूंनी पक्षाच्या सांगण्यावरून मडगावातून लढविलेली असली तरी त्यात पराभव पत्करल्यावर आपण पुन्हा पेडणेत येणार असे त्यांनी जाहीर केले होते व त्यामुळे तेथील त्यांचे समर्थक खूषही झाले होते.
Published on

फोंड्यातील प्रकल्प काँग्रेसचे की रवींचे?

फोंड्यात आत्तापर्यंत पूर्ण झालेले मार्केट प्रकल्प, क्रीडा प्रकल्प, उपजिल्हा इस्पितळ यासारखे बहुतेक प्रकल्प हे काँग्रेसच्या कारकिर्दीत पूर्ण झाले होते असे फोंड्याचे काँग्रेसचे नेते राजेश वेरेकर जाहीरपणे सांगतात. त्यांच्या बोलण्यात तथ्यांश आहे. हे जरी खरे असले, तरी हे प्रकल्प रवी नाईक काँग्रेस राजवटीत मुख्यमंत्री, गृहमंत्री असताना त्यांच्या अखत्यारीत पूर्णत्वास गेले होते हे सांगण्यास ते विसरतात किंवा हेतू पुरस्सर टाळतात. आता याला राजकीय रणनीती म्हणावे का ताकाला जाऊन गाडगे लपवण्याचा प्रकार म्हणावा हे मात्र कळत नाही. रवींच्या कार्यकर्त्यांत सध्या याचीच चर्चा सुरू आहे. ∙∙∙

बाबूंनी पेडण्यात येऊन बोलावे!

या दिवसात गोव्यात डीएनए चाचणीच्या मुद्यावरून जे वादळ उठले आहे, ते अनेक राजकारण्यांना अडचणीत आणणारे आहे. सत्ताधाऱ्यांतील अनेकजण तर हा विषय निघाला की तोंड लपवून तेथून सटकताना आढळतात. मात्र, अजून तरी सत्ताधारी पक्षात असलेले माजी उपमुख्यमंत्री त्यापैकी नाहीत. त्यांनी सदर प्रकरणात उघड भूमिका घेताना प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या अटकेच्या होत असलेल्या मागणीला पाठिंबा तर दिला आहेच व ही मागणी योग्य असल्याचे सरकारला ठणकावून सांगितले आहे. पण या त्यांच्या भूमिकेमुळे पेडणे तालुक्यातील त्यांचे समर्थक बिथरले आहेत. गत म्हणजे २०२२ मधील निवडणूक जरी बाबूंनी पक्षाच्या सांगण्यावरून मडगावातून लढविलेली असली तरी त्यात पराभव पत्करल्यावर आपण पुन्हा पेडणेत येणार असे त्यांनी जाहीर केले होते व त्यामुळे तेथील त्यांचे समर्थक खूषही झाले होते. पण ताज्या प्रकरणात त्यांनी जे निवेदन केले ते त्यांना पेडणेत अडचणीत आणणारे आहे असे त्यांचे समर्थकच आता म्हणत आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते निवेदन मडगावात व दक्षिण गोव्यात ठीक आहे, पण पेडणेत चालणार नाही. बाबू, ऐकतात ना. ∙∙∙

भाजप प्रदेशाध्यक्ष बदलाचे काय?

विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकांनंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्षपद बदलणार असल्याचे जाहीर झाले होते. लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपला काटावरचे बहुमत मिळाले होते. त्या यशाच्या जोरावर भाजपने तानावडे यांच्या गळ्यात राज्यसभेच्या खासदारकीची माळ घातली. राज्यसभा खासदारपदाच्या निवडणुकीवेळी त्यांचे प्रदेशाध्यक्षपद राहणार की जाणार असे बोलले जात होते, परंतु पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर विश्वास ठेवत लोकसभेचीही निवडणूक लढविली. लोकसभेला दोन्ही जागा जिंकण्याचा त्यांचा दावा फोल ठरला. त्यामुळे गत लोकसभेला लागलेल्या निकालाची पुनरावृत्ती या लोकसभेलाही झाली. काही महिन्यांपूर्वी भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी दयानंद सोपटे व दामू नाईक यांच्या नावाची चर्चा असल्याची आवई उठली होती. आता विधानसभा व लोकसभा निवडणुका होऊन बराच कालावधी झाला, तरी प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचाली का होत नाहीत, अशी चर्चा आता भाजपचेच पदाधिकारी दबक्या आवाजात करू लागले आहेत. ∙∙∙

‘सनबर्न’वर लोबोंचे लक्ष

डिसेंबरच्या अखेरीस दरवर्षी होणाऱ्या सनबर्न महोत्सवाला विरोध नेहमीच होतो. मात्र, अखेरीस हा महोत्सव कोणत्याही परिस्थितीत होतो. त्यामुळे यावर्षीही तो होणारच. मात्र, त्याची जागा कोणती हे अजूनही ठरत नाही. रविवारी झालेल्या कामुर्ली कोमुनिदाद बैठकीत सनबर्नला कामुर्ली गावात थारा न देण्याचा ठराव घेण्यात आला. त्यामुळे सध्या तरी हा महोत्सव कामुर्लीत होणार नाही असे दिसत असले, तरी सरकार काय निर्णय घेईल यावर सर्व काही अवलंबून आहे. जर हा महोत्सव कोणाला नको असल्यास तो कळंगुटमध्ये करण्यास स्थानिक आमदार मायकल लोबो यांनी यापूर्वीच सहमती दाखविली आहे. त्यामुळे कामुर्लीत झालेल्या विरोधामुळे आमदार लोबो यांचे सध्याच्या घडीस अर्धे स्वप्न पूर्ण झाले आहे. शेवटी हा महोत्सव किनारपट्टी भागातच करण्यासाठी आयोजक सर्व ते नियम व अटी पाळण्यास तयार होतील. मात्र, लोकांचा होणारा विरोध सरकार व आयोजक कशाप्रकारे हाताळतील यावरच आता ठरणार आहे. कामुर्लीत सनबर्न महोत्सव नको असा ठरावच कोमुनिदाद बैठकीत घेण्यात आल्याने पुन्हा पंचाईत झाली आहे.∙∙∙

गोव्यात मेट्रोची गरज!

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा गोव्यात स्कायबस आणण्याचा प्रयत्न अर्ध्यावर फसला. त्यानंतर गोव्याला स्कायबसची गरज नाही, असे म्हटले गेले. गोव्यात दळणवळणासाठी महामार्गांची निर्मिती होत गेली, परंतु पर्यटनाच्यादृष्टीने गोव्याला नक्कीच मेट्रो रेल्वेची गरज बनली आहे. अनेक राज्यांकडून मेट्रो रेल्वेची मागणी होत गेली आणि त्या राज्यातील महत्त्वांच्या शहरांमध्ये ती सुविधा सुरूही झाली. गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ आहे. त्यामुळे अगोदरच तयार असलेल्या महामार्गाच्या सेवेशी सलग्न मेट्रो रेल्वे सुरू झाली, तर पेडणे ते काणकोणपर्यंत पर्यटकांना सहजरीत्या ये-जा करता येऊ शकते. महामार्गाशी संलग्न अशी मेट्रो सेवा नागपुरात सुरू झाली आहे. त्यामुळे अशी सेवा गोव्यातही होऊ शकते, पण त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. महामार्गावरील वाहनांची वाढलेली संख्या आणि अपघात यांचा विचार केला, तर मेट्रो रेल्वेची निश्चित राज्याला गरज आहे असे म्हणता येऊ शकते. म्हापशाचे आमदार ज्योशुआ डिसोझा यांनी विधानसभेत हा विषय एक-दोनवेळा सभागृहाच्या लक्षात आणून देण्याचाही प्रयत्न केला. भविष्यातील गरज म्हणून सरकारने आत्तापासूनच याचा विचार करायला हवा.∙∙∙

तू आहेस कुठे गड्या?

सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या पार्थिवासंदर्भात अवमानजनक विधान सुभाष वेलिंगकर यांनी केल्यानंतर राज्यात रान पेटले आहे. या विषयावरून विरोधी पक्षाच्या आमदार, पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून प्रदर्शन केले, परंतु गोवेकरांसाठी आणि गोवा वाचवण्यासाठी म्हणवणारा आरजी पक्ष गायब आहे. आरजीचे प्रदेशाध्यक्ष मनोज परब यांना सर्वात जास्त मदत ख्रिस्ती समुदायाने केली होती. मात्र, जेव्हा ख्रिस्ती समुदायाच्या भावना दुखावल्याने संबंध समुदाय रस्त्यावर उतरलेला असताना मनोजरावांचा थांगपत्ताच नाही. लोकसभा निवडणुकीचा निकाल झाल्यापासून ते कुठे गेले, ते कळण्यास मार्ग नाही. ते कुठे तरी फ्लॅट घेऊन राहत असून आरजीच्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देत असल्याचे वीरेश बोरकर म्हणतात, पण असे असल्यास ज्यांनी डोळे बंद करून त्यांना आर्थिक मदत केली, त्याच समुदायाच्या अडचणीच्यावेळी त्यांनी एक शब्दही न काढल्यावरून चर्चा रंगली आहे. ∙∙∙

...आणि माजी आमदार झाले जागृत!

सध्या गोव्यात फ्रान्सिस झेवियर डीएनए वादाने अडगळीत पडलेल्या राजकारण्यांच्या पुनरुज्जीवनासाठी एक नवीन संधी प्राप्त करून दिली आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. हल्लीच काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले व मडगाव शॅडो कौन्सिल फेम सावियो कुतिन्हो हे आंदोलनातून स्वतःला प्रोजेक्ट करून घेण्यासाठी व त्याचबरोबर आपल्या पत्नी प्रतिमा कुतिन्हो यांच्या पुनरुज्जीवनासाठी अधिकच ताणले असल्याचे कॉमेंट नेटीझन करतात. तेरा दिवसांचे माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव असा मुद्दा उपस्थित झाला, तर मागे कसे राहणार? चर्चिलनी आपल्या सुपुत्री वालंका यांना घेऊन वेलिंगकर यांच्या विरोधात पोलिस तक्रार केली. आता चर्चिल या वादात पडले म्हटल्यावर विस्मृतीआड गेलेले मिकी पाशेको मागे कसे राहणार? मिकींनी तर कहरच केला. मिकी ऑन कॅमेरा पोलिसांसमोर सुभाष वेलिंकर यांना डोक्यावर गण लावून शूट करणार अशी धमकी देतात याचा अर्थ काय? एवढेच नव्हे, बिळात गेलेले अनेक राजकारणी आता जागे झाले आहेत. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire: गत म्हणजे २०२२ मधील निवडणूक जरी बाबूंनी पक्षाच्या सांगण्यावरून मडगावातून लढविलेली असली तरी त्यात पराभव पत्करल्यावर आपण पुन्हा पेडणेत येणार असे त्यांनी जाहीर केले होते व त्यामुळे तेथील त्यांचे समर्थक खूषही झाले होते.
खरी कुजबुज: ‘शॅक’धारकांना सुखद धक्का!

गोमाता असुरक्षित!

राज्यात भटक्या गुरांची समस्या दिवसेंदिवस जटीलच होत चालली आहे. त्यातच आता गोवंशाची चोरी होण्याची भीतीही वाढली आहे. याआधी सत्तरी भागात गोवंश चोरीच्या घटनाही घडल्या आहेत. रस्त्यावर फिरणारी भटकी गुरे त्रासदायक आहेतच. त्याच बरोबरच त्यांच्या सुरक्षितेचाही प्रश्नही गंभीरच बनत चालला आहे. वाळपई फोंडा मार्गावर नाणूस, सावर्शे, गुळेली, पाडेली, गुळेली, गांजे, उसगाव मार्गावर दररोज या भागात असंख्य प्रमाणात गुरांचा मोठा संचार असतो. महाराष्ट्र सरकारने गाईला राज्यमाता मानले आहे. गोवा सरकारही गोवंश जपला पाहिजे,अशा गप्पा मारते. पण प्रत्यक्षात रस्तोरस्ती भटकणारी आणि अपघातात गुरे दगावतात. सरकारने उघडलेले कोंडवाडेही नावालाच आहेत. सरकार गोमातेच्या सुरक्षेसाठी काय करणार, असा सवाल गोप्रेमींकडून विचारला जात आहे. ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com